बीड जिल्ह्यासह पुणे-मुंबईसाठीही धावणार बस
बीड । वार्ताहर
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एप्रिल महिन्यापासून बंद असलेली बीड जिल्ह्यातील बससेवा येत्या सोमवारपासून (दि.7) पुर्ववत सुरु होत आहे. बीड जिल्ह्यातील सर्व आठही आगारातून जिल्ह्यातंर्गत तसेच जिल्ह्याबाहेर पुणे, मुंबई इत्यादी शहरांसाठी बस धावणार आहे. विभागीय नियंत्रक कालीदास लांडगे यांनी शनिवारी ही माहिती दिली. बससेवा सुरु होत असली तरी नागरिकांना तोंडावर मास्क तसेच सोबत सॅनिटायझर बाळगणे बंधनकारक असणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेवून प्रशासनाकडून निर्बंध कडक करण्यात आलेले आहेत. मात्र आता हे निर्बंध काहीअंशी शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा एप्रिल महिन्यापासूनच बंद होती. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करण्यावर बंधने आली होती. मात्र आता जिल्ह्यातील बससेवा 7 जूनपासून सुरु करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील आठही आगारातून विविध मार्गावर बससेवा सुरु होणार आहे. तसेच सदर बससेवेस मिळणारा प्रवाशी प्रतिसाद पाहून अन्य मार्गावर बससेवा सुरु करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रवाशांनी बसमध्ये प्रवास करताना मास्क, सॅनिटायझर वापरण्याबरोबरच शासकीय आरोग्य विषयक सुचनांचे पालन करुन राज्य परिवाहन बसनेच प्रवास करावा असे आवाहन विभाग नियंत्रक कालीदास लांडगे यांनी दिली.
या मार्गावरुन धावणार बसेस
सोमवारपासून आगारनिहाय मार्गांवर बससेवा सुरु होत आहे. बीड आगारातून परळी, नांदेड, परभणी, अंबाजोगाई, लातूर, औरंगाबाद, जालना, सोलापूर, पुणे, मुंबई इत्यादी मार्गावर बस धावती. याशिवाय परळी आगारातून बीड, परभणी, लातूर, अंबाजोगाई, नांदेड, सोनपेठ. धारुर आगारातून बीड, अंबाजोगाई, केज, तेलगाव, पुणे. माजलगाव आगारातून लातूर, परळी, परभणी, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, बीड, मुंबई, गेवराई, आष्टी. गेवराई आगारातून माजलगाव, परभणी, नांदेड, शेगाव, पुणे, जालना, औरंगाबाद, पाटोदा आगारातून पुणे, बीड, परळी, मुंबई. आष्टी आगारातून पुणे, स्वारगेट, नगर, मुंबई,बीड व अंबाजोगाई आगारातून बीड, परळी, औरंगाबाद, लातूर, अहमदपुर, पुणे, धारुर, परभणी या मार्गांवर बस धावणार आहेत.
Leave a comment