शासनाचे आदेश: सीईओ कुंभार यांची माहिती
बीड । वार्ताहर
कोरोनाच्या लढाईत पुढे असलेल्या अंगणवाडी सेविकाही आपले कर्तव्य बजावताना बळी जात आहेत. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरोनाने मृत दोन अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 50 लाखांचा विमा शासनाने मंजूर केला आहे. त्यांच्या वारसांना हा विमा दिला जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामेश्वर मुंडे यांनी ही माहिती दिली.
कोरोनाच्या लढाईत अंगणवाडी सेविका या फ्रंटल वॉरिअर आहेत. गावपातळीवर गतवर्षीपासून विविध प्रकारचे सर्वेक्षण करुन गावांना कोरोनामुक्त ठेवण्यात, रुग्ण शोधण्यात अंगणवाडीताईंनी मदत केली आहे. यातच अनेक अंगणवाडीताईंना कोरोनाचीही बाधा झाली. दुर्देवाने जिल्ह्यात पाच जणींचा बळी गेला. दरम्यान, कोरोनाच्या कामादरम्यान मृत शासकीय कर्मचार्यांच्या वारसांना शासनाकडून 50 लाखांचा विमा दिला जातो.यासाठी पाच प्रस्ताव पाठवेल गेले होते. या पैकी केज तालुक्यातील कासारी तांबवा येथील अंगणवाडी सेविका रत्नमाला बाबासाहेब हजारे व केज तालुक्यातीलच जीवाचीवाडी येथील अंगणवाडी सेविका गौळणबाई रुघुनाथ तांदळे या दोन अंगणवाडी सेविकांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. शुक्रवारी याबाबतचे आदेश शासनाने काढले.
रत्नमाला हजारे यांचा 11 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनाने मृत्यू झाला त्या 8 दिवस रुग्णालयात होत्या. तर, गौळणबाई तांदळे यांचा 23 सप्टेंबर 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्या 10 दिवस रुग्णालयात होत्या. त्यांना विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामेश्वर मुंडे यांनी प्रयत्न केले. सीइओंच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करुन शासनाला पाठवला व पाठपुरावा केला. यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाला. आणखी तीन अंगणवाडी सेविकांचे प्रस्तावही प्रक्रियेत असल्याचे मुंडे म्हणाले.
Leave a comment