नेकनूर । मनोज गव्हाणे
बीड तालुक्यातील नेकनूरनजिकच्या कळसंबर शिवारात बिबट्याने झडप मारुन शेतकर्याला जखमी केले. शुक्रवारी (दि.11) दुपारी ही घटना घडली. जखमी शेतकर्यास सुुरुवातीला नेकनूर व नंतर बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी शेतकरी, ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.
कळसंबर येथील आजिनाथ वाघमारे (38) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकर्याचे नाव आहे. वाघमारे हे त्यांच्या ऊसाच्या शेतात गेले होते. तेथून ते घराकडे जात असताना पांदी रस्त्यावर अचानक बिबट्याने झडप घातली त्यांच्या तोंडाला इजा झाली असून त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेकनूरच्या दक्षिणेस असलेल्या आठ किलोमीटरवरील कळसंबर येथील उसाच्या शेतात शुक्रवारी (दि.11) दुपारी बिबट्या दिसून आला तो जैतळवाडीच्या दिशेने गेला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता कळसंबर येथील गोरख वाघमारे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट्या दिसून आला. ही चर्चा ग्रामस्थांना कळताच कळसंबर शिवारात बिबट्या पाहण्यासाठी गर्दी झाली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर नेकनूर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल खाडे, खांडेकर यांनी धाव घेऊन लोकांना दूर केले. सुरुवातीला वाघ असल्याचे सांगण्यात आले; मात्र वन विभागाचे वनाधिकारी अमोल मुंडे दिनेश मोरे,अच्युत तोंडे, डोंगरे दाखल झाले. त्यांनी तो बिबट्या असल्याचे ओळखले मात्र हा बिबट्या हुलकावणी देत बाजूच्या जैेतळवाडीच्या दिशेने पळाला बिबट्याच्या दर्शनाने परिसरातील अनेक गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
Leave a comment