लसीकरण करणार्‍या यंत्रणांना ट्विट करून दिल्या शुभेच्छा..! 

 मुंबई । वार्ताहर

लसीकरणाचा दुसरा डोस घेणार्‍यांचे ’वेगळे’ आणि पहिला डोस घेणार्‍यांचे ’वेगवान’ नियोजन करणे हे आव्हानात्मक काम आहे, असे सांगत लसीकरण करणार्‍या सर्व यंत्रणांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. तथापि, रेमडेसीवर इंजेक्शन सारखा अन्याय लसीकरणाच्या बाबतीत बीड जिल्हयावर होऊ नये याची खबरदारी घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.
18 ते 44 वयाच्या नागरिकांना मोफत लस ही घोषणा महत्त्वाकांक्षी तरीही स्वागतार्ह आहे. सूक्ष्म नियोजन लस मिळवण्यासाठी आणि सुरळीत लसीकरण करण्यासाठी हे मोठे आव्हान आहे. जनतेचे स्वास्थ्य सुरक्षित ठेवण्याच्या आव्हानांना पेलण्यासाठी यंत्रणांना शुभेच्छा देत त्या म्हणाल्या, जेष्ठ नागरिक आणि लसीचा दुसरा डोस घेणार्या लोकांचे वेगळे नियोजन आणि 18 ते 44 वयोगटांतील लोकांचे वेगवान नियोजन  करावे लागेल. लसीकरण होताना विलंब अथवा दिरंगाई होता कामा नये. रेमडेसीवर सारखे वाटप अन्यायकारक होऊ नये हे अत्यंत महत्वाचे आहे.जास्तीत जास्त लसीकरण केंद्र कमीत कमी अवधी हे सूत्र करावे लागेल..लसींचा उत्पादन करणे, साठा बनवणे,तापमान नियंत्रित करणे यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे लागेल असे त्या म्हणाल्या.

शासनाने शब्द पाळावा 

येत्या 1 मे रोजी दुसरा डोस उपलब्ध करणे शासनाला क्रमप्राप्त आहे तो शब्द शासनाने जनतेला दिला आहे तो पाळलाच पाहिजे. केवळ केंद्र शासनावर जबाबदारी टाकून जमणार नाही. राज्याचे लसीकरण, रेमडेसीवरचे ऑडिट आणि दररोज याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे असे पंकजाताई मुंडे म्हणाल्या. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी लसींच्या किमती एवढी रक्कम कोविडच्या लढ्यात द्यावी, त्याचे एक स्पेशल पोर्टल बनवावे असेही त्यांनी सुचवले आहे.

 

बीडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवा

पंकजा मुंडंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना 

पत्र पाठवून मांडले जिल्ह्यातील वास्तव 

रेमडेसिवीर इंजेक्शनचा बीडमध्ये सर्रास काळाबाजार होत असून या इंजेक्शनचा वापर विशिष्ट पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते स्वतःच्या कार्यालयातून करत आहेत. हा सर्व प्रकार आपण स्वतः जातीने लक्ष घालून थांबवावा अशी मागणी करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जिल्हयातील वास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसमोर पत्राद्वारे मांडले आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपाचा गैरवापर कोणीही करू नये. कोणत्याही माणसाने केला तरी तो चुकीचा आहे असे अजित पवार यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले होते. हाच मुद्दा घेऊन पंकजाताई यांनी पत्रात म्हटले आहे की, माझ्या बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री आहेत. रेमडेसिवीरच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक यांच्याकडे या समस्यांचे उत्तर नाही.अनेक डॉक्टरांच्या स्वाक्षर्‍या घेऊन रेमडेसिवीर देण्यात आले असे दाखवण्यात आलेले आहे पण ते रुग्णांनाच काय डॉक्टरांनाही मिळाले नाहीत. दहशतीच्या वातावरणामुळे डॉक्टर्स यावर व्यक्त होत नसले तरी ही मी जबाबदार नागरिक म्हणून आपणास सांगते ही परिस्थिती सत्य आहे.
जिल्हा शल्यचिकीत्सक आणि जिल्हाधिकारी यांच्यावर प्रचंड दबाव आहे असे त्यांचे वर्तन अयोग्य आहे. प्रशासनावर येथील जनता अत्यंत नाखूष आहे. आपण जातीने यात लक्ष घालावे आणि कोरोना  काळात जनतेला न्याय देण्याच्या संदर्भात आपण जो स्पष्टवक्तेपणा व्यक्त केला आहे त्यावर आपण पावलं उचलली तर अनेक समस्यांचे निरसन होईल. रेमडेसिवीर इंजेक्शन हे वैयक्तिक कोणाच्या घरातून वाटप होत आहे, विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत आहे हे चूक आहे. आपण हे स्वतः बोललात याच्या विपरीत बीडमध्ये व्यवहार होत आहे. आपण यात लक्ष घालावे आणि याबाबतीत आपण कानउघाडणी नक्कीच करावी, कारण नागरिकांच्या जीवन-मरणाचा हा प्रश्न आहे. कोणतेही औषध, कोणतीही लस, कोणताही उपचार ही कोण्या पक्षाची, वर्गाची मक्तेदारी नाही. त्यामुळे यात सर्वांना समान न्याय मिळेल यासाठी आपण लक्ष द्याल अशी अपेक्षा पंकजाताई मुंडे यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.