खरीप हंगामासह कोरोना स्थितीचा आढावा घेणार
बीड । वार्ताहर
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या दुसर्यांदा बीड जिल्ह्यात येत आहेत. उद्या शुक्रवारी (दि.18) सकाळी दहा वाजता त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनाकडून सुरु असलेली खरीप हंगामाची स्थिती, शेतकर्यांना पीक कर्ज वाटप करण्याबाबत डिसीसीसह राष्ट्रीयकृत बँकांना दिलेले उद्दीष्ट आणि 15 जून पर्यंत झालेले कर्ज वाटप या सर्व विषयांवर अजित पवार हे आढावा घेणार आहेत. या बरोबरच बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना व तिसर्या लाटेच्या अनुषंगाने केलेले नियोजन या सार्या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रशासनाकडून आढावा घेणार आहेत. दरम्यान प्रशासकीय बैठकीनिमित्त उपमुख्यमंत्री बीडमध्ये दाखल होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीची तयारी केली जात आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हा दौरा निश्चित झाला आहे. उद्या शुक्रवारी (दि.18) होणार्या दौर्याच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. खरीप हंगाम आढावा आणि कोव्हीड उपाय योजनांचा पवार आढावा घेणार आहेत. दरम्यान प्रशासकीय निमित्त असले तरी दौर्याला राजकीय महत्व अधिक आहे. कारण नुकताच काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे दौरे आटोपताच अजित पवार दौर्यावर येत असल्याने या त्यांच्या दौर्याला राजकीय झालर असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अजित पवार हे माजलगाव येथे आ.प्रकाश सोळंके यांनी माजलगाव येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यात आले होते. तेंव्हापासून त्यांचा जिल्हा दौरा झाला नव्हता.दरम्यान आता काँग्रेस नेते व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नुकताच ऑक्सिजन प्लँट पाहणी आणि वीज उपकेंद्र उदघाटनाच्या निमित्ताने जिल्ह्याचा दौरा केला तर नगरपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा दौरा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्या दौर्याला महत्व आले आहे. त्यातच अजित पवार खरीप हंगाम आढावा आणि कोव्हीड आढावा घेण्याच्या कारणाने येत असले तरी त्यांच्या दौर्याला राजकीय झालर निश्चित आहे. दरम्यान, दौर्याचा शासकीय कार्यक्रम अद्याप आला नसला तरी शुक्रवारच्या दौर्याच्या तयारीची जिल्हाधिकारी कार्यालयात लगबग सुरू आहे.
Leave a comment