पितृ पंधरवड्याच्या कालावधीत अवास्तव कर्मकांडांची मिसळ केली गेल्यास मूळ हेतू बाजूला पडण्याची शक्यता असते. सध्याच्या वेगवान युगात या सर्व कृतींवर विश्वास असेल किंवा त्यासाठी पुरेसा वेळ देणं शक्य होईल, असं नाही. आपल्याला लहानाचं मोठं करण्यासाठी खस्ता खाणार्‍या पूर्वजांबद्दल, पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांना समाधान होईल असं आचरण करणं हा पितृपक्षाचा मूळ हेतू. आजही या काळाचं महत्व मोलाचं आहे.

कमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ या ग्रंथात सहाव्या अध्यायात पितृपक्ष या विधीचं महत्त्व सांगितलं आहे. तसंच आपल्या ग्रंथांमध्येही ‘देव पितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम्’ असं म्हतलं आहे. म्हणजेच ईश्वराच्या व पीतरांच्या कार्यात हेळसांड करू नये. पित्रपक्षाचं महत्व समाजाला मान्य आहे, मात्र काळाबरोबर सर्वच गोष्टी बदलत असतात हे ही खरं आहे. कुठलेही सणवार, पूजाविधी यामधलं मूळ तत्व तसंच ठेवून, आचरणात आणण्याच्या पद्धतीत मात्र वरचेवर बदल घडत जातात. हे सहाजिकही आहे. पूर्वीच्या काळी विवाह सोहळा आठ-दहा दिवस चालायचा. कारण त्यावेळी लग्नकार्यही घरातच होत असत. शेतीतून आलेलं धनधान्य विपुल होतं आणि लोकांना आनंद साजरा करण्यासाठी वेळही भरपूर असायचा. पण लोकांनी काळानुसार अर्थार्जनासाठी नोकरी करायला सुरुवात केली. वेळही मिळेनासा झाला. एकूणच जीवनपद्धत बदलली. त्यामुळे पूर्वीचा चार-आठ दिवस चालणारा लग्नसोहळा आता एक ते दीड दिवसातच शानदारपणे पार पडतो पण त्यात वधू-वरांची जन्मगाठ बांधणं, नातेवाईकांच्या उपस्थितीत सोहळा आनंदानं साजरा होणं, हा मूळ हेतू अचूक साध्य होतो. हा बदल सर्वांनाच सुखावह असल्यामुळे समाजानं आनंदानं मान्य केला. सहज सोपं ते म्हणजे मर्म. पितृ पक्षांच्या बाबतीतही पितरांच्या आत्म्याला शांती देणं, त्यांचं स्मरण करणं हा मूळ हेतू साध्य करून आचरणात आणण्याची पद्धत मात्र बदलत चालली आहे. श्रांत विधींसाठी होणारा खर्च आता गोरगरिबांना अन्नदान करण्यात, वस्त्रदान करण्यात वापरला जातो. हे वळण अनुसरणीय आहे.
आज पितृपक्षामध्ये काही लोक समाजसेवी संस्थांना, अनाथाश्रमांनाही देणगी देतात. त्या दिवशी काहीजण वृद्धाश्रमातल्या लोकांना पक्वान्नाचं जेवण  देतात. अशा प्रकारे आपल्या प्रिय पितरांचं स्मरण करत असतात. काही ठिकाणी तर मृत व्यक्तीला ज्या खेळाची, कलेची किंवा ज्या विशेष गोष्टीची आवड राहिली असेल त्या खेळातल्या, कलेतल्या नामवंत कलाकारांना त्या व्यक्तीच्या नावानं पुरस्कार दिला जातो. या सर्व बाबी शास्त्राला  धरुनच आहेत. आपल्या ग्रंथकर्त्यांनी पितृपक्षाची योजना करताना पितरांना शांती देण्यासाठी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या सगळ्यामागे समाजसेवा, पर्यावरण आणि विज्ञानाचाही खूप मोठा विचार केला आहे, असं दिसून येतं. या संदर्भात विशेषतः अन्नदान, आर्थिक मदत आणि वस्त्रदान याचं महत्त्व सांगितलं आहे. ते आजच्या कोरोनाकाळात अडचणीत आलेल्या गोरगरिबांना खूप उपयुक्त असं आहे, हे तीव्रतेने जाणवतं. ग्रंथकारांनी सांगितल्याप्रमाणे तिथीवर भोजन घालून मृतात्म्याच्या आवडीचा पदार्थ करावा असं सांगितलं आहे. म्हणजेच यात अन्नदानाचा हेतू आहे. एखाद्या गरीब कन्येचा विवाह लावून द्यावा, गरजू रुग्णांना मदत करावी, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी असं सांगितलं आहे. तसंच शक्य असेल त्यांनी मंदिर, धर्मशाळा बांधाव्यात, रस्त्यामध्ये पाणपोईची सोय करावी, असंही सांगितलं आहे.
