बीड । वार्ताहर
बीड शहर व परिसरात मंगळवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री साडेनऊच्या सुमारास सुरु झालेल्या या पावसामुळे शहरातील सखल भागातील रस्ते जलमय झाले. बीड परिसरातील काही गावांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला.
यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले आहे. मंगळवारी दुपारपासूनच बीड परिसरात पावसाचे ढग दाटून आले होते. दुपारपर्यंत वातावरण उष्ण होते. त्यानंतर मात्र ढग नाहीसे झाले. नंतर रात्री मात्र अचानक वातावरणात बदल झाला अन् मुसळधार पाऊस झाला. सध्या खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहे. शेतकर्यांकडून नांगरणी,मोघडणीची कामे उरकण्यात येत असून लवकरच पेरण्याची लगबग सुरु होणार आहे. खरिपातील प्रमुख पीक असलेल्या कापूस लागवडीसाठी मोठ्या पावसाची गरज असते. मंगळवारी झालेल्या या जोरदार पावसामुळे बीड परिसरात पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. असे असले तरी शेतकर्यांनी आपल्या महसूल मंडळात 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करु नयेत असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे. यंदा साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या प्रस्तावित आहेत. बीड परिसरात रात्री झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात रस्ते जलमय झाले होते.
Leave a comment