जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत उपक्रम
बीड । वार्ताहर
जिल्हा रुग्णालय बीड व वृध्वत्व व मानसिक आजार रुग्णालय, लोखंडी सावरगावच्या वतीने 13 जानेवारी रोजी आयोजित शिबीरात, सध्या व्यक्तिमधील वाढत चाललेला ताणतणाव, बेरोजगारीमुळे येणारे नैराश्य, वाढत चाललेल्या आत्महत्या, स्त्रियांचे होणारे शोषण आणि त्यामुळे येणार्या समस्या इत्यादी अनेक समस्यामुळे मानसिक आजार वाढत चालले आहेत अशा वाढत चाललेल्या मानसिक आजारांचे निदान व उपचार व्हावेत हा या मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिरामागील उद्देश होता.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन या मानसिक आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रकांत चव्हाण, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.अरुणा केंद्रे, जिल्हा रुग्णालय बीडचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.राम आव्हाड, डॉ.दिलीप गायकवाड, मानसोपचार तज्ञ डॉ.शिवराज पेस्टे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुराधा शिनगारे, डॉ अक्षय आंबेकर, डॉ.विमला इदगार, डॉ.वसंती चव्हाण, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य चिंचकर सर, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे मानसशास्त्र चिकित्सक डॉ.अशोक मते, सामाजिक कार्यकर्ते अंबादास जाधव, राहुल ओहोळ, प्रगती शिंदे, कनिष्ठ लिपिक विजया मेंडके, टेली मानस केंद्राचे सर्व कर्मचारी, समाजसेवा अधीक्षक गुणवंत रसाळ, रक्तपेढी अधिकारी युवराज गिते, इन्चार्ज शेरखाने सिस्टर, खाडे सिस्टर, मेट्रेन शोभेकला कावळे, अवैद्यकिय भांडारपाल सतीश जानराव, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी व केंद्रामधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी टेली मानस या केंद्र सरकारने सुरू केलेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. त्यांनी या टेली मानस कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा समाजातील ताणतणाव, नैराश्य, चिंता आणि घबराहट, झोपेच्या समस्या, वेडसरपणा, व्यसनामुळे निर्माण होणारे मानसिक आजार याबद्दल माहिती, निदान, उपचार व समुपदेशन करणे हा आहे असे सांगितले आणि जर अशा मानसिक आजाराबद्दल माहिती हवी असल्यास किंवा उपचार घ्यावयाचे असल्यास 14416 या टोल फ्री नंबर वरती फोन करावा असे आवाहन केले.
डॉ.चंद्रकांत चव्हाण यांनी या शिबिरासाठी आलेल्या नागरिकांना वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र या ठिकाणी रुग्णांना दिल्या जाणार्या शासकीय सेवेबद्दल माहिती दिली आणि ग्रामीण भागातील उपचारासाठी आलेल्या व येणार असलेल्या रुग्णांना आरोग्य सेवा देण्यामध्ये गैरसोय होणार नाही याची ग्वाही दिली. टेली मानस कार्यक्रमाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ.शिवराज पेस्टे यांनी सद्या वाढत चाललेल्या मानसिक आजाराबद्दल माहिती दिली, मानसिक आजाराचा रुग्ण कसा ओळखायचा हे सांगितले आणि त्यांना योग्यवेळी योग्य उपचारासाठी मानसोपचार तज्ज्ञांशी संपर्क साधावा असे आवाहन केले. या शिबिरामार्फत 89 मानसिक आजार/त्रास असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बळीराम शिंदे यांनी केले तर अंबादास जाधव यांनी आभार व्यक्त केले.
Leave a comment