कोल्हापूर :
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. येत्या 16 जूनला कोल्हापुरातून पहिला मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. हे आंदोलन मूक असेल. या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी असेल. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.
याशिवाय मी मुंबईत मांडलेल्या मुद्यावर विचारही झाला नाही, कोणी किंमत दिली नाही, अशी खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली.
36 जिल्ह्यात आंदोलन करूनही सरकारने दखल घेतली नाही तर काय करायचं, आपण बांगड्या भरल्या आहेत का? दखल घेतली नाही तर एकदाच जोर लावायचा. पुण्यापासून मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढायचा. पण ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.
आता टेक्निकली डोकं लावून पुढची भूमिका घेतली पाहिजे. आता पहिली जबाबदारी माझी, त्यानंतर खासदार आणि त्यानंतर आमदारांची आहे. तुम्ही समाजासाठी काय करताय हे आमदार खासदारांना कोणी विचारलं का? ही दिशा फक्त कोल्हापूरसाठी नाही तर राज्यासाठी असेल. ही भूमिका आक्रमक असेल पण टेक्निकल असेल, असं संभाजीराजे म्हणाले.
राजकीय खेळ सुरू झाल्यानेच मी आक्रमक
10 वर्षानंतर कोणी बोट ठेवलं अशी भूमिका मी घेणार नाही. आरक्षण नाकारल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कोण चुकलं यावरच जास्त चर्चा सुरू झाली. चुका काढण्यापेक्षा या राजकीय नेत्यांनी मार्ग सांगितले पाहिजेत. राजकीय खेळ सुरू झाल्यानेच मी आक्रमक भूमिका घेतली, असं संभाजीराजेंनी सांगितलं.
कोणी किंमत दिली नाही
मी मुंबईत मांडलेल्या मुद्यावर विचारही झाला नाही, कोणी किंमत दिली नाही. अजित पवार यांनी फक्त फोन केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल शेवाळे यांच्याकडून बोलण्याचा प्रयत्न केला, असं संभाजीराजे म्हणाले.
शाहूंच्या भूमीतून आंदोलन व्हावी अशी माझी भूमिका आहे. 16 तारखेला आपण समाजासमोर कसं जाणार आहोत. मला समजून घ्या मी जी भूमिका घेईन ती समाजाच्या हिताची असेल. माझं उद्धव ठाकरे यांच्याशी चांगलं जमतं तसंच फडणवीस आणि अजित पवार यांच्याशीही जमतं, असं संभाजीराजेंनी नमूद केलं.
तुमच्या जिल्ह्यात मराठा मोर्चा कधी?
कोल्हापूरनंतर नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड अशा क्रमाने मोर्चे होतील. 12 तारखेला कोपर्डीला जाणार, तसंच जलसमाधी घेतल्या काकासाहेब शिंदे स्मारकालाही जाणार. आम्ही आमचा आक्रमकपणा सोडणार नाही. आमच्याशी खेळ करू नका, असा निर्वाणीचा इशारा संभाजीराजेंनी दिला.
Leave a comment