रुग्णांच्या वेदना,हाल अपेष्ठा उघड्या डोळ्यांनी नीट पाहून जा
धनूभाऊ तुम्ही पालकमंत्री जिल्ह्याचे आहात
बीड । वार्ताहर
गेल्या काही दिवसांपासून परळी (नाथ्रा) मुक्कामी असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे केवळ परळी,अंबाजोगाईचेच पालकमंत्री आहेत की काय? अशी चर्चा आष्टी-पाटोदा शिरुर तालुक्यासह जिल्ह्यात होवू लागली आहे. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने धनंजय मुंडे आपण ध्वजारोहणासाठी येणारच आहात, ध्वजारोहणाला आलातच तर जिल्हा रुग्णालयातील कोव्हीड रुग्णांचे हाल पाहण्यासाठी स्वत: चक्कर मारुन जा, या रुग्णांच्या वेदना, हालअपेष्ठा तुम्ही उघड्या डोळ्याने नीट पहा, मगच तुम्हाला जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणारे अधिकारी किती कार्यक्षम आहेत याची प्रचिती येईल. ऐरवी राजकारणात काही होईल परंतु गोरगरिब आणि हाल अपेष्ठा सहन करणार्या जनतेचा तळतळाट लागणार नाही यासाठी काही तरी करा.जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, केवळ दोन तालुक्याचे नाहीत. निदान महाराष्ट्र दिनी तरी लोकांना न्याय देण्याचे पवित्र कार्य करा अशी भावना बीड शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
राष्ट्रवादीची मुलूख मैदानी तोफ म्हणून ज्यांनी पुर्ण महाराष्ट्र गाजवला त्या धनंजय मुंडेंचा आवाज मंत्रीपदाचा लाल दिवा मिळाल्यानंतर कुठे तरी गडप झाला आहे की काय, अशी परिस्थिती आहे. शासकीय बैठका असो किंवा कार्यकर्त्यांच्या बैठका असो, नेहमी आक्रमक असलेले धनंजय मुंडे गेल्या काही दिवसापासून शांतपणाची झालर अंगावर घेवून वावरत आहेत. जबाबदारीची जाणीव प्रत्येकाला होते, तशी ती त्यांनाही झाली असेल. संधीचे सोनं करण्याची क्षमता त्यांच्यात नक्कीच आहे. संधी त्यांच्या दारात आहे. परंतु सोनं करायचं की माती, हे धनंजय मुंडेंना ठरवायच आहे. कोरोनाच्या दुसर्या संकटामध्ये त्यांना अद्यापही संधीचं सोनं करता आलेलं नाही. रुणांना जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवीर मिळत नाही, ऑक्सीजनची टंचाई आहे, जेवण वेळेवर मिळत नाही. रुग्णालयामध्ये शिस्त नावाचा प्रकार नाही. रुग्णालयाती अधिकारी आणि कर्मचारी रुग्णांना आणि नातेवाईकांना अरेरावीची भाषा करतात, जिल्हा रुग्णालयासारख्या आरोग्य मंदिरामध्ये कमालीची अस्वस्थता, अस्वच्छता आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अशोक थोरात यांना जिल्ह्याबाहेर पाठवले आणि त्यांच्या जागी डॉ. सूर्यकांत गित्ते यांना आणले. गेल्या चार महिन्यात सूर्यकांत गित्तेंनी जिल्हा रुग्णालयासाठी काय नियोजन केले, याचा जाब पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडेंनी त्यांना विचारायला हवा. जिल्हा आरोग्य प्रशासनाचा आढावा त्यांनी अनेकवेळा घेतला मात्र जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेमध्ये सुधारणा झालेली नाही. त्यामुळे निदान आज 1 मे रोजी तरी जिल्हा रुग्णालयात जा, ज्याप्रमाणे तुम्ही लोखंडीला गेले, एसआरटीमध्ये फिरले त्याच पध्दतीने जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थाही पाहून या.म्हणजे काही तरी लोकांना फायदा होईल अशी भावनाही व्यक्त केली जात आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये येवूनही दुर्लक्ष
गेल्या पंधरा दिवंसापासून जिल्हा रुग्णालयातील अवस्था, रुग्णांचे होणारे हाल, औषधांचा तुटवडा, रेमडेसिवीरचा काळाबाजार, रुग्णालयीन कर्मचार्यांच्या अडचणी या संदर्भात जवळपास सर्वच दैनिक आणि प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात बातम्या प्रकाशित झाल्या. प्रसारमाध्यमांमध्ये समाजाचे प्रतिबिंब उमटते हे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्षात घ्यायला हवे. एखादी बातमी आकसापोटी येवू शकते, परंतु ज्यावेळी सार्वजनिक प्रश्न असतो, त्यावेळी प्रसारमाध्यमे तो प्रश्न उचलून धरतात. अशाही परिस्थितीत पालकमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये येणार्या बातम्याकडे दुर्लक्ष करावे आणि भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकार्यांना अभय द्यावे हेच मूळात दुर्देवी आहे.
टिवटिव करण्यापेक्षा गरिबांची किव करा!
कुठलाही प्रश्न असो, आपण समाजमाध्यमामध्ये सातत्याने विषय मांडतात. सोशल मीडिया हा राजकीय नेत्यांचा आवडता विषय झाला आहे. गेल्या वर्षभरात पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यासाठी भरपूर काही केल्याचे त्यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डलवर सांगीतले आहे. तशा बातम्याही सर्वच वर्तमानपत्रात आल्या आहेत. ट्विटरवर ‘टिवटिव’ करण्यापेक्षा सामान्य लोकांची ‘किव’ पालकमंत्र्यांना यायला हवी. त्यांचीही परिस्थिती बदलण्यासाठी केलेले प्रयत्न हे नक्कीच त्यांच्या फायद्याचे ठरणार आहेत.
Leave a comment