नवी दिल्ली -

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसर्‍या कार्यकाळातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशवासियांना एक जाहीर पत्र लिहिले आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर पीएम मोदींनी २०१९ मध्ये दुसऱ्यांदा सत्ता मिळवली. ज्याला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. जनतेला लिहिलेल्या या पत्रात पंतप्रधानांनी गेल्या १ वर्षात सरकारच्या कामगिरीचा उल्लेख केला आहे. सरकारच्या कारभाराचा लेखाजोखा देताना ते म्हणाले की, सरकारने पूर्ण सावधगिरीने, संवेदनशीलतेने काम केले आहे. पंतप्रधानांनी देशवासियांना सांगितले की, गेल्या वर्षभरात तुमच्या आपुलकी, शुभेच्छा आणि सक्रिय सहकार्यामुळे मला सतत नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली. जाणून घ्या पंतप्रधानांच्या पत्रातील १० महत्त्वाच्या गोष्टी.

पंतप्रधान मोदींनी लिहलेल्या पत्रातील १० महत्त्वाच्या गोष्टी:

  1. एक वर्षापूर्वी भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये एक नवीन सुवर्ण अध्याय जोडला गेला. देशात अनेक दशकांनंतर पूर्ण बहुमताच्या सरकार सलग दुसऱ्यांदा जनतेने निवडून दिलं. हा सुवर्ण अध्याय रचण्यात आपली मोठी भूमिका आहे. अशा परिस्थितीत, हा दिवस माझ्यासाठी तुमच्यासमोर नतमस्तक होण्याचा आहे, भारत आणि भारतीय लोकशाहीबद्दल आदर व्यक्त करण्याची ही संधी आहे. जर बाहेरील परिस्थिती सामान्य असती तर मला तुमच्यामध्ये येण्याचा आणि तुमचं दर्शन घेण्याची संधी मिळाली असती. परंतु जागतिक महामारीमुळे जी परिस्थितीत निर्माण झाली आहे ते लक्षात घेता मी या पत्राद्वारे आपल्याला प्रणाम करण्यासाठी आणि तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.
  2. २०१९ साली देशातील जनतेचे आशीर्वाद हे देशातील मोठ्या स्वप्नांसाठी होते. आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी होते. या एका वर्षात घेतलेले निर्णय म्हणजे या मोठ्या स्वप्नांचे उड्डाण आहे. आज लोकांशी निगडित लोकांच्या मनाची शक्ती ही राष्ट्राची जाणीव प्रज्वलित करते. गेल्या एका वर्षात, देशाने सतत नवीन स्वप्ने पाहिली आहेत, नवीन संकल्प केले आणि हे संकल्प सिद्धीस नेण्यासाठी सतत निर्णय घेऊन पुढे जात राहिलो.
  3. भारताच्या या ऐतिहासिक प्रवासात प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग आणि देशातील प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य योग्यरितीने बजावले आहे. आज 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या मंत्राने देश सामाजिक, आर्थिक, जागतिक किंवा अंतर्गत प्रत्येक गोष्टीत पुढे जात आहे.
  4. गेल्या एका वर्षात काही महत्त्वपूर्ण निर्णयांवर खूप चर्चा झाली आणि यामुळे या कामगिरी स्मरणात राहणे अगदी स्वाभाविक आहे. कलम ३७०, राम मंदिर निर्माण, ट्रिपल तलाक किंवा नागरिकता दुरुस्ती कायदा या सर्व कामगिरी सर्वांच्या आजही स्मरणात आहे.
  5. या ऐतिहासिक निर्णयांमध्ये अनेक निर्णय आणि बदल आहेत, ज्याने भारताच्या विकासाच्या प्रवासाला नवीन वेग आणि नवीन उद्दीष्टे दिली आहेत. लोकांच्या अपेक्षा देखील पूर्ण केल्या आहेत. चीफ ऑफ डिफेंस स्टाफ या पदामुळे सैन्यात समन्वय वाढविला आहे, तर मिशन गगनयानच्या तयारीसाठीही भारताने वेग वाढवला आहे. या दरम्यान, गरीब, शेतकरी, महिला आणि तरूणांना सक्षम बनविणे याला आमचे प्राधान्य आहे.
  6. आता देशातील प्रत्येक शेतकरी हा पंतप्रधान सन्मान निधी निधीच्या कक्षेत आला आहे. गेल्या एक वर्षात या योजनेंतर्गत नऊ कोटी पन्नास लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ७२ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. देशातील १५ कोटींहून अधिक ग्रामीण भागातील घरांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी पाईपाने पोहचविण्यात आले. यासाठी जल जीवन मिशन सुरु करण्यात आलं. ५० कोटींहून अधिक जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी मोफत लसीकरणाची एक मोठी मोहीमही राबविली जात आहे.
  7. मच्छिमारांना अधिक सुविधा मिळाव्या आणि ब्ल्यू अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व्यापारी कल्याण मंडळ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बचतगटाशी संलग्न 7 कोटी बहिणींना आता अधिक आर्थिक पाठबळ दिले जात आहे. या बचत गटांना हमींशिवाय कर्जमर्यादा दहा लाखांवरून २० लाख रुपये करण्यात आली आहे.
  8. सामान्य लोकांच्या हिताशी संबंधित चांगले कायदे तयार व्हावेत यासाठी गेल्या वर्षात वेगवान काम केले गेले आहे. आमच्या संसदेने आपल्या कामकाजाने दशकांपूर्वीचे विक्रम मोडले आहेत. याचाच परिणाम म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा असो की, चिट फंड कायद्यात दुरुस्ती असो, दिव्यांग, महिला व मुलांना अधिक संरक्षण देणारे कायदे असो, हे सर्व कायदे वेगाने तयार करण्यात आले आहेत. सरकारच्या धोरण आणि निर्णयांमुळे शहरे व खेड्यांमधील दरी कमी होत आहे.
  9. कोरोना व्हायरसचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, आम्ही वेगाने पुढे जात होतो तेव्हाच कोरोना व्हायरस या जागतिक महामारीने भारताला वेढले. अनेकांना भीती होती की, भारत जगासाठी समस्या बनेल जेव्हा कोरोना व्हायरस भारतात येईल. पण आज सर्व देशवासीयांनी भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलून टाकला आहे. जगातील शक्तिशाली आणि संपन्न देशांच्या तुलनेत भारतीयांची सामूहिक सामर्थ्य व क्षमता अभूतपूर्व आहे. हे आपण सिद्ध करून दाखवले आहे.
  10. स्थलांतरित कामगारांबद्दल पंतप्रधान म्हणाले की, एवढ्या मोठ्या संकटात कुणालाही दु:ख झाले नसेल किंवा गैरसोय झाली नसेल असा दावा करु शकत नाही. कामगार, स्थलांतरित कामगार, छोट्या उद्योगात काम करणारे मजूर, फेरीवाले, दुकानदार, छोटे उद्योजक यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. पण आम्ही त्यांच्या अडचणी दूर करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. परंतु आपल्याला हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की, तुमचं जीवन धोक्यात येऊ नये यासाठी हे सगळे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे काही प्रमाणात आपली गैरसोय होत आहे. पण यातून लवकर बाहेर पडायचं असेल तर प्रत्येक भारतीयाने यासंबंधी नियम काटेकोरपणे पाळणं फार आवश्यक आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.