अॅप डाऊनलोड करण्यास सांगून फसवणूक
बीड । वार्ताहर
शहरातील प्रतिष्ठित कर सल्लागारास एका अनोळखी भामट्याने मोबाइलवरुन संवाद साधत एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगीतले. नंतर त्याच अॅपआधारे त्याने कर सल्लागारांच्या बँक खात्यातून सहावेळेस वेगवेगळ्या अशा एकूण 1 लाख 60 हजारांची रक्कम परस्पर काढून घेत फसवणूक केली. दरम्यान यापूर्वी शहरातील शिंदेनगरमधील एका सेवानिवृत्त नागरिकाला अशाच प्रकारे एकाने गंडवले होते.
सत्यनारायण लोहिया असे फसवणूक झालेल्या नागरिकाचे नाव आहे. लोहिया हे बीडमधील प्रतिष्ठीत कर सल्लागार आहेत. मंगळवारी (दि.1) दुपारी चार वाजेच्या सुमारास ते त्यांच्या घरी असताना एका अनोळखी व्यक्तीने त्याच्या मोबाइलवरुन लोहिया यांची संपर्क साधला. त्यानंतर त्याने लोहिया यांना मोबाइलवरुन एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगीतले. त्याच्यावर विश्वास ठेवून लोहिया यांनी ते अॅप डाऊनलोड केले; मात्र नंतर त्याच अॅपव्दारे लोहिया यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियातील खात्यावरुन 95 हजार, 10 हजार, 10 हजार, 5 हजार, 20 हजार व पुन्हा 20 हजार अशा पध्दतीने एकूण 1 लाख 60 हजारांची रक्कम परस्पर विड्रॉल झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर लोहिया यांनी शहर पोलीसात धाव घेत तक्रार नोंदवली. अज्ञाताविरुध्द फसवणूक, तसेच आयटी अॅक्टच्या कलमानुसार गुन्हा नोंद झाला. पो.नि.रवी सानप या प्रकरणाचा तपास करत आहेत.
भामट्यांपासून सावध रहा
सध्या मोबाइल सर्वांची गरज झाला आहे; हीच संधी साधून काही भामटे ऑनलाईन नागरिकांना गंडा घालण्यासाठी लक्ष ठेवूनच असतात. गोडीत बोलून वेगवेगळ अमिष दाखवून नागरिकांचा विश्वास संपादन करुन त्याआधारे नंतर नागरिकांच्या खात्यातून परस्पर हजारोंच्या रक्कमा परस्पर काढून घेतल्या जातात. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना आपली कोणतीही व्यक्तीगत बँक खाते, मोबाइल,एटीएमची माहिती देवू नये, कोणत्याही लिंक ओपन, डाऊनलोड करु नयेत.
Leave a comment