आमच्यावर आभाळ कोसळले ; गायी दगावलेल्या माऊलीचा टाहो
तवलवाडीतील पशूपालकांचे मोठे नुकसान
आष्टी । वार्ताहर
मोठ्या मायेने लेकरागत सांभाळलेली पाच जनावरे रोगाने दगावली, ही व्यथा सांगताना तवलवाडीतील सोजरबाई तुळशीराम चटाले या माऊलीने टाहो फोडला.तर याच गावातील बाबा केरुळकर यांची दुभती 9 जनावरे दगावल्याने त्यांच्या कुटूंबाचा आर्थिक कणाचं विस्कटून गेला आहे. एकीकडे कोरोनाने हवालदिल झालेला शेतकरी आता पुन्हा एकदा फार मोठ्या संकटात सापडला आहे. शेतीला जोडून असणार्या दूध धंद्यावर उपजीविका भागवणारे आष्टी तालुक्यातील तवलवाडी गावातील शेतकर्यांवर घटसर्पामुळे फार मोठे संकट कोसळले आहे.
गेल्या पंधरा दिवसांमध्ये तवलवाडी गावामध्ये लहान मोठी जनावरे घटसर्प लाळ्या खुरकूत स्थामिनिया यासारख्या संसर्जन रोगाने मृत्यूमुखी पडू लागली आहेत. त्यामुळे या गावातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. पशुपालक शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘आता काय करावे काय नाही, आता आपलं सगळंच संपलं’ अशा भावना व्यक्त करत सोजरबाई तुळशीराम सटाले या महिलेने टाहो फोडत माझी लेकरात सांभावलेली जनावरे डोळ्यादेखत गेल्याची व्यथा मांडली तर बाबा केरूळकर यांनी गायमुक्त गोठामधून उभा केलेला दुग्धव्यवसायाचा धंदा फार चांगल्या प्रकारे चालत असताना अचानक या साथीच्या रोगाने त्यांची एक नाही दोन नाही तब्बल 9 जनावरे दगावले. या जनावरांना जगवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. जवळपास 70 हजार रुपयाचे मेडिसिन व इतर खर्च झाला. तज्ञ डॉक्टर पाचारण केले; मात्र काहीही फायदा झाला नाही. प्रत्येकी 25 लिटर दुध देणार्या त्यांच्या 9 गायी मृत्यूमुखी पडल्या. अशा जीवघेण्या आजाराने तवलवाडी गावातील जनावरे बाधित झाले आहेत. तसेच कुसुमबाई महादेव केरुळकर या आजीबाईचे 3 जनावरे या रोगाने दगावली त्यांना देखील अश्रू अनावर झाले. याबाबत त्या म्हणाल्या, आमचे कुटुंब दुध व्यवसायावर अवलंबून होते, आता आम्ही काय करायचे कर्ज घेऊन मकाचा मुरघासाचे 10 गोस तयार केलीत आता कुणाला खाऊ घालायची? असा प्रश्न केला. आत्तापर्यंत लहान-मोठी गायी,वासरे, म्हैस असे विविध प्रकारचे जनावरे जवळपास शंभराचे पुढे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे शेतकर्यांवर आभाळ कोसळले आहे. आता त्यांना खरोखरच शासनाच्या मदतीची गरज आहे.
शासन, प्रशासन गंभीर नाही-आ.सुरेश धस
शासनाने याचे गांभीर्य घेऊन या शेतकर्यांना मदत करण्याचे आ. आमदार सुरेश धस यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले. ते म्हणाले, की एवढी मोठी घटना घडल्यानंतरही सरकार कधी जागे होणार? यांना गरिबाच्या या झालेल्या नुकसानीचे कितपत गांभिर्य येणार अन् पशुपालक शेतकर्यांना मदत कधी मिळणार ? हे सगळे अनुत्तरित आहे. मात्र मी आज शेतकर्यांना असे आश्वासन देतो आपले बाधित जाणारे विकू नका, शासनाने जरी तुम्हाला मदत नाही दिली तरी हा सुरेश धस तुम्हाला फुल नाही फुलांची पाकळी तुम्हाला मी मदत करेल असा आधार सुरेश आण्णा धस यांनी शेतकर्यांना दिला.
Leave a comment