आयुक्त सुनील केंद्रेकरांनी घेतला गेवराई उपजिल्हा रूग्णालयाचा आढावा
गेवराई | वार्ताहर
येथील उपजिल्हा रूग्णालयात सोमवारी ऑक्सीजन पुरवठा वेळेवर उपलब्ध न झाल्याने उपचार घेणार्या 60 कोरोना बाधितांचा जीव धोक्यात सापडल्याचा प्रकार समोर आला होता. रूग्णसेवा समिती व सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार थेट भ्रमणध्वनीवरून विभागीय आयुक्त सुनील केेंद्रेकर यांना कळविल्यानंतर त्यांनी आरोग्य यंत्रणेला तातडीने कामाला लावत ऑक्सीजन सिलेंडरची व्यवस्था करून दिली होती. हाच धागा पकडत आज बुधवारी (दि.12) आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तातडीने गेवराई उपजिल्हा रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपजिल्हा रूग्णालयात कोरोना बाधितांवर केल्या जाणार्या उपचारांचा आढावा तर घेतलाच तसेच कोव्हिड कक्षात जाऊन थेट रूग्णांची त्यांना मिळणार्या उपचाराबाबत चर्चा केली. कोरोना बाधितांना अधिकाधिक चांगल्या आरोग्य सुविधा द्या, हलगर्जीपणा करू नका, डॉक्टरांनी वरिष्ठांच्या समन्वयाने काम करावे, ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही याकडे लक्ष द्यावे असे निर्देशही आयुक्त केंद्रेकरांनी दिले.
गेवराई येथील उपजिल्हा रूग्णालयात सध्या उपचार घेणार्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा वेळी या रूग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासू नये अशी व्यवस्था या ठिकाणी केली गेली आहे. परंतु सोमवारी ऑक्सीजनवर असलेल्या 60 रूग्णांना ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला होता. हा प्रकार रूग्णसेवा समितीच्या पदाधिकार्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तहसीलदार सचिन खाडे यांना याबाबत माहिती दिली होती. तसेच आयुक्त केंद्रेकरांनाही फोनवरून ऑक्सीजन तुटवड्याबाबत कळविले होते. नंतर केंद्रेकर यांनीच जिल्हा आरोग्य यंत्रणेला सूचना करत उपजिल्हा रूग्णालयाला ऑक्सीजन सिलेंडर पुरविणार्या एजन्सीशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर तातडीने सिलेंडरचे वाहन उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वाःस सोडला होता.
या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद येथून थेट गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत अधिकार्यांसोबत बैठक घेतली.
यावेळी आ.लक्ष्मण पवार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम, उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ.एम.व्ही.चिंचोले, बीडीओ अनिरूद सानप, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, न.प.मुख्याधिकारी उमेश ढाकणे, डॉ.राजेश शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. केंद्रेकर यांनी कोरोना बाधित रूग्णांच्या उपचाराबाबत कोणत्या उपाय योजना केल्या जात आहेत याची माहिती वैद्यकीय अधिकार्यांकडून जाणून घेतली. सध्या मराठवाड्यात सर्वत्र ऑक्सीजनची समस्या कायम आहे. त्यामुळे ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही यासाठी रूग्णांलयांनी त्याचे सुक्ष्म नियोजन करावे, ऑक्सीजनचा अपव्यय होणार नाही याची रूग्णालय कर्मचार्यांनी काळजी घ्यावी. तसेच स्थानिक वैद्यकीय अधिकार्यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठांशी समन्वय ठेवून काम करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच रूग्णांवर उपचार करतांना आरोग्य सुविधांचा तुटवडा भासणार नाही याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे निर्देशही केंद्रेकर यांनी दिले. दरम्यान बैठकीनंतर आयुक्त केंद्रेकर यांनी उपजिल्हा रूग्णालयातील कोव्हिड वार्डात जावून उपचार घेणार्या रूग्णांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या ऐकुण घेतल्या.
रूग्णसेवा समितीचे आयुक्तांना निवेदन
उपजिल्हा रूग्णालयाचा आढावा घेण्यासाठी आलेले आयुक्त सुनील केंद्रेकर यांना कोरोना रूग्णसेवा समितीच्या वतीने अॅड.सुभाष निकम, महेश दाभाडे, संजय काळे, दादासाहेब घोडके, डॉ.अनिल दाभाडे, प्रा.राजेंद्र बरकसे, प्रशांत गोलेच्छा, राजाभाऊ अतकरे व पदाधिकार्यांनी निवेदन दिले. उपजिल्हा रूग्णालयाला हरिओम ऑक्सीजन रिफलिंग एजन्सी व विकास ऑक्सीजन रिफलिंग एजन्सीकडून आवश्यकतेनुसार मुबलक ऑक्सीजन पुरवठा व्हावा, रेमडेसिवीर रूग्णांना तातडीने मिळावे, कोव्हिड संबंधित इतर औषधांचा पुरवठा विनाविलंब व्हावा. तसेच कोरोनाच्या आरटीपीसीआर व अॅन्टीजन टेस्ट किट मुबलक उपलब्ध करून दिल्या जाव्यात या बरोबरच ऑक्सीजनवरील रूग्णांसाठी बायपॅपच्या किमान पाच मशीन उपलब्ध करून दिल्या जाव्यात, ऑक्सीजन कॉन्संट्रेटर्सचे 20 ते 25 मशीन द्याव्यात आदि मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या.
Leave a comment