बीड । वार्ताहर
जिल्ह्यातील रुग्णवाढीला शनिवारी (दि.8) काहीसा दिलासा मिळाला. नव्या बाधितांपेक्षा कोरोनावर मात करुन सुटी मिळालेल्या रुग्णांची संख्या अधिक नोंदवली गेली. 1339 रुग्ण आढळले त 1359 जण कोरोनामुक्त झाले. 18 जणांचा मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात शनिवारी 4 हजार 26 जणांच्या कोरोना चाचणीचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले. यापैकी 2 हजार 687 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 1339 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 327 रुग्ण आढळले. अंबाजोगाई तालुक्यात 242, आष्टी 19, धारुर 96,गेवराई 54, केज 210, माजलगाव 60, परळी 136, पाटोदा 74, शिरुर 62 व वडवणी तालुक्यातील 59 रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी 1359 जण कोरोनामुक्त झाले.
शनिवारी 18 जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील 25 वर्षीय पुरुष,सुगाव येथील 68 वर्षीय महिला,ममदापूर येथील 63 वर्षीय महिला,फ्लॉवर्स क्वॉर्टरजवळ 61 वर्षीय पुरुष, बीडमधील सम्राट चौकाजवळील 47 वर्षीय पुरुष, उक्कडपिंप्री येथील 68 वर्षीय पुरुष,वडगाव येथील 62 वर्षीय महिला,केकतपांगरी येथील 65 वर्षीय पुरुष, अंबिलवडगाव येथील 50 वर्षीय महिला,भाळवणी येथील 47 वर्षीय महिला, वासनवाडी येथील 60 वर्षीय महिला,शहाबाजपूर येथील 50 वर्षीय पुरुष, कोथिंबीरवाडी (ता.धारुर) येथील 50 वर्षीय पुरुष, वारंगळवाडी (ताग़ेवराई) येथील 65 वर्षीय महिला,आवसगाव (ता.केज) येथील 55 वर्षीय पुरुष, सावळेश्वर येथील 60 वर्षीय पुरुष,चकलाउखंडा (ता.शिरुर) येथील 55 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.आता एकूण रुग्णसंख्या 65 हजार 152 इतकी झाली असून आतापर्यंत 57 हजार 433 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर एकूण बळींचा आकडा 1081 इतका झाला आहे. सध्या सहा हजार 638 जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जि.प.सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी.के.पिंगळे यांनी दिली.
वडिलांच्या मृत्यूनंतर चार दिवसातच मुलानेही सोडला प्राण
कोरोनाने जरांगे कुटुंबावर दुहेरी आघात
कोरोनाने वृध्द वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांची सुश्रूषा करताना बाधित झालेल्या मुलानेही चौथ्या दिवशीच प्राण सोडले. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (दि.8) येथे घडली. पित्यापाठोपाठ मुलालाही कोरोनाने हिरावून नेल्याने जरांगे कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे.
बीड शहरातील सरस्वती प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रामराव भीमराव जरांगे (54,रा.आयटीआय मागे, बीड) यांचे मूळ गाव मातोरी (ता.शिरुर) आहे. त्यांचे वडील भीमराव मायांजी जरांगे (76) हे गावी राहतात. दरम्यान, तीन आठवड्यांपूर्वी भीमराव जरांगे यांना कोरोनाची लक्षणे आढळली. चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर बीडमध्ये खासगी दवाखान्यात उपचार सुरु केले. वडिलांची सेवासुश्रूषा करताना रामराव जरांगे व त्यांचे धाकटे भाऊ गोविंद जरांगे या दोघांनाही कोरोनाने गाठले. तिघेही पिता-पुत्र एकाच दवाखान्यात उपचार घेत होते. गोविंद यांनी कोरोनावर मात केली. मात्र, भीमराव जरांगे यांचा उपचारादरम्यान 5 मे रोजी मृत्यू झाला. वडिलांच्या जाण्याने जरांगे बंधूंवर दु:खाचा डोंगर कोसळला. अशातच रामराव जरांगे यांची प्रकृतीही खालावत गेली. 14 दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र, उपचार सुरु असताना शनिवारी (दि.8) त्यांची प्राणज्योत मालवली. भीमराव जरांगे हे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित होते. विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला होता. सध्या ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.त्यांच्या निधनाच्या बातमीने शैक्षणिक वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. लागोपाठ दोघांच्या जाण्याने जरांगे कुटुंब शोकमग्न झाले आहे.
Leave a comment