गेवराईत राजकीय वाळू माफियांचा हैदोस
महसूल-पोलीसांच्या संगणमताने कोट्यवधीची उलाढाल
बीड । वार्ताहर
गेवराई व माजलगाव तालुक्यातील गोदापात्रामध्ये तीन ठिकाणी वाळू उपसाच्या निविदा मंजूर झाल्यापासून गोदापात्रामध्ये काही राजकीय वाळू माफियांनी निव्वळ हैदोस माजवला आहे. गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या गावातून लाखो ब्रास वाळू चोरली जात असून अनेक ठिकाणी छुप्या पध्दतीने उपसा केलेल्या वाळूचे साठे करुन ठेवले गेले आहेत. बीड जिल्ह्यातील राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच वाळू माफिया झाले आहेत. महसूल आणि पोलीस प्रशासनाला हाताशी धरुन कोट्यवधी रुपयाची उलाढाल वाळूच्या धंद्यात होत आहे. गोदावरी नदीच्या पात्राची अक्षरक्ष: या वाळू माफियांनी चाळणी करुन टाकली आहे. शेजारी अंबड, घनसावंगी तालुक्यात तेथील लोकप्रतिनिधी राजेश टोपे यांनी वाळू उपशावर बंदी घातली आहे. काही अपवाद सोडले तर वाळूचे सर्वच ठेके बंद आहेत. मात्र, गेवराईत वाळूचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरु असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याबाबत शांत का? असा सवाल केला जात आहे. आता केवळ विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडूनच काही होईल अशी आशा गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या ग्रामस्थांना वाटत आहे. केंद्रेकर साहेब, गोदामाईचे पात्र वाचवा, अन् त्याबरोबरच आमचे भवितव्यही वाचवा..! अशी आर्त हाक गोदाकाठच्या 25 गावातील ग्रामस्थांनी केंद्रेकरांना दिली आहे.
गेवराई तालुक्यामध्ये नागझरी, सुरळेगाव-पांचाळेश्वर, आणि राक्षसभूवन या ठिकाणी वाळू ठेक्याच्या अधिकृत निविदा काढण्यात आलेल्या आहेत. या चार गावांच्या नावावर जवळपास सहा ते सात गावातून बिनदिक्कतपणे वाळूचा उपसा सुरु आहे. संगमजळगाव, म्हाळसपिंपगाव, राजापूर या ठिकाणच्या निविदा नसतानाही हजारो ब्रास वाळूचा बेकायदेशीर उपसा केला जात आहे. सायंकाळनंतर वाळू उपशाला बंदी असतानाही रात्रभर बोटीव्दारे वाळू उपसा करुन नंतर दिवसभर वाळू वाहतूक सुरु असते. विशेष म्हणजे ओव्हरलोड वाळू भरुन राजरोस हायवा महामार्गावरुन धावत असतात. या भरधाव जाणार्या हायवांना गेवराई, बीड ग्रामीणचे पोलीस रस्ता करुन देताना अनेकदा निदर्शनास आले आहेत. हायवाच्या पुढे जर वाहन असेल, किंवा टोलनाका अथवा नाकाबंदी पाँईन्टवर जर वाहने असतील तर त्या वाहनांना बाजुला करुन हायवा पुढे सोडले जातात. या वाळू माफियांकडून महसूल, पोलीस आणि आरटीओ या तीनही खात्यातील अधिकार्यांना मोठ्या प्रमाणात हप्ता दिला जात असल्याची चर्चा गेवराई,बीडमध्ये सर्वत्र आहे.
गेल्या दोन महिन्यापासून गेवराईचे गोदापात्र म्हणजे जणूकाही युध्दभूमीच झाली आहे. जेसीबी, हायवा, पोकलेन, राजकीय कार्यकर्त्यांच्या स्कॉर्पियो दिवस-रात्र गोदापात्रात अविरत फिरत असतात. राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच या धंद्यात उतरल्याने मूळ वाळू व्यवसाय करणार्यांची माती झाली आहे. त्याचबरोबर गोदाकाठी असलेल्या गावांमध्येदेखील या वाळू माफियांची मोठी दहशत असून ग्रामीण भागात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना काही टक्केवारी देवून बेमालूमपणे वाळूचा उपसा केला जात आहे. यामध्ये कोणी आडवे आले तर त्याला आडवे करण्याचे प्रकारही अनेकवेळा घडले आहेत. गेवराईचे तहसील कार्यालय म्हणजे केवळ वाळू माफियांसाठी काम करणारे कार्यालय झाले आहे. तहसीलदार सचिन खाडे, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांना सर्व प्रकार माहित असतानाही केवळ खिशात हात घालून शासकीय विश्रामगृहावर वाळू माफियांच्या वाहनांची वाट पाहण्यात त्यांना धन्यता वाटत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप हे या बाबतीत काहीच करु शकत नाहीत, तो त्यांचा स्वभावही नाही. पोलीस प्रशासन वाळू माफियांनी पुर्णत: विकत घेतल्याची चर्चा हेच राजकीय कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे आता जायचे कोणाकडे? असा प्रश्न ग्रामीण भागातील लोकांना पडला आहे.
महसूल प्रशासन पंडितांच्या दावणीला!
