पोलीस दलाच्या 151 दुचाकी, 9 वाहनांसह 10 रुग्णवाहिकेंचे लोकार्पण
बीड | वार्ताहर
बीड जिल्हा पोलीस दल सर्व साधनांनी सक्षम झाले पाहिजे. हे पालकमंत्री झाल्यापासून माझे स्वप्न होते. आज पोलीस दलासाठीच्या विविध वाहनांचा लोकार्पण सोहळा संपन्न होत असल्याचा अविस्मरणीय आनंद होत असून पोलीसांच्या केवळ मनगटात ताकद असून तर चालणार नाही तर पोलीसांना लागणार्या विविध साधनांनी सक्षम करता आले पाहिजे हा ध्यास होता. तो आज पुर्ण झाला आहे. बीड जिल्हा आता गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलीसांनी अधिक चांगले काम करावे, कोरोनाच्या काळात मागील दीड ते दोन वर्षापासून पोलीस दलाने अतिशय चांगले काम केले. जिल्हा पोलीस दल कायम कार्यतत्पर राहिले याचा अभिमान वाटतो. पोलीसांच्या चांगल्या कामासाठी आणि बीड जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने ही ती मदत करेल अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
बीड जिल्हा पोलीस दलासाठी 9 चारचाकी व 151 दुचाकींचा लोकार्पण सोहळा आज मंगळवारी (दि.22) दुपारी 12 वाजता पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते पार पडला. तसेच या कार्यक्रमानंतर जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात आलेल्या दहा रुग्ण वाहिकेंचेही पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मुख्यालयावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सर्व प्रथम पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते वाहनांचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा पोलीस अधिक्षक आर.राजा, सीईओ अजित कुंभार, अपर अधीक्षक स्वाती भोर, सुनील लांजेवार, उपअधीक्षक (गृह) उमेश कस्तुरे,सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत व जनसंपर्क अधिकारी सहायक निरीक्षक विलास हजारे, आ.संदीप क्षीरसागर, आ.संजय दौंड, माजी आ.सुनील धांडे, सय्यद सलीम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे,सचिन मुळूक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, चंद्रकांत नवले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हा पोलीस दलाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरींचा तसेच कम्युनिटी पोलिसींगसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचा लेखाजोखा मांडलेल्या ‘ध्यासपर्व’ या पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी धनंजय मुंडे म्हणाले बीड जिल्हा भौगोलिक दृष्ट्या व्यापलेला आहे. त्यामुळे अनेकदा गुन्हे वाढलेले दिसतात आणि पोलीसांची साधनेही अपुरी पडत होती. मात्र आता पोलीस दलासाठी दुचाकी आणि चार चाकी वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्हा पोली दलाच्या ताकदीवर कोणीही गुन्हा करण्याची हिम्मत करु नये इतकीच शासनाची अपेक्षा आहे. जिल्हा पोलीस दलाने कार्यान्वीत केलेल्या विविध पथकामुळे गुन्हेगारी कमी होण्यास निश्चित मदत होईल. जिल्हा पोलीस दल ही कायम कार्यतत्पर असल्याचा अभिमान आहेे. पोलीस ठाण्यात आता पुरुष अंमलदारांबरोबरच महिला अंमलदारही एक महत्वाचे बीट सांभाळणार आहे हे प्रेरणादायी आहे. यापुढे बीड जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी तसेच पोलीसांच्या चांगल्या कामासाठी पालकमंत्री या नात्याने हवी ती मदत करण्यासाठी आपण तत्पर राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रारंभी पोलीस अधिक्षक आर.राजा यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले, महिला विषयक गुन्ह्यांची वेळेवर दखल घेण्यासाठी व गुन्हे निर्गती करण्यासाठी पिंक मोबाईल हे पथक कार्यान्वीत करण्यात आले असून यात महिला अधिकारी काम पाहतील तसेच कोणतीही तक्रार आल्यास त्या नागरिकाची तक्रार अथवा समस्या सोडवण्यासाठी मोबाईल बाईक कार्यान्वीत करण्यात आली आहे. तसेच यापूर्वीच पोलीस ठाण्यांची रंगरंगोटी करुन पडीक मुद्दे मालाची निर्गती करुन पोलीस ठाणे परिसर स्वच्छ करुन घेण्यात आला आहे. या उपक्रमात बीड जिल्हा पोलीस दल औरंगाबाद परिक्षेत्रात अव्वल आले आहे. तसेच गंभीर गुन्ह्यातील फरारी न्यायालयासमोर हजर केले गेले. जिल्हा पोलीस दलाने मागील काही महिन्यात केलेल्या सर्व कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ध्यासपर्व हे पुस्तक आज प्रकाशीत होत आहे. पोलीस दलाच्या नाविन्यपुर्ण उपक्रमासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी पोलीस दलाला सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले. उपस्थितांचे आभार अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी मानले.
112 हेल्पलाइन
जिल्ह्यात महिला, अल्पवयीन मुलींच्या अत्याचारासंबंधीच्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी पिंक मोबाइल व्हॅन उपलब्ध होणार आहे. याशिवाय डायल ’112’ या हेल्पलाइनची सुविधाही सुरु होणार आहे. या माध्यमातून अवघ्या दहा मिनिटांत दुचाकींवरुन पोलीस नागरिकांच्या मदतीला धावून जातील. यासाठी 9 चारचाकी व 151 दुचाकी उपलब्ध झाल्या आहेत.
Leave a comment