लोकप्रश्नची दखल । आघाव पाटलांचा दणका
बीड । वार्ताहर
शहरालगत असलेल्या श्रीक्षेत्र नामलगाव येथील गणपती मंदिराच्या मालकीची इनामी जमिन खालसा करुन इतर हक्कांमध्ये तिघांचे नावे घेवून जमिनीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न भूसुधारचे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटलांनी हाणून पाडला असून ही प्रक्रियाच रद्द केली आहे. नामलगाव येथील गणपती मंदिर देवस्थानच्या मालकीची मिळकत गट क्र 165 मधील मौजे घोसापुरी येथील जमिन खालसा प्रक्रियेमध्ये बोगस आदेश काढून 6 मार्च 2018 रोजी प्रक्रिया पुर्ण केली होती ती प्रक्रियाच उपजिल्हाधिकारी आघाव यांनी रद्द करण्याचे आदेश बीड तहसीलदारांना काल दिले आहेत. हा आदेश दिल्यामुळे पुर्ण प्रक्रिया रद्दहोवून गणपती मंदिराची जमिन आघाव पाटलांना मुळे वाचली आहे. या संदर्भात गेल्या दोन दिवसापासून दै.लोकप्रश्नमध्ये गणपती मंदिराची जमिन वाचवण्यासंदर्भात सविस्तर वृत्त आले होते त्याची दखलही प्रशासनाने घेतली आणि त्यामुळेच ही जमिन वाचली आहे. उपजिल्हाधिकारी आघाव यांनी रद्दचा आदेश काढल्याने गणेशभक्तांनी त्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे.
नामलगाव येथील गणपती मंदिराच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न काही भूमाफियांनी केला होता. या मंदिराच्या ट्रस्टीमधील शेळके नामक ट्रस्टीबरोबरच संगनमत करुन तसेच 2018 मध्ये कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी नरहरी शेळके यांना हाताशी धरुन सदरील जमिन खालसा करण्याची प्रक्रिया त्याचवेळेस पूर्ण केली होती. विशेष म्हणजे 2018 व पूर्वीच्या आदेशाची 7-12 वर नोंद घेण्यापूर्वी भूसुधार कार्यालयाची पुर्वपरवानगी घेण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी आघाव यांनी दिल्या होत्या. मात्र गत दोन वर्षात अशा घेतल्या गेलेल्या नोंदी आणि फेरफार मोठ्या प्रमाणात बोगस असल्याचे उपजिल्हाधिकारी आघाव यांच्या निदर्शनास आले त्यामुळे त्यांनी गेल्याच आठवड्यात अशा नोंदी अभिलेख्यामध्ये घेवू नयेत आणि जर अशा नोंदी फेरफार केले असतील तर पुर्नविलोकन करुन ते रद्द करावेत असा आदेश दिला होता. त्यानुसार नामलगाव येथील इनामी जमिनीसंदर्भात भूसुधार कार्यालयाकडे अनेकवेळा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे खालसा बाबतचे आदेश काढण्यात आले होते. ते खरे नसल्याचे आणि उपलब्ध कागदपत्र तपासले नसल्याचे स्पष्ट झाले होते त्यामुळे या जमिनीची फेरफार नोंदी रद्द करुन सदरील इनामी जमिनीचा 7-12 पुर्वीप्रमाणेच ठेवण्याचा आदेश आघाव यांनी दिल्याने भुमाफियांमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकरणात दोषी असलेल्या मंडळ अधिकारी आणि तलाठ्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली जात आहे.
Leave a comment