भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मुंडे साहेब प्रेरणास्रोत-जे.पी.नड्डा

गोरगरीबांसाठी आयुष्य वेचले म्हणूनच लोकनेता-रविशंकर प्रसाद

राष्ट्रीय स्तरावरील गौरवाचा आम्हाला अभिमान-पंकजाताई मुंडे

 

परळी । वार्ताहर

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यातिथी निमित्ताने त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाचा गौरव म्हणून गुरूवारी केंद्र सरकारच्या डाक विभागाकडून पोस्ट पाकिटाचे विमोचन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते दिल्ली येथे तर गोपीनाथ गडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे, खा. डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत एकाच वेळी करण्यात आले.

 

 

 

लोकनेते मुंडे साहेब यांची पुण्यतिथी गुरुवारी (दि.3) गोपीनाथ गडावर कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरी करण्यात आली. भारतीय डाक विभागाच्या वतीने त्यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या पोस्टल इन्व्हलपचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बानवकुळे यांनी हिंगोलीहून या कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पुण्याहून सहभागी झाले होते. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा. प्रीतमताई मुंडे व खा. डॉ. भागवत कराड यांनी गोपीनाथ गडावर उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला. तर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरहून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
मुंबई प्रदेश कार्यालयातून केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विनोद तावडे आदी सहभागी झाले होते.प्रारंभी गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या समाधीस अभिवादन  तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे संचलन खा. प्रितमताई यांनी केले. यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुंडे साहेबांच्या कार्याचा गौरव केला. मुंडे साहेब एक उत्तम वक्ता, कुशल संघटक आणि मेहनती नेता होते. गोरगरीबांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, वंचित, पिडितांचा ते आवाज बनले. जमिनीशी जोडलेला आणि नव नवीन विचार घेऊन काम करणार्‍या या नेत्याने लोकांचे सुख दुःख त्यांच्या जवळ जाऊन जाणून घेतले. संसदेतील त्यांची कामगिरी देखील चमकदार होती. दीन, दलित, कष्टकरी, शेतकरी यांच्यासाठी समर्पित होऊन काम केले. आज प्रत्येक कार्यकर्त्यांने त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन काम करावे असे आवाहन केले.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद याप्रसंगी म्हणाले, आमचे मार्गदर्शक, मोठे भाऊ मुंडे साहेब यांच्या कार्याचा गौरव करतांना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. त्यांचे अचानक जाणे आमच्यासाठी वेदनादायी होते. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी धडपडणारा नेता आज आमच्यात नाही. ते आज असते तर देशातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक संकल्पना त्यांनी मांडल्या असत्या. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पंकजाताई गोरगरीबांसाठी काम करत आहेत. प्रितमताई देखील संसदेत चांगले काम करत त्यांची उणीव भरून काढत आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेबांचे जीवन संघर्षमय होते. भाजपच्या स्थापनेपासून त्यांनी  काम केले.  सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. आतापर्यंत ते लोकांच्या मना मनात होते आता इन्व्हलप च्या माध्यमातून घरा घरात जातील. भारतीय डाक विभागाने त्यांचा जो गौरव केला आहे, त्याबद्दल पंतप्रधान मोदीजी, नड्डाजी व केंद्र सरकारचे मी आभार मानते. 3 जून ते त्यांचा जन्मदिवस 12 डिसेंबर या दरम्यान प्रत्येकाने हे इन्व्हलप घेऊन त्यात मोदीजींनी आपली मन की बात सांगावी.

आमदार, खासदार, कार्यकर्त्यांनी घेतले समाधीचे दर्शन

दरवर्षी मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर राज्यभरातून कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होत असते, विविध सामाजिक उपक्रम देखील होत असतात परंतू यंदा कोरोना महामारीमुळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने सर्व कार्यक्रम रद्द केले होते. आज ऑनलाईन कार्यक्रम असल्याने मोजकी उपस्थिती होती. खा. सुजय विखे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. सुरेश धस, आ. नमिता मुंदडा, आ. मोनिका राजळे, आ. मेघना बोर्डीकर, आ. तुषार राठोड, भीमसेन धोंडे, फुलचंद कराड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के तसेच उपस्थित कार्यकर्त्यांनी लोकनेत्याच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले.

 

 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त मा.पंकजाताई मुंडे यांचे संबोधन

 

 

कोरोना संकट दूर झाल्यावर महाराष्ट्रभर दौरा करणार-पंकजाताई मुंडे

मराठा, ओबीसी समाजाला न्याय मिळवून देणारच;मुख्यमंत्र्यांनाही भेटणार

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या विचारांची व्रजमुठ बांधून मराठा आरक्षण व ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच संपुर्ण महाराष्ट्राचा दौरा करून गावागावात पोहचणार असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे. आरक्षणाचा प्रश्न आणि राज्यातील कोरोनाची स्थिती संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे त्या म्हणाल्या.
लोकनेते मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (दि.3)  पंकजाताईंनी गोपीनाथ गडावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर राज्यातील जनतेशी फेसबुकवरून संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.आजचा दिवस आपणा सर्वांसाठी तसा दुःखाचा दिवस आहे. आपल्या लाडक्या लोकनेत्याला आजच्याच दिवशी म्हणजे सात वर्षापूर्वी आपण गमावले आहे. आज पोस्टल इन्व्हलपच्या माध्यमातून केंद्र सरकारने त्यांचा गौरव करून एक सामाजिक संदेश दिला आहे. प्रत्येकाने हे इन्व्हलप घेऊन पंतप्रधान मोदींजींना आपल्या मागण्या मांडाव्यात असे त्या म्हणाल्या. लोकं म्हणतात तुमचा पराभव झाला,पराभव हा माणसाचा अल्पविराम आहे,पूर्णविराम नाही.लोकांच्या मनातील आशा संपून जातील तो खरा पराभव आहे.आमचा निवडणुकीत पराभव झाला असेल पण लोकांच्या मनातील आशा अजून मावळल्या नाहीत.ह्याच आशा माझं ऑक्सिजन रेमडिसीवर आणि व्हेन्टिलेटर आहेत. आमचं ठरलंच आहे,आम्हाला एकदा शिवाजी पार्क हे मैदान भरवायचे आहे.हे कोणत्या निवडणुकीसाठी नाही तर वंचित आणि बहुजन तरूणांना दाखवलेल्या स्वप्नांसाठी भरवायचे आहे असं त्या म्हणाल्या.

तर आज दारोदार फिरण्याची वेळ आली नसती

गेल्या वर्षभरात मराठा समाजाची घोर निराशा झाली आहे. मराठा समाजाचा प्रत्येक तरुण मला ट्विटरवर, फेसबुकवर मेसेज करत आहेत की, गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडावरून आम्हाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. आज ते असते तर मराठा तरूणाला आरक्षणासाठी असं दारोदार फिरायची वेळ आली नसती,आज बहुजन समाजाचा मोठा प्रश्न आहे. आरक्षणाच्या माध्यमातून सर्वांनी फक्त आपल्या पोळ्या भाजण्याचं काम केलं आहे. ही नवी पीढी आहे. यांना खोटं सांगू नका, खरं सांगा. मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देता हे सांगा. तुम्ही सोळा टक्के होत नाही म्हणता, मग आम्हाला टक्के सांगा. आम्ही तयार आहोत, असं पंकजाताई मुंडे यांनी म्हटलंय.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.