वाळूघाटांची इटीएस मशीनव्दारे होणार मोजणी
आयुक्त कार्यालयाकडून दखल;जिल्हाधिकार्यांचे आदेश
बीड । वार्ताहर
गेल्या दोन महिन्यापासून कोरोना संसर्गाचा फायदा उचलत गेवराई तालुक्यातील गोदापात्रातील वाळूघाटांवर वाळू माफियांनी शासनाने निर्धारित केलेल्या वाळू उत्खननाशिवाय जास्तीचे आणि नियमबाह्य उत्खनन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात गेवराईचे आ.लक्ष्मण पवार यांनी शासनाचे लक्ष वेधून प्रशासनाला नियमबाह्य उत्खननाची मोजणी करुन आणि अवैध वाळू वाहतूकीविरुध्द सुधारित धोरणानुसार कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वाळू घाटाची ईटीएस मशीनव्दारे मोजणी करुन अटी व शर्थींचे पालन केले नसेल तर संबंधित ठेकेेदारांवर दंडात्मक कारवाई करुन गुन्हा दाखल करावा असे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी गुरुवारी हे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे ठेकेदारांमध्ये एकच खळबळ माजली असून गोदापट्ट्यात आनंद व्यक्त केला जात आहे.
गेवराई तालुक्यामध्ये तीन वाळू घाटांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या होत्या. यामध्ये सुरळेगाव, पांचाळेश्वर आणि राक्षसभूवन या तीन वाळूघाटांचा समावेश आहे; मात्र यापैकी सुरळेगाव आणि पांचाळेश्वर या दोन घाटांमध्ये बेसुमार वाळू उपसा झाल्याच्या तक्रारी शासन आणि प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हणजे 25 मे रोजी वाळूघाटांचे ईटीएस मोजणी करुन विभागीय आयुक्तांना अहवाल देण्यासंदर्भात औरंगाबाद विभागातील जिल्हाधिकार्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी गुरुवारी आदेश निर्गमित केले असून अनुज्ञेय क्षेत्रापेक्षा जास्तीचे उत्खनन करुन वाळूची अवैधरित्या वाहतूकीसंदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत असल्याने या वाळूघाटांची ईटिएस मोजणी करणे आवश्यक आहे. शासनाने अवैध उत्खनन आणि वाहतूकीविरुध्द सुधारित धोरणानुसार कारवाई करण्याचे निर्देश वेळोवेळी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील कार्यरत वाळूघाटांची ईटीएस मोजणी करुन जास्त उत्खनन केले असल्यास तात्काळ कारवाई करुन आयुक्त कार्यालयाला अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत.
गेवराई, माजलगाव आणि परळी या तीन तालुक्यातील लिलाव झालेल्या आणि लिलाव न झालेल्या सर्व वाळूघाटांची ईटीएस मशीनने मोजणी करुन संयुक्त अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर करावा. संबंधित ठेकेदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करुन दंडात्मक कारवाई करावी असेही जिल्हाधिकारी जगताप यांनी आदेशात नमूद केले आहे. यामुळे गेवराई तालुक्यातील तीनही वाळूघाटांची ईटीएस मशीनने मोजणी होणार असून सुरळेगाव आणि पांचाळेश्वर या दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झाल्याचा प्राथमिक अहवाल यापूर्वीच महसूल प्रशासनाने दिलेला आहे. त्यामुळे सदरील वाळू उत्खनन आता थांबवण्यात येणार असून सदरील ठेकेदारावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
आ.पवारांनी लक्ष घातल्याने कारवाई
वाळू माफियांची दादागिरी आणि अवैध वाळू उत्खनन तसेच हायवाव्दारे होणारी अवैध वाळू वाहतूक या संदर्भात गेल्या वर्षभरापासून आ.लक्ष्मण पवार सातत्याने पाठपुरावा करत आहेत. जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव आणि परळी या तालुक्यातील वाळूघाटांची ईटीएस मशीनव्दारे संबंधित जबाबदार अधिकार्यांच्या उपस्थितीत मोजणी करुन अहवाल संयुक्त स्वाक्षरीसह जिल्हाधिकार्यांना सादर करण्याचे कळवले असल्याने या संदर्भात कारवाई होण्याचे पत्र त्यांनीच कालच तहसीलदारांनादेखील दिले आहे.आ.लक्ष्मण पवार यांनी बुधवारीच गोदापात्रात जावून वाळूघाटाची प्रत्यक्ष परिस्थिती जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या कानावर टाकली होती. आ.पवारांचे यामुळे तालुकाभरात अभिनंदन होत आहे.
सुरळेगाव, पांचाळेश्वरमध्ये नियमबाह्य उत्खनन
आयुक्त कार्यालयातील अधिकार्यांकडून पाहणी
गेवराई तालुक्यातील सुरळेगाव, पांचाळेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर व या संदर्भात गेल्या चार दिवसांपासून दैनिक लोकप्रश्नने प्रकाश टाकल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकार्यांकडून वाळूघाटाची काल पाहणी करण्यात आली. आता ईटीएस मशीनव्दारे मोजणी होणार असल्याने वाळू माफियांचे पितळ उघडे पडणार आहे.
आ.लक्ष्मण पवारांच्या दणक्याने
महसूल यंत्रणा लागली कामाला
गोदापट्यातील वाळू वाहतुकीचे चोरटे मार्ग खोदण्यास सुरुवात
वाळू वाहतूक नियमानुसार आणि ट्रॅक्टरनेच व्हावी, या विषयावर आक्रमक झालेल्या आमदार लक्ष्मण पवार यांनी थेट गोदापात्रात जावून स्पॉट पंचनामा केल्यानंतर प्रशासनाने धडक कारवाईला सुरूवात केली असून, गोदापात्रात जाणारे मुख्य रस्ते जेसीबीने खोदून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणार्यांना इशाराच दिला आहे. दरम्यान, आमदार पवार चांगलेच आक्रमक झाले असल्याने प्रशासन ही अॅक्शन मोडवर सतर्क झाल्याचे चित्र गुरूवारी दिसून आले आहे.
राज्य शासनाच्या वतीने गेवराई तालुक्यात प्रायोगिक तत्वावर हायवाने वाळू वाहतूक बंद करण्याचे आदेश आल्यानंतर, या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आ . लक्ष्मण पवारांनी आक्रमक पवित्रा घेत तहसीलदार , महसूल प्रशासनाच्या अधिकार्यांना सोबत घेत गोदापात्रात जावून स्पॉट पंचनामे केले होते. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, चोरट्या मार्गाने ज्या रस्त्यातून वाळुच्या गाडया जातात ते सर्व मार्ग जेसीबीने खोदून बंद केले आहेत. गोदावरी नदीच्या पात्रातून ट्रॅक्टरद्वारे वाळुची वाहतूक करावी , अशी मागणी आ.लक्ष्मण पवार यांनी केल्यानंतर, तसा आदेश महसूल विभागाने काढला आहे. मात्र असे असतानाही हायवाद्वारे वाळुची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत होते. आ. लक्ष्मण पवार यांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेत नदीपत्रात जावून स्पॉट पंचनामे केले व संबंधित विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. लक्ष्मण पवारांच्या आक्रमकतेमुळे महसूल प्रशासन चांगलेच खडबडून जागे झाले. महसूल विभागाने कारवाई करायला सुरुवात केली. सकाळपासून खामगाव , संगमजळगाव , राजापूर , काठोडा , राक्षसभुवन , सुरळेगाव , पांचाळेश्वर , म्हाळसपिंपळगाव , हिंगणगाव यासह गोदाकाठचे सर्व वाळू रस्ते खोदून काढणे सुरू आहे. माफियागिरी रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान वाळुची चोरटी वाहतूक करण्यासाठी काही वाळु माफियांनी शेतकर्यांच्या शेतातून रस्ते काढले होते. त्या बदल्यात शेतकर्यांना वाळु माफिया पैसे देत होते. याबाबत तहसीलदारांनी ठोस भूमिका घेत जे शेतकरी वाळु माफियांना आपल्या शेतातून रस्ते देतील त्या शेतकर्यांच्या सातबारावर बोजा टाकणार असल्याचे तहसीलदार सचिन खाडे यांनी सांगितले आहे.
Leave a comment