व्यसनमुक्त समाजासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

बीड । वार्ताहर

शिवसंग्रामचे अध्यक्ष दिवगंत विनायक मेटे हे आमचे परममित्र होत. मेटे साहेब राजकारणापेक्षा समाजकारणात सक्रिय होते,समाजोपयोगी कार्यक्रमात ते अग्रेसर असायचे.मराठा आरक्षण आणि शिवस्मारकासाठी आ.विनायक मेटे यांनी सातत्याने पुढाकार घेऊन काम केले. मेटे यांच्या पश्चात त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा विडा ज्योतीताई मेटे आणि शिवसंग्रामने उचलला आहे. तुमच्या या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही सर्वजण कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आपले संस्कार, संस्कृती खूप महान आहे. ज्यांचे मन कमकुवत असते तेच व्यसनाच्या अंमलाखाली येतात. अंमली पदार्थाच्या अंमलाखाली उसणी ताकद घेवून जगतात हे सर्व चूकीचे आहे. समाजाला पुन्हा उभा करायचे असेल तर त्याला सुखासिनतेपासून,व्यसनापासून दूर  घेवून जाणे गरजेचे आहे असे विचारही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

 

आज दि.31 डिसेंबर रोजी बीड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजीत अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या व्यसनमुक्ती रॅलीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, श्रीमती ज्योतीताई मेटे, आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, अक्षय मुंदडा, रमेश आडसकर,राजेंद्र मस्के, रमेश पोकळे, भिमराव धोंडे, कुंडलीक खांडे, तानाजी शिंदे, राजन घाग, प्रभाकर कोलंगडे, बी.बी. जाधव, आशुतोष मेटे, रामहरी मेटे, नारायण काशिद, अनिल घुमरे, सुहास पाटील, मनोज जाधव, राहुल मस्के यांची उपस्थिती होती.

 

व्यसनमुक्त बीड अभियानांतर्गत आयोजित व्यसनमुक्ती महारॅलीचा आरंभ श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजीमहाराज क्रीडांगणापासून झाला. त्यानंतर सुभाष रोड- माळीवेस - बलभीम चौक - कारंजा रोड - बशीरगंज - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे महारैली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नगर रोड बीड येथे पोहचली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रॅलीचा समारोप करण्यात आला. प्रारंभी ज्योतीताई मेटे यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, विनायक मेटे यांचा पिंडच समाजकारणाचा होता, ते समाजकारणात झोकून देत. समाजकारणाच्या केवळ गप्पा न मारता प्रत्यक्ष कृतित उतरविणारे होते. त्यांनी 2015 पासून व्यसनमुक्तीवर काम सुरु केली. ती मोहीम नंतर व्यापक होत गेली. हाच विचाराचा वारसा पुढे घेऊन जात आहोत. नविन समाज निर्मितीत पुढाकार घेत आहोत असे सांगितले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,व्यसनमुक्त समाज निर्माण झाला पाहिजे हे दिवंगत विनायक मेटे यांचे स्वप्न होते ते साकार करण्याचे काम हे शासन आणि आम्ही नक्की करू. ही भूमी मुंडे साहेब आणि मेटे साहेब यांची आहे. मेटे साहेब आज आपल्यात नाहीत याची सल सर्वांच्याच मनात आहे. मेटे साहेबांशी फडणवीस यांची आत्मिक संबंध जुळले होते.एक सच्चा मित्र म्हणजे मेटे साहेब होते असे विचार बावनकुळे यांनी व्यक्त केले.

उपस्थितांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  समाजाला पुन्हा उभा करायचे असेल तर त्याला सुखासिनतेपासून,व्यसनापासून दूर घेवून जाणे गरजेचे आहे. हे सांगताना त्यांनी पंजाबमधील अंमली पदार्थामुळे उद्भवलेली तरुणाईची स्थिती विषद केली. अनेक जण नशेखोरीत लुप्त होत असून हे चांगले लक्षण नाही. हा केवळ व्यसनाचा एक भाग नाही तर शत्रुच्या छुप्या युध्दाचे षड्यंत्र आहे. त्यामुळे याच्या विरोधात आपल्या सर्वांना एकत्र येवून लढावे लागेल. दारूमुळे संसार उध्वस्त होत आहेत. सिगारेट तंबाखू अनेकांना स्टाईल वाटते पण हीच सिगारेट आपल्या शरीराला संपवत असते. भारत ही कॅन्सरचा राजधानी व्हायला लागली आहे हे दुर्देवी असून अशावेळी सवार्ंनी व्यसनमुक्त व्हावे असे आवाहन फडणवीस यांनी केले.

आपले संस्कार, संस्कृती खूप महान आहे. ज्यांचे मन कमकुवत असते तेच व्यसनाच्या अंमलाखाली येतात. अंमली पदार्थाच्या अंमलाखाली उसणी ताकद घेवून जगतात हे सर्व चूकीचे आहे. आमच्या सरकारने मोठ्या प्रमाणात राज्यात अंमली पदार्थ नष्ट केले आहेत. पोलिसांना आम्ही या विरुद्ध कारवाईच्या सूचना दिल्या आहेत असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुलामुलींनी आपल्या घरातील जेष्ठ लोकांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी तयार करावे असे आवाहनही त्यांनी भाषणाच्या समोराप्रसंगी केले. यावेळी उपस्थित विद्याथ्यार्र्ंसह व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. त्यानतर सामुहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. फडणवीस यांच्या भाषणापूर्वी उपस्थितांमधून ‘अमर रहे अमर रहे मेटे साहेब अमर रहे’ आणि ‘फडणवीस साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.

उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून मेटेंसोबतच्या आठवणींना उजाळा

आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवगंत आ.विनायक मेटे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, आमचे परममित्र विनायक मेटे होते.2015 मध्ये विनायक मेटे यांनी माझ्याकडे एक संकल्पना मांडली होती. ते म्हणाले होते, व्यसनमुक्त समाजासाठी मला एक रॅली काढायची आहे, कारण  31 डिसेंबर दिवशी ‘थर्टी फस्टच्या’ नावाखाली दारू, चरस, गांजा सेवन करून लोक भांडण करतात. त्यामुळे दारूऐवजी दूध पिऊन थर्टी फस्ट साजरा करायचा आहे. अशी त्यांची संकल्पना होती. मी या उपक्रमाचे कौतुक केले होते. शिवाय या रॅलीचे तुम्ही उद्घाटन तुम्ही करा. कारण व्यसन न करणारा माणूस मुख्यमंत्री होतो हा संदेश मला तरुणाईपर्यंत पोहचवायचा आहे असे मेटे साहेब म्हणाले होते. मेटे साहेब आणि माझी खूप मैत्री होती, आज ते आपल्यात नाहीत याचे शल्य आहे मात्र त्यांचे हे कार्य ज्योतीताई आणि त्यांचे सर्व सहकारी पुढे नेत आहेत म्हणून आम्ही सर्वजण आज बीडला आले असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतले.
---

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.