बीड | वार्ताहर
आईची स्वाक्षरी घेण्यासाठी आणि ग्रामसेवकाला त्यातील वाटा देण्यासाठी 20 हजाराची लाच मागणार्या सरपंच पुत्रावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज 28 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मनरेगा अंतर्गत जलसिंचन विहीर कुशल कामगारांच्या अनुदानाच्या धनादेशावर स्वाक्षरी घेण्यासाठी पैशाची मागणी केली गेली होती.
एसीबीच्या माहितीनुसार, सुधाकर नंदु उगलमुगले (34, रा.नारेवाडी ता.केज) असे आरोपी तरूणाचे नाव आहे. त्याची आई सरपंच आहे. तक्रारदार यांच्या मुलाच्या नावे मनरेगा अंतर्गत जलसिंचन विहीर मंजूर झाली होती. या विहीरीचे कुशल कामगारांसाठीच्या अनुदानासाठी आलेल्या धनादेशावर आरोपी सुधाकर याने त्याची सरपंच आई श्रीमती आशाबाई नंदु उगलमुगले यांची सही घेवून देण्यासाठी तसेच ग्रामसेवक यांना त्यातील वाटा देण्यासाठी शासकीय पंचासमक्ष 20 हजार रूपयांची मागणी केली व लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. याबाबत 21 सप्टेंबर 2022 रोजी एसीबीच्या अधिकार्यांनी लाच पडताळणी केली होती. त्यानंतर या प्रकरणात 28 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक संदिप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल धस, अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश म्हेत्रे यांनी केली.
Leave a comment