गेवराई तालुका म्हणजे पंडित, असे समीकरण जुनेच आहे. वाळूच्या धंद्यातही अनेक ‘पंडित’ आहेत. या पंडितांच्या कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात हायवा वाळूची वाहतूक करतात. गेवराई व्यतिरिक्त किंवा माजलगावच्या पदाधिकार्यांचे हायवा वाळू वाहतूक करु लागले तर त्यांना अडवून चालकाला मारहाण करुन तहसीलदारांना कारवाई करण्यास भाग पाडले जाते. यामध्ये वाळू धंद्यातील ‘पंडित’ असलेले काही कार्यकर्ते समांतर महसूल प्रशासन चालवत आहेत. गेवराईचे महसूल प्रशासन केवळ पंडितांसाठी आहे काय? असे चित्र निर्माण झाले आहे.
पत्रकारांनाही बिदागी!
गेल्या दोन महिन्यापासून गेवराई आणि बीडमधील काही राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचा वाळू धंद्यात मोठ्या प्रमाणात हैदोस सुरु असून गोदापात्राची अक्षरश: चाळणी झाली आहे. महामार्ग ते राक्षसभूवन हा रस्ता आत्ताच कुठे चांगला झाला आहे. मात्र, ओव्हरलोड हायवामुळे या सिंमेट रस्त्यावरही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. हा रस्ता कोण करणार? असा प्रश्न राक्षसभूवनमधील नागरिक विचारत आहेत. दोन महिन्यांपासून वाळू माफियांचा हैदोस सुरु असताना गेवराईतील एकाही पत्रकाराने याविरोधात आवाज उठवला नाही, किंवा बातम्याही केल्या नाहीत, त्याचे कारण बिदागी मिळाल्याचे सांगण्यात आले.
निसर्ग माफ करणार नाही
वाळू उपशातून किती नुकसान होते, पर्यावरणाचा कसा र्हास होतो, याकडे प्रशासनही दुर्लक्ष करत आहे. गोदापात्रात मोठे-मोठे खड्डे करुन पात्राचा आकारच बदलला आणि उद्या भविष्यामध्ये पाणीच जमिनीमध्ये मुरले गेले नाही तर पर्यावरणाला नक्कीच धोका निर्माण होईल. याचा विचार गेवराई शहरात असणार्या काही बुध्दीजीवी लोकांनी करायला हवा. खरे तर गेवराई शहर हे चळवळीचे शहर आहे. मात्र, चळवळ करणार्यांनीच वळवळ बंद केली, त्यामुळेच अशा माफियांची गर्दी गेवराईत वाढली आहे. या वाळू माफियांना निसर्ग कधी माफ करणार नाही.
300 हायवा दररोज चालतात
गोदापात्रातून वाळू उपसा करुन तो बीड, औरंगाबाद आणि नगर जिल्ह्यात तो विक्रीसाठी पाठवला जातो. या वाळूच्या धंद्यात अर्थकारण मोठ्या प्रमाणात होत असून पूर्ण वाळू पट्ट्यात जवळपास 1 कोटी रुपयांची दररोज उलाढाल होते. 300 हायवाच्या माध्यमातून वाळूची बेकायदेशीर वाहतूक चालू असतानाही प्रादेशिक परिवहन खाते आणि त्यांचे अधिकारी मिंदे होवून बघत आहेत.
सेना पदाधिकार्यांनाही मज्जाव
वाळूच्या धंद्यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षाचेच प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उतरले आहेत. त्यातही जिल्ह्यातील शिवसेनेची गटबाजी वाळू धंद्यात देखील दिसून येत आहे. शिवसेनेच्या एका विद्यमान पदाधिकार्याने या धंद्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.मात्र, त्याचा हायवा फोडून चालकाला मारहाण करत त्याला परत पाठवण्यात आले. दुसर्या एका पदाधिकार्याला वाळूची हायवा भरण्यासाठी मज्जाव करण्यात आला. स्थानिकमधील आणि बीडमधील काही कायर्कर्ते, स्थानिक महसूल व स्थानिक पोलीस प्रशासन यांना हाताशी धरुन वाळूचा बेकायदेशीर उपसा मोठ्या प्रमाणात करत आहेत.
केंद्रेकर साहेब, अचानक गोदापात्राची पाहणी करा
गेवराई तालुक्यातील जनतेची नव्हे जिल्ह्यातील जनतेचा महसूल प्रशासनातील अधिकार्यांवर फारसा विश्वास राहिलेला नाही. बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे जिल्ह्यातील सुजान नागरिक अजुनही मोठ्या आशेने पाहतात. जिल्ह्याच्या पातळीवर प्रशासनातील अधिकार्यांनी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर केंद्रेकरांच्या कोर्टात अनेकजण जातात, आणि तेथे न्याय मिळतो हा बहुतेक लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे गोदापात्राला वाचवायचे असेल तर केंद्रेकर साहेबांनी अचानक गोदापात्राची पाहणी करावी, त्यांना दुर्दशा पहायला मिळेल. त्यांनी मनावर घेतले तर अजुनही गोदामाईचा विध्वंस थांबू शकतो असा लोकांना विश्वास आहे.
Leave a comment