मुंबई - बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आपले प्राण पणाला लावून कार्यरत असलेले डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉय, सफाई कामगार, प्रशासनाच्या विविध विभागातील अधिकारी हे सर्वजण ज्याप्रकारे कोविड परिस्थिती हाताळत आहेत, त्यांना खरेतर सुपरस्टार्स म्हटले पाहिजे; असे गौरवोद्गार खा. सुप्रियाताई सुळे यांनी काढले आहेत.
बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीला शासन, प्रशासनाच्या मदतीने हाताळत, सतत लोकांमध्ये राहून दोन वेळा कोविड विषाणूचा स्वतः सामना करत, प्रसंगी टोकाची टीका सहन करून देखील कोरोना नियंत्रण हेच एकमेव लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन काम करणारे माझे बंधू धनंजय मुंडे हे एक आदर्श पालकमंत्री ठरतील असेही सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, मानवलोक संस्था अंबाजोगाई, बीड जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून शिरूर कासार येथील मॉडर्न इंग्लिश स्कुल येथे पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार 50 बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरच्या व्हर्च्युअल उद्घाटन कार्यक्रमात खा. सुप्रियाताई सुळे बोलत होत्या.
बीड जिल्ह्यात स्वाराती रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट, ऑक्सिजनचे वाढीव बेड, राज्यातले सर्वाधिक कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, अनेक मोफत कोविड केअर सेंटर्स, 400 ऑक्सिजन कॉंसंट्रेटर्स अशी मोठ्या प्रमाणात आरोग्यसुविधांची निर्मिती केली आहे. तरीदेखील कोविड रुग्णसंख्या व मृत्युदर आटोक्यात आणायचे असतील तर लसीकरण मोहीम अधिक व्यापक करण्याची गरज आहे. जिल्ह्याला आवश्यक प्रमाणात लसींचा पुरवठा वेळोवेळी उपलब्ध व्हावा यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे आपण मिळवून पाठपुरावा करू, अशी विनंती यावेळी धनंजय मुंडे यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांना केली.
धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या कोविड विषयक उपाययोजनांची यावेळी सविस्तर माहिती खा. सुप्रियाताई सुळे यांना अवगत करून दिली. या कार्यक्रमास खा. सुप्रियाताई सुळे, ना. धनंजय मुंडे, आ. बाळासाहेब आजबे, रा.कॉ. युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, मानवलोक संस्थेचे कार्यवाहक अनिकेत लोहिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांसह आदी उपस्थित होते.
आरोग्य सेवेतील सर्वजण, लोकप्रतिनिधी म्हणून सगळे नेतेगण रात्रंदिवस काम करत असले, तरी एकाही मृत्यूची बातमी आली, की मन व्यथित होते. त्यामुळे उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेले रुग्ण बरे होऊन सुखरुप परत घरी जावेत, अशा शुभेच्छा देणे योग्य राहील, असेही यावेळी बोलताना खा. सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
दरम्यान बीड जिल्ह्याचा प्रतिरुग्ण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग रेशो हा राज्यात अव्वल असून, रोज वाढणारी रुग्णसंख्या व मृत्युदर हे अजूनही चिंतेचे विषय आहेत. व्यापक लसीकरण करणे व अधिकाधिक काळजी घेऊन संसर्ग टाळणे हे अत्यंत गरजेचे असल्याचे यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली युवक आघाडीने नुकतेच राज्यभर ब्लड फॉर महाराष्ट्र अभियान राबवून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित केली, याबद्दल शेख यांचे खा. सुप्रियाताई सुळे, ना. धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले.
मॉडर्न इंग्लिश स्कुल शिरूर कासार येथील 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात आले असून, येथे 150 पर्यंत बेड वाढविले जाऊ शकतात अशी माहिती रा.यु.कॉ.चे महेबूब शेख यांनी दिली. यावेळी आ. बाळासाहेब आजबे यांनीही आपल्या आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील विविध समस्या अवगत करून दिल्या.
Leave a comment