मुंबई :
अखेर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा अधिकृतपणे रद्द झाल्या आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कालच बारावी परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवल्याचं सांगितलं होतं. शिवाय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा रद्द करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली होती.
याबाबत माहिती देताना काल वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या, “बारावीच्या परीक्षांसदर्भातील परिस्थिती आम्ही मंत्रिमंडळासमोर मांडली आहे. आमचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक दोन दिवसांमध्ये होईल. त्यानंतर त्यांची परवानगी आली की आम्ही परीक्षेबाबत निर्णय जाहीर करू”
मुलांच्या आरोग्याला प्राधान्य
बारावीची परीक्षा 23 एप्रिलला होणार होती. नंतर आपण ती पुढे ढकलली. केंद्राने दोन दिवसापूर्वी सीबीएससीच्या परीक्षा रद्द केल्या. राज्य सरकारनेही याबाबत विचारणा केली होती. आम्ही मंत्रीमंडळाला इतर राज्यांची माहिती दिली. त्यानुसार आम्ही बारावी परीक्षा निर्णयाची फाईल आपत्ती विभागाला सोपवत आहोत. ही एक असाधारण परिस्थिती असल्याने आपत्ती विभाग निर्णय घेईल लवकरच त्यांची बैठक होईल आणि ते निर्णय़ घेतील. त्यानंतर आम्ही बारावी परीक्षा निर्णयाबाबत कळवू. मुलांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत आम्ही जी भूमिका मांडली होती. ती भूमिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवली आहे. मुंबई हायकोर्टात सरकार बाजू मांडेल. सरकार उद्या होणाऱ्या सुनावणीत बाजू मांडेल, असंही वर्षा गायकवाड यांनी काल सांगितले होतं.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बारावीच्या 14 लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. सीबीएसई, आयसीएसई, हरयाणा आणि गुजरात सरकारनं देखील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील 14 लाख विद्यार्थ्यांना दिलासा
महाराष्ट्र सरकारने अखेर बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. या निर्णयाचा 14 लाख विद्यार्थ्यांना फायदा होईल. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या परीक्षासंदर्भात केंद्राकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर विचार करुन केंद्रानं सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करुन परीक्षा घेणं योग्य नाही. परीक्षा रद्द करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत एकमत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांची मते जाणून घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना परीक्षा घेऊन पाल्य, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात घालणे योग्य होणार नाही. दहावीची परीक्षा रद्द केली, त्याच निकषावर बारावीचीही परीक्षा रद्द केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत मंत्र्यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याचा अंतिम निर्णय राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत अखेर १२ वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच हा निर्णय उच्च न्यायालयास कळविला जाणार आहे.
काय असेल फॉर्म्युला?
परीक्षा न घेता बारावी परीक्षेचा निकाल कसा लावायचा याचा फॉर्म्युला शिक्षण विभाग निश्चित करेल. इयत्ता नववी, दहावी व अकरावीच्या गुणांची सरासरी काढून निकाल देणे, हा एक पर्याय असला तरी गेल्यावर्षी अकरावीची परीक्षा झालेली नव्हती, ही अडचण आहे. तसेच पदवी प्रवेशासाठी सीईटीच्या पर्यायाचा विचार होऊ शकतो.
Leave a comment