बीड । वार्ताहर
ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास योजनेतून बेलूरा येथील तुळजाभवानी देवस्थान आणि उमरद जहांगिर येथील देवस्थानसाठी चार कोटी रूपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे बीड मतदारसंघाचे नेते बळीराम गवते यांनी दिली आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, बेलूरा (ता.बीड) येथील तुळजाभवानी देवस्थान येथील विकास करण्याची मागणी ग्रामस्थ करत होते. या मागणीनूसार पालकमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अमरसिंह पंडित यांच्या माध्यमातून सदरील कामांसाठी निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू केला. याठिकाणी 1 कोटी 97 लक्ष रूपये ग्रामविकास विभागाने दि.14 रोजी मंजूर केले आहेत. तसेच उमदर जहांगिर येथील ग्रामस्थांनी पंचायत समिती सदस्य सचिन शेळके यांच्या माध्यमातून श्री.क्षेत्र आक्रुर देवस्थानाचा विकास करण्याची मागणी केली होती. यात शेळके यांनी पाठपुरावा केला असून या देवस्थानसाठी 2 कोटी रूपयांच्या निधीस मंजूरी मिळालेली आहे.दोन्ही ठिकाणी येणार्या काळात मोठी विकासाचे कामे होणार असून मंदिरांचा कायापालट होणार आहे. बेलूरा येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात याआधी देखील बबनराव गवते यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आलेले असून आता 1 कोटी 97 लक्ष रूपयांच्या निधीस मंजूरी मिळालेली असल्याने कायापालट होणार आहे. बेलूरा हे गाव धाकटी पंढरी श्री.क्षेत्र नगद नारायण गडाच्या पायथ्याला असून याच मार्गावरून जिल्ह्यातील भावीक गडावर ये-जा करत असतात. गावातील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कायम याठिकाणी गर्दी असते. भाविक भक्तांच्या विविध सोयीसुविधा पुरविण्यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे.पालकमंत्री धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झालेला असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवून विकास कामे सुरू केली जाणार आहेत. देवस्थानचे मोठे काम होत असल्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया बळीराम गवते यांनी दिली.
Leave a comment