बीड । वार्ताहर

कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी अख्या जगासह देशात स्वच्छतेबाबत जनजागृती सुरू असताना बीड नगर परिषदेला स्वच्छतेबाबत गांभीर्य राहिलं नसल्याचे दिसत आहे. गेल्या एक महिन्यांपासून बीड शहर लॉकडाऊन असतानाही शहराच्या मध्यवर्ती भागातील मोठ्या नाल्यांसह शहरातील ओढे व नाले झाडाझुडपांनी, कचर्‍याच्या दलदलीने भरलेले दिसून येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब, आपण स्वतः लक्ष घालून बीड शहराला घाणीच्या विळख्यात जाण्यापासून वाचवावे, आम्ही रस्त्यावर उतरून आपणास मदत करण्यास तयार आहोत अशा भावना नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

अमर नाईकवाडे यांनी म्हटले आहे, महिनाभरातील लॉकडाऊनच्या काळात कसलाही अडथळा न होता मोठ्या प्रमाणात व प्रभावीपणे पावसाळी पूर्व स्वच्छता मोहीम राबवता आली असती, परंतु पालिकेने तसे न करता लॉकडाऊन पूर्वीपासून शहरात स्वच्छतेचं काम करत असलेले 100 गारुडी मजूर बंद केले, जे मूळ पालिकेतील स्वच्छतेचं काम करणारे मजूर आहेत त्यांना शहरातील गाड्या पकडणे, व्यापार्‍यांना दंड लावणे अशी कामे दिली. परिणामी स्वच्छतेवर काम करणार्‍या मजुरांची संख्या कमी झाली, चालू असलेल्या घंटागाड्या बंद केल्या, घंटागाडी सुरू करण्यासंदर्भात बीड नगर परिषदेच्या जानेवारी महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला होता, परंतु अद्याप देखील घंटागाडी टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही असा आरोपही नाईकवाडे यांनी केला आहे. घंटागाडी बंद असल्यामुळे शहरातील प्रत्येक घरातुन रोज जमा होणारा कचरा तसाच घरोघरी साठवण्यात येत आहे, त्यामुळे भविष्यात नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न उद्भवू शकतो.

सद्यस्थितीत बीड शहरातील बस स्टॅन्ड मागील, सुभाष रोड, मोंढा रोड, माळीवेस ते सावता माळी चौक, राजुरी वेस ते सुभाष रोड भागासह शहरातून वाहणार्‍या मोठ्या नाल्यांची व आकाशवाणी ते विप्रनगरमार्गे बिंदुसरा नदी भागातून वाहणार्‍या ओढ्याची स्थिती पाहता एखादा जरी अवकाळी पाऊस झाला तर शहराला गटारी तळ्याचे स्वरूप येईल परिणामी जिल्हा प्रशासन कोरोना संसर्गापासून शहराचा बचाव करण्यासाठी आतापर्यंत घेत असलेल्या यशस्वी उपाय योजना फोल ठरतील, परिणामी कोरणा संसर्ग वाढण्यास पोषक वातावरण तयार होईल, त्यामुळे कलेक्टर साहेब आपण स्वतः लक्ष घालून बीड शहराला घाणीच्या विळख्यात जाण्यापासून वाचवावे, अशी मागणीही नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी पत्रकातुन केली आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.