कपडे,सौंदर्य प्रसाधनांसह इतर दुकानेही खुली करा
दोन दिवस सवलत दिली;पण वेळही वाढवा
बीड । वार्ताहर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 5 ते 7 मे दरम्यान कडक लॉकडाऊन लागू केला होता. त्यानंतर कडक लॉकडाऊनची मुदत आणखी पाच दिवसांसाठी वाढविण्यात आली. नंतर आता शनिवारी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दि.11 व 12 मे रोजी सर्व किराणा दुकाने, सुकामेव्यासह मिठाईची दुकाने, तसेच डेअरी, बेकरी,चिकन, मटन विक्रीची दुकाने सुरु ठेवण्यास जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी परवनागी दिली आहे. प्रशासनाने ईदच्या सणासाठी दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी केवळ किराणा आणि सुकामेव्यावरच ईद कशी साजरी करायची असा प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाने किराणा दुकानांना परवानगी दिली आहेच तर मग आता कपडे, सौदंर्य प्रसाधनांसह इतर दुकानेही खुली करावीत तसेच केवळ 3 तास नको तर वेळही वाढवून द्यावा अशी मागणी होत आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 5 ते 7 मे या तीन दिवसांपासून लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आस्थापना आणि पेट्रोलपंप वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारच्या आदेशानुसार 8 ते 12 मे असा पाच दिवस कडक लॉकडाऊन करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र हा निर्णयही शनिवारी फिरवण्यात येवून सुधारित आदेश जारी करत 11 व 12 मे रोजी ईदच्या सणानिमित्त किराणा आणि सुकामेवा तसेच डेअरी, बेकरी,चिकन, मटन विक्रीची दुकाने सुरु ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने मुभा दिली आहे, पण केवळ ही काही मोजकीच दुकाने सुरु करण्याबरोबरच रमजान ईदसाठी दरवर्षी बाजारात विविध प्रकारचे कापड, टोप्या, सूट, सौंदर्यप्रसाधने, अत्तरे, मुलांचे कपडे, बांगड्या, सुकामेवा, रंगीत शेवया, मेंहदी, बांगड्या, पादत्राणे पठाणी ड्रेस, विविध खाद्यपदार्थ, खजूर आदींची खरेदी घरोघरी केली जाते. त्यामुळे ही दुकाने सुरु केली असती तर यंदा लॉकडाऊनमुळे या छोट्या मोठ्या व्यावसयिकांनाही रोजगार मिळू शकला असता, त्यामुळे ही दुकानेही सुरु करायला हवी होती अशी भावना व्यक्त झाली.
याबाबत अनेकांनी तशी मागणीही प्रशासनाकडे केली आहे. नव्या नियमानुसार येत्या मंगळवार व बुधवारी ही दुकाने केवळ सकाळी 7 ते 10 या वेळेतच उघडण्यास परवानगी दिली गेली आहे, त्यामुळे आणखी वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे. सकाळी 7 ते 10 या वेळेत भाजीपाला विक्रेत्यांना व दूध विक्रेत्यांना मुभा राहणार आहे. हातगाड्यावर किंवा पायी भाजीपाला, दूध विक्री करता येणार आहे. बँकेचे कामकाज सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत सुरु राहील.असे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आदेशात नमूद केले आहे.
वेळ वाढवून द्या - सलीम जहाँगीर
जिल्हा प्रशासनाने आणखी पाच दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहेत मात्र हा लॉकडाऊन रमजान ईदच्या तीन दिवस आधी शिथिल करावा. तसेच ईदच्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांना किराणा व इतर अत्यावश्यक सामान खरेदीसाठी 10 मे पासून ठराविक पाच ते सहा तासांची सवलत द्यावी,त्यामुळे 13 मे रोजी होणारी गर्दीही कमी होईल. याबरोबरच जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांना धान्य पुरवठा करून लॉकडाऊनमध्ये सर्व रेशन दुकाने कोविड नियमांचे पालन करून सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे केली आहे.
Leave a comment