- Home
- Blogs
- Lokprashna's blog
- राज्यात कुटुंबीय एकत्र येतायत; बीडचा इतिहास पुन्हा घडणार की संपणार? क्षीरसागर बंधूंच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष
बीड | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच लाट उसळताना दिसत आहे. वर्षानुवर्षे मतभेद, तुटलेले संबंध आणि वैचारिक दुरावा बाजूला ठेवत राज्यातील मोठी राजकीय कुटुंबे पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत.
ठाकरे बंधूंमध्ये सुरू झालेला संवाद, पवार काका-पुतण्यांमधील वाढती जवळीक आणि मुंडे घराण्याबाबत सुरू असलेल्या घडामोडींमुळे संपूर्ण राज्यात “एकत्र येण्याचे राजकारण” चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष वेधले आहे ते बीडच्या क्षीरसागर बंधूंकडे. आमदार संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर पुन्हा एकत्र येणार का? हा प्रश्न सध्या केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो बीडच्या
राजकारणाचे भवितव्य ठरवणारा मुद्दा बनत चालला आहे.
एकेकाळी बीड जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव गाजवणारे क्षीरसागर कुटुंब आज मात्र अंतर्गत मतभेदांमुळे दोन गटांत विभागले गेले आहे. या फाटाफुटीचा फटका थेट निवडणुकांमध्ये बसला असून नुकत्याच झालेल्या बीड
नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही बंधूंना पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव केवळ व्यक्तीगत नसून, तो संपूर्ण क्षीरसागर राजकीय परंपरेला बसलेला धक्का मानला जात आहे.
नगराध्यक्षपदावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला असला, तरी त्यांच्या गटाकडे पुरेसे संख्याबळ नाही. उपाध्यक्षपद व विषय समित्यांच्या निवडणुकांसाठी त्यांना इतर नगरसेवकांच्या पाठिंब्याची
गरज भासणार आहे. याच ठिकाणी क्षीरसागर बंधू एकत्र येण्याची गणिते जुळू शकतात, अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.
जर संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर एकत्र आले, तर त्यांच्या दोन्ही गटातील नगरसेवकांना उपाध्यक्षपद आणि महत्त्वाच्या विषय समित्यांवर स्थान मिळू शकते. त्यामुळे सध्या बीडच्या राजकीय वर्तुळात “क्षीरसागर बंधू
एकत्र येणार” या चर्चेने जोर धरला आहे. मात्र आतापर्यंत दोघांकडूनही कोणतीही अधिकृत भूमिका किंवा स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत.
दरम्यान, क्षीरसागर समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे. “ज्या क्षीरसागर नावाने कधी बीड जिल्ह्याच्या राजकारणात धबधबा उसळायचा, ते नाव आज हळूहळू मागे पडताना पाहावे लागत आहे. हा इतिहास नामशेष होऊ
द्यायचा नसेल, तर दोघांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज आहे,” अशी तीव्र भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
राज्यात जिथे जिथे राजकीय कुटुंबे पुन्हा एकत्र येत आहेत, तिथे तिथे त्याचा थेट फायदा संबंधित पक्ष आणि कार्यकर्त्यांना होताना दिसतो आहे. अशा परिस्थितीत बीडमध्ये क्षीरसागर बंधू वेगवेगळे राहिले, तर त्याचा राजकीय तोटा
आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकारांचे मत आहे.
सध्या ही चर्चा केवळ राजकीय वर्तुळात असली, तरी आगामी काळात उपाध्यक्षपद, विषय समित्या आणि पुढील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर बंधूंना निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे, हे मात्र निश्चित आहे.
राज्यातील बदलते राजकारण आणि एकत्र येण्याची वाढती लाट पाहता, आता बीड जिल्हा एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत आहे—
क्षीरसागर बंधू इतिहास जपण्यासाठी एकत्र येणार, की मतभेदांमुळे तो इतिहास कायमचा मागे पडणार?
Leave a comment