वाहनाचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना पंकजाताई मुंडे यांनी तितक्याच मुद्देसूदपणे दिले उत्तर

मराठा आरक्षणाला कधीही  विरोध नाही; सामाजिक सौहार्द बिघडू देऊ नका

माजलगाव । 

या राज्यात जे चाललंय त्यात माझा दोष काय? मी माझ्या समाजात जन्म घेतला हा माझा दोष नाही तर ती माझी शक्ती आहे. मी कधी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, की कधी कुणाच्या अंगावर माणसं घालण्याचा प्रयत्न केलेला नाही. लोकशाहीमध्ये मतदारांसमोर जावून विनम्रतेने त्यांना मतं मागणं हा माझा अधिकार असताना मराठा आरक्षण मागणीच्या मुद्यावरुन गावात आल्यानंतर महिला उमेदवाराच्या वाहनाला गराडा घालणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात घडणे दुर्देवी आहे. छत्रपती शिवरायांनी महिलेचा आदर करायला आपल्याला शिकवलं आहे.
एखाद्या महिलेला अडवणं आणि घोषणाबाजी करून बोलू न देणं हे अठरापगड जातीच्या धर्माच्या लोकांना बरोबर घेवून स्वराज्य स्थापन करणार्‍या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही असं संयमी आणि मुद्देसूद उत्तर भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी प्रचारा दरम्यान बोलतांना दिलं.

  पंकजाताई मुंडे यांनी आज माजलगाव तालुक्यातील  मतदारांशी संवाद साधत गाठीभेटी घेतल्या. या दरम्यान  काही जणांनी मराठा आरक्षणाची मागणी पुढे करत लऊळ, किट्टी आडगाव येथे पंकजाताई मुंडे यांच्या वाहनाचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पंकजाताई मुंडे यांनी कोणावरही नाराज न होता, या प्रकारानंतरही उपस्थित सर्व समाजातील मतदारांसमोर जावून संयमाने आपली भूमिका विषद केली.  मराठा आरक्षणाच्या मागणीला माझा आणि आमच्या कोणाचाच कधीही विरोध राहिलेला नाही हे सांगत  पंकजाताईंनी यावेळी सर्व महापुरुषांच्या समर्थनार्थ घोषणा देत हे सर्व महापुुरुष मिळून समाज असतो, त्या सर्वांच्या विचारांतून आपण पुढे वाटचाल करतो आहोत असे सांगितले.

पंकजाताई म्हणाल्या, महाराष्ट्राची मर्दानी, रणरागिणी, गोरगरीब कष्टकरी, शेतकरी, ज्यांना कोणी वाली नाही त्यांच्यासाठी लढते आहे.अशा परिस्थितीत एका महिलेला अडवणे आणि घोषणाबाजी करून बोलू न देण हे अठरापगड जातीच्या धर्माच्या लोकांना बरोबर घेवून स्वराज्य स्थापन करणार्‍या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शोभणार नाही. एका महिलेला अडवायला  जाताना छत्रपतीच्या विचारांची आठवण झाली नाही का? समाजात दुही निर्माण करण्यासारखी कृत्य करायची असतील तर खुशाल करा पण किमान छत्रपती शिवरायांच नाव तरी घेवू नका रे! छत्रपती आमचे पण आहेत!  संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत. आम्हास माहीत आहे ही मोजकीच लोक आहेत.

सामाजिक सौहार्द बिघडू देऊ नका - कळकळीची विनंती

ज्यांच्यामध्ये स्वाभिमान, अभिमान आहे, ज्यांच्यामध्ये लढण्याची शक्ती आहे, अशा सर्वांना माझी विनंती आहे, एक महिला विन्रमतेने मतदान मागायला तुमच्याकडे आल्यानंतर जर असे तिला वागणार असाल तर हे चूकीचे आहे. छत्रपती शिवरायांनी महिलेचा आदर करायला आपल्याला शिकवलं आहे. हे जे काही चालले आहे, यावर आपण सर्वांनी योग्य तो निर्णय घ्यावा असं पंकजाताई म्हणाल्या.

खोट्या केसेस झाल्या तर उपोषण करेन पण कुणाचा स्वाभिमान दुखावू नका

माझ्या जिल्ह्यातील सर्व जाती-धर्माचं सामाजिक सौहार्द बिघडू नये अशी मी तुम्हाला विनंती करते. माझ्या माता-मावल्यांनाही माझे सांगणे आहे, तुमच्या सर्वांच्या कोणत्याही जातीधर्मातील लेकरांची काळजी घेण्यासाठी मी पुढाकार घेईल. कोणावरही खोट्या केसेस झाल्या तर पंकजा मुंडे त्यांच्यासाठी आमरण उपोषण करेल मात्र कोणाचा सन्मान कोणीही दुखावला नाही पाहिजे. असे प्रकार काही गावात होवू शकतात, मात्र असे प्रकार करुन मराठा आरक्षणासाठी लढा देणारे योध्दे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा कोणीतरी गैरवापर करतयं याची मला कल्पना आहे, मात्र यामुळे मराठा आरक्षणासाठी लढा देणार्‍या समाज बांधवांची अडचण निर्माण होईल. आपल राज्य लोकशाहीचं आहे.  त्यामुळे कोणाचा सन्मान कोणीही दुखावला नाही पाहिजे असे आवाहनही पंकजाताई मुंडे यांनी यावेळी करत संयमाने ही सर्व परिस्थिती हाताळत आपल्यातील मनाचा मोठेपणा दाखवून दिला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.