स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तीन साथीदारांचा शोध सुरू
बीड | वार्ताहर
आष्टी आणि शिरूर पोलिस ठाणे हद्दीत तीन साथीदारांच्या मदतीने जबरी चोरी करणार्या एका आरोपीस गजाआड करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चिंचोडी पाटील (जिल्हा नगर) येथे 27 डिसेंबर रोजी ही कारवाई केली. आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर त्याने शिरूर आणि आष्टी ठाणे हद्दीत इतर तीन साथीदारांसह तीन गुन्हे केल्याची कबूली पोलिसांना दिली. दरम्यान इतर जिल्ह्यातही या टोळीने असेच गुन्हे केल्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.सतीश वाघ यांनी व्यक्त केली आहे.
निंबाळकर आसाराम भोसले (रा.चिंचोडी पाटील ता.जि.नगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. 17 डिसेंबर रोजी पहाटे पावणे तीनच्या सुमारास डॉ.अविनाश नानासाहेब पवळ (रा.मुर्शदपूर, ता.आष्टी) यांच्या घराची कडी तोडून अनोळखी चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. नंतर काठीचा धाक दाखवून सोने व रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणात आष्टी ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंद झाला होता. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या घटनेची गांंभीर्याने नोंद घेत गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या.
त्या अनुषंगाने गुन्हे शाखा कामाला लागली. 27 डिसेंबर रोजी चिंचोडी पाटील येथून आरोपी निंबाळकर आसाराम भोसले यास ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता शिरूर ठाणे हद्दीत गत दोन महिन्यापूर्वी मानूर शिवारातील सिध्देश्वर वस्ती व सिरसाट वस्ती येथे मारहाण करत चोरी केल्याची कबूली त्याने दिली. हे गुन्हे इतर तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचेही त्यानी सांगितले. दरम्यान मुर्शदपूर येथील गुन्ह्याच्या तपासकामी त्यास आष्टी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास पोलिस करत आहेत. ही कारवाई स्थागुशाचे निरीक्षक सतिश वाघ, उपनिरीक्षक भगतसिंह दुल्लत, प्रसाद कदम, रामदास तांदळे, पोलिस नाईक सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, विकी सुरवसे, अशोक कदम यांनी केली.
Leave a comment