औरंगाबाद । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेऊन मराठवाड्यातील परिस्थिती व उपाय योजनांचा आढावा घेतला. मराठवाड्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण घटते आहे, ही समाधानाची बाब असली तरी अजूनही ते 21 टक्के असल्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे फडणवीस म्हणाले. औरंगाबाद, लातूरची स्थिती चांगली असून बीडमध्ये मात्र कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढते आहे, त्यामुळे बीडकडे जरा जास्त लक्ष द्यावे लागेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद दौर्यावर होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिलेल्या सेवा ही संघटन या उपक्रमाअंतर्गत भाजपचे आमदार प्रशांत बंब, अतुल सावे यांनी उभारलेल्या कोरोना आयसोलेशन सेंटरची फडणवीस यांनी पाहणी केली. सावे यांच्या पन्नास बेडच्या कोविड सेंटरचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी बंब यांच्या लासूर स्टेशन येथील शंभर खाटांच्या कोविड हॉस्पीटलची देखील पाहणी केली.तत्पुर्वी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेऊन त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना फडणवीस म्हणाले, मराठवाड्यातील कोरोना संसर्गाचा दर हा बराच खाली आला आहे. आधी तो 50 ते 60 टक्के होता, आता तो 21 टक्यांपर्यंत घसरला आहे.ही समाधानाची बाब असली तरी 21 टक्के हा संसर्ग दर देखील कमी नाही. त्यातल्या त्यात औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यातील संसर्ग दर आधीपेक्षा खूप कमी करण्यात यश आले आहे.बीडमध्ये मात्र हा दर अजूनही वाढतोच आहे, त्यामुळे बीडकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. या शिवाय मराठवाड्यात ठिकठिकाणी ऑक्सिजनचे टँक उभारण्यात आल्यामुळे याबाबतीत चांगले काम झाले आहे.कोरोनाची तिसरी लाट व त्यापासून लहान मुलांना होणारा धोका लक्षात घेता आपल्याला अधिक सतर्क आणि सर्व उपाय योजनांनी सज्ज होणे अत्यंत गरजेचे आहे.लहान मुलांबरोबर त्यांचे पालक देखील असतील त्या दृष्टीने आपल्याला तयारी करावी लागेल. लहान मुलांसाठीची औषधी, इंजेक्शन व इतर उपाययोजनांची देखील तयारी आधीच करावी लागले, जर वेळत ही तयारी पुर्ण झाली नाही तर राज्यात विदारक चित्र दिसेल. ते टाळण्यासाठी वेळीच सरकारने याची तयारी करायला हवी, असेही फडणवीस म्हणाले.
Leave a comment