' लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट 'च्या माध्यमातून बीडच्या डॉ. अतुल ढाकणेचा स्तुत्य उपक्रम

गुणवत्ता जवळ असतानाही केवळ  अर्थिक परिस्थिती अभावी डॉक्टर होवू न शकणारे अनेक तरुण एखादा व्यवसाय किंवा  नौकरीकडे वळताना आपण पाहतो.  डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी आहे, पण डॉक्टर व्हायचे म्हटल्यावर नीट परीक्षेच्या तयारीसाठी खाजगी क्लासेसची लाखातील भरमसाठ फीस कोठून भरावी? हा प्रश्न अनेक विद्यार्थी आणि पालकांपुढे उभा असतो. अशा उपेक्षित  होतकरू, गरीब  विद्यार्थ्यांसाठी बीडच्या एका तरुण डॉक्टरने ' लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट ' या  संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या डॉक्टर मित्रांच्या सहकार्यातुन विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात मागील सात वर्षांपासून मोफत नीट मार्गदर्शन क्लासेस सुरु केले आहेत.या स्तुत्य उपक्रमामुळे शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना डॉक्टर होता आले आहे. विशेष म्हणजे
  'उलगुलान 'च्या  माध्यमातून मेळघाट, गडचिरोली सारख्या कुपोषित आदिवासी भागातील  अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न  बीडच्या या तरुण डॉक्टरने पूर्ण केले आहे . सामाजिक भान  ठेवून सातत्याने अशा  गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी धडपडणाऱ्या या डॉक्टर तरुणाचे नांव आहे डॉ. अतुल ढाकणे.


 बीडच्या गेवराई तालुक्यातील वडगाव  ढोक हे  डॉ. अतुल ढाकणे यांचे गावं ; वैद्यकीय शिक्षण पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेज मध्ये पूर्ण झाले.  सामाजिक, शैक्षणिक कार्याची जाणीव असणाऱ्या डॉ. अतुल यांना 
एम.बी.बी.एसच्या तृतीय वर्षात असताना  वंचित उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेसची संकल्पना सुचली. आजच्या परिस्थितीत डॉक्टर होवू पाहणाऱ्या तरुणांपुढे महागडया आणि अर्थिक लूट करणाऱ्या व्यावसायिक क्लासेसच्या भरमसाठ फीसचा प्रश्न आहे. दोन ते अडीच लाख रुपये कोठून आणायचे ; ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना सहज नीट सारख्या क्लासला प्रवेश मिळतो पण शेतकरी,मजूर, आदिवासी, कामगारांच्या मुलांना गुणवत्ता  असतानाही केवळ पैशा अभावीडॉक्टर होता येत नाही. मग अशा गरीब मुलांनी डॉक्टर होऊच नये काय? हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला, या  जाणीवेतुन डॉ. अतुल यांनी निस्पृह भावनेतून त आपल्या बी. जे कॉलेजच्या आजी - माजी विद्यार्थी डॉक्टर मित्रांच्या सहकार्याने 14 डिसेंबर 2015 पासून पुण्यात मोफत नीट ( NEET ) क्लासला सुरुवात केली.
 लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट (LFU) च्या माध्यमातून सुरु केलेल्या पुणे येथील सोमवार पेठे शाखेत सध्या अकरावी आणि बारावीचे एकूण 78 विद्यार्थी   मोफत  क्लास मध्ये शिक्षण घेत आहेत. नियमित तीन विषयाची तयारी , विद्यार्थ्यांच्या अभ्यासविषयक शंकाचे निरसन टीम मधील सदस्य अतिशय प्रामाणिक प्रयत्नातून पूर्ण करतात. 2017 पासून 'उलगुलान ' सारखा उपक्रम राबवला जात आहे, या माध्यमातून मेळघाट आणि गडचिरोली   भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी   डॉ. अतुल ढाकणे व त्यांची टीम अवरीत कार्य करीत आहे. या आदिवासी भागातील मोफत क्लाससाठी निवड झालेले हे विद्यार्थी आज एम. बी. बी. एस,
 बी.डी. एस,  बी. ए. एