जिल्हा रुग्णालयातील निष्काळजी कारभार चव्हाट्यावर
बीड । वार्ताहर
येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या उपचारातही निष्काळजीपणा केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ ऑक्सीजन बेड रिकामा करण्यासाठी उपचाराधिन गंभीर रुग्णाला डिस्चार्ज देण्याचा प्रयत्न रुग्णालयातील डॉक्टरांनी केला मात्र संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार करताच हा डिस्चार्ज रद्द करून पुढील उपचार चालू ठेवण्यात आले. या निमित्ताने जिल्हा रूग्णालयातील निष्काळजी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
वडवणी तालुक्यातील एक रूग्ण जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक 6 मध्ये 18 मे रोजी दाखल झाला. 19 तारखेपासून त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन व इतर उपचार सुरू करण्यात आले. आरोग्य विभागावर विश्वास ठेवून नातेवाईक बाहेर थांबले. परंतू आतमध्ये ऑक्सिजन बंद पडले तरी नर्स व इतर कर्मचारी लक्ष देत नसल्याचे उघड झाले होते. यात दोन नर्सवर निलंबणाची कारवाईही झाली होती. त्यानंतर याच रूग्णाचा 21 मे रोजी एचआरसीटी तपासणी केली असता स्कोअर 16 आला. तसेच ऑक्सिजन पातळी कमी जास्त होती. उपचारही सुरूच होते. असे असतानाच रविवारी रात्रीच्या सुमारास बेड रिकामा करायचा म्हणून याच रूग्णाला चक्क डिस्चार्ज देण्यात आला. नातेवाईकांनी हा प्रकार वरिष्ठांना सांगितल्यानंतर डॉ.अशोक हुबेकर यांनी धाव घेत हा डिस्चार्ज रद्द केला. नंतर याच रूग्णाला साधारण 7 वाजेच्या सुमारास डिस्चार्ज झाल्याचे सांगण्यात आले. वास्वतिक याच रूग्णाचा रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा पाचवा डोस बाकी होता. तो डिस्चार्ज रद्द केल्यानंतर 9 वाजता देण्यात आला. जर 7 वाजताच रूग्णाला सुटी दिली असती तर या इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याशिवाय राहिला नसता, असा संशय व्यक्त होत आहे. हा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनाही कळविण्यात आला. त्यानंतर आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली.
Leave a comment