मराठा आरक्षणासाठी सोमवारी बीडमध्ये मोर्चा-आ.सुरेश धस
बीड । वार्ताहर
राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवता आले नाही. आता विनंती याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र त्यात सरकारने हलगर्जीपणा करू नये अशी अपेक्षा व्यक्त करत भाजप आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारवर टिका केली. मराठा समाजाचा आवाज ज्याला भाजपने पाठींबा दिलेला आहे. तो आवाज सरकारच्या कानापर्यंत जावा यासाठी सोमवार दि.28 जुन रोजी बीडमध्ये मराठा आरक्षण मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आ.सुरेश धस यांनी दिली.
गुरुवारी (दि.24) बीड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ.सुरेश धस म्हणाले, राज्य सरकारला मराठा आरक्षण टिकवता आले नाही, फडणवीस सरकारने कोर्टात आरक्षण टिकवलं मात्र या सरकारला ते जमलं नाही. आरक्षण हा मराठा समाजाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सोमवार दि.28 जुन रोजी बीडमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासुन जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात परवानगी मिळो अथवा न मिळो. 28 जून रोजी मोर्चा काढणारच असे ठणकावुन सांगितले. आत्तापर्यंत माझ्यावर 21 गुन्हे दाखल आहेत. आता 22 वा गुन्हा दाखल झाला तरी काहीच हरकत नसल्याचे आ.धस म्हणाले.
आरक्षणासोबतच तातडीने पिककर्ज वाटप करावे, पिकविम्याचा बीड पॅटर्न उलट्या दिशेने चाललाय, यामध्ये चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, ऊसतोड मजुर, मुकादम यांच्यासाठी कायदा करूर 67% भाववाढ द्यावी, कोविड कार्यकाळात काम केलेल्या कंत्राटी कर्मचार्यांपैकी पात्र कर्मचार्यांना आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या भरतीत थेट नियुक्ती द्यावी अशा मागण्या या मोर्चाच्या माध्यमातुन केल्या जाणार असल्याचे भाजप आ.सुरेश धस यांनी सांगितले. कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही करण्यात येणार आहे.
कंत्राटी कर्मचार्यांवर अन्याय होवू देणार नाही
कंत्राटी कर्मचार्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालुन कोरोना काळात ड्युटी केली. आता आरोग्य विभागासह वैद्यकीय शिक्षण विभागासह भरती प्रक्रियेमध्ये या कर्मचार्यांना थेट प्राधान्य द्यावे अशी मागणी आ.धस यांनी केली. ऐनवेळी नव्या लोकांना नौकर्या दिल्यास कंत्राटी कर्मचार्यांवर अन्याय होईल. हे आता अजिबात चालणार नाही असा इशारा आ.धस यांनी दिला.
घरकुलांसाठी वाळू द्यावी
जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये वाळुघाट नाहीत. यामध्ये आमचा काय दोष, येथील लोकांनी वाळू आणायची कोठून ? असा प्रश्न उपस्थित करून किमान शासकीय योजनेतंर्गत बांधण्यात येत असलेल्या घरकुलांसाठी तरी 5 ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आ.धस यांनी केली.
Leave a comment