पोलिसांनी दाखवली दहशतवादी हल्ल्याप्रसंगी करावयाच्या कारवाईची रंगीत तालीम
बीड । वार्ताहर
येथील मध्यवर्ती बसस्थानकात एक संशयीत बॅग ठेवण्यात आली असून बसस्थानकात चार अतिरेकी बॅग व शस्त्रासह शिरले असून त्यांनी अंधाधूंद गोळीबार केल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळते. ही माहिती मिळताच बीड पोलिस सतर्क होऊन घटनास्थळी दाखल होतात अन् काही क्षणात डॉग स्कॉडच्या मदतीने बसस्थानकातून संशयीत बॅग व त्यातील शस्त्र ताब्यात घेवून संशयितांना ताब्यात घेतात. ही सारी कारवाई आज दि.13 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बीड जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दहशतवादी हल्ल्या प्रसंगी केल्या जाणार्या कार्यपध्दतीच्या कारवाईची रंगीत तालीम आणि प्रात्यक्षीक प्रवाशांसमोर दाखवण्यात आले. दरम्यान अचानक शेकडो पोलिस आणि त्यांचे वाहनांनी बसस्थानकाला घेराव घातल्याने प्रवाशांमध्ये एकच धांदल उडाली. नेमका काय प्रकार आहे हे कळेपर्यंत पोलिसांनी आपली मॉकड्रील म्हणजेच रंगीत तालमीचे प्रात्यक्षिक पुर्ण केले. या प्रात्यक्षिकानंतर पोलिस दलाच्या वतीने नागरिकांनी कसल्याही प्रकारे भयभीत होऊ नये. सदरील कार्यवाही रंगीत तालीमचे प्रात्यक्षिक असल्याचे ध्वनीक्षेपकाद्वारे सर्वांना सांगण्यात आले. तेंव्हा कुठे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
त्याचे झाले असे की, बीड जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दहशतवादी हल्ल्या प्रसंगी पोलिसांकडून जी कार्यपध्दती वापरली जाते त्याच्या रंगीत तालमीचे प्रात्यक्षिक बीड बसस्थानकात घेण्यात आले.या रंगीत तालमी दरम्यान असा प्लॅन आखण्यात आला की, बसस्थानकात प्रवाशी ज्या ठिकाणी थांबतात तिथे गर्दीत 4 अतिरेकी बॅग व शस्त्रासह आले आहेत. त्यांनी अंधाधूंद गोळीबार सुरू केल्याची माहिती तेथील नागरिकांकडून पोलिस नियंत्रण कक्षाला दिली जाते. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाकडून ही माहिती पोलिस अधीक्षक यांना दिली जाते. माहिती मिळताच पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगल विरोधी पथक, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, अंगुली मुद्रा व तपासणी पथकासह बीड शहर, बीड ग्रामीण, शिवाजीनगर, पेठ बीड ठाण्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी, फायर ब्रिगेड व्हॅनसह अधिकारी, कर्मचार्यांना माहिती देवून घटनास्थळी पाचारण केले जाते. त्यानंतर या सर्व अधिकार्यांचे पथक बसस्थानकाला घेराव घालतात.
तसेच बसस्थानकातील संशयित अतिरेकी जे चेहर्यास काळ्या कपड्याने बांधून पाठीवर बॅग अडकवून स्वतःकडील शस्त्राने अंधाधुद गोळीबार करत होता. त्यांना पकडून त्यांच्याकडून त्यांचे शस्त्र व साहित्य ताब्यात घेतले जाते. तसेच बॉम्ब शोधक पथक व श्वान पथकाच्या साह्याने सदर बॅग व परिसराची तपासणी करून फॉरेन्सीक टिमच्या वतीने घटनास्थळाची व वस्तूची पाहणी करून तपासणी केली गेली.अशा प्रकारे ही मॉकड्रील बसस्थानकातील शेकडो प्रवाशांच्या उपस्थितीत पूर्ण केली गेली. ही मॉकड्रील पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी, कर्मचार्यांनी पार पाडली.
Leave a comment