या सर्वांमागे समाजसेवा आणि समाजाचं ऋण फेडण्याचे संस्कार आहेत.  पितृपक्षात वड आणि पिंपळ यांची झाडं लावावीत, पाणी घालून पूजा करावी, झाडं कापू नयेत असं सांगणं हा पर्यावरणाचा विचार आहे. पितृपक्षात मांसाहार करू नये, शिळं अन्न खाऊ नये असं सांगितलं आहे कारण त्यावेळी हवा प्रदूषित असते. त्यामुळे असं अन्न पचायला जड जातं. तसंच प्राण्यांमधल्या मादीचा हा प्रसवकाळ असतो. त्यामुळे मांसाहार न करणं उचितच आहे. या काळात पशुपक्ष्यांना धान्य, पाणी देणं हा सुद्धा त्याचाच संस्कार आहे. संध्याकाळी देवासमोर दिवा लावून नागस्तोत्र, नवग्रहस्तोत्र, पितृस्तोत्र इत्यादी स्तोत्रं म्हणावीत, इष्ट दैवतांचं, कुलदैवतांचं पूजन करावं असं सांगण्यामागे आपले संस्कृतपठणाचे आणि देवधर्माचे संस्कार यांची आठवण देण्याचा उद्देश आहे. आता साधी गोष्ट घ्या. पितृपक्षाच्या काळात दारी आलेल्या कुठल्याही अतिथीचा अपमान करू नये असं ग्रंथकार सांगतात. कारण आपले पितर कुठल्याही रुपाने आपल्या घरी येत असतात असं म्हणतात. वास्तविक, ‘अतिथी देवो भव’ हा भारतीय संस्कार आपण नेहमीच पाळत असतो पण त्याबरोबर पितरांची आठवण दिली की तो संस्कार मनावर पक्का ठसतो, हाच उद्देश असावा. या बदललेल्या पद्धतीचं ग्रंथकारांनी सांगितलेल्या नियमांशी खूपच साम्य आढळून येतं. त्यामुळेच म्हणावंसं वाटतं की बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार या बदललेल्या पितृपंधरवडयाच्या पद्धतींचा मोकळ्या मनानं स्वीकारच करायला हवा. कारण तेच सोयीचं आहे.
अगदी आत्ता-आत्तापर्यंत लोक एक वेळ सणाला एकत्र येत नसत पण, घरातल्या पितृकर्माला आवर्जून उपस्थित रहात. देवाच्या आशीर्वादाबरोबरच पितरांचा आशीर्वाद महत्त्वाचा, अशी आजही अनेकांची प्रबळ धारणा आहे. ही धारणा काही देवो अथवा न देवो, घराला एकत्र बांधून ठेवते याबाबत मात्र शंका घेऊ नये. या पंधरवड्याच्या कालावधीत अनेक धार्मिक बाबी पार पाडल्या जातात. त्यात बरेचदा अवास्तव कर्मकांडांची मिसळ केली गेल्याने मूळ हेतू बाजूला पडण्याची शक्यता असते. सध्याच्या वेगवान युगात प्रत्येकाचा या सर्व कृतींवर विश्वास असेलच किंवा त्यासाठी पुरेसा वेळ देणं शक्य होईलच, असं नाही. ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं करण्यासाठी खस्ता खाल्या, मोहांना टाळून कसं पुढंं जावं याचा आदर्श घालून दिला त्या आपल्या पूर्वजांबद्दल, पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांना समाधान होईल असं आचरण करणं हा पितृपक्षाचा मूळ हेतू असतो. पितरांच्या उपकारांची उतराई होण्याचा सोहळा म्हणजे पितृपक्ष पंधरवडा. पितरांचं एखादं अपुरं ध्येय पुत्राने अगर कन्येने पूर्ण करण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारल्याने पिता अगर माता निश्चितपणे संतुष्ट होतील. हे करत असताना पुत्राला अगर कन्येलाही समाधान मिळेल. पितरांची आठवण करण्याचे हे दिवस पवित्र मानले पाहिजेत. आपल्यालाही पितरांप्रमाणे एक दिवस जायचं आहे, याचं भान याच दिवसात मनावर ठसलं जातं. या श्राद्धपक्षात सत्कृत्याचे पाथेय बांधण्याची मनाची जिद्द वाढते. एकदा सत्कृत्याचे पाथेय बांधण्याचा निश्चय केला की जीवन अधिकाधिक क्रियाशील बनतं. 
बरेचदा पितृ पंधरवड्याचा हा काळ अनिष्ट समजला जातो. या काळात नवी खरेदी, मंगल कार्याचा शुभारंभ केला जात नाही . समाजातला एक वर्ग अजूनही या काळाला नाकं  मुरडतो. पण हळूहळू समाजाच्या समजुतीत बदल घडू लागला आहे. समाज जुन्यासोबत नव्या विचारांची गुंफण करून नवी विचारधारा प्रवाहीत करत आहे. त्यामुळे या काळातही काही नवीन कामांचा श्रीगणेशा होतो. अगदी मोठी खरेदी होत नसली तरी बाजारातील कमी वर्दळ, मागणीअभावी कमी पातळीवर गेलेले भाव यांचा लाभ घेण्यासाठी पुढच्या उत्सवकाळात खरेदी करण्यासाठी या पंधरवड्याचा काळ उचित समजला जातो. या कार्यक्रमांचा अधिक गाजावाजा न करता आवश्यक ते उपचार करुन दिनक्रम सुरू ठेवणं ही आजची गरजच आहे. त्यामुळे बर्‍याच घरांमधून कर्मकांडाचा अतिरेक न करता विशिष्ट तिथीला दानधर्म करणं, वृद्धाश्रमात अथवा अनाथालयात अन्नदान वा इतर वस्तूंचं दान करणं, गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं ही स्त्युत्य कर्मं पार पाडली जातात. समजुतीने घेतलेलं हे चांगलं वळण आहे असं म्हणावं लागेल.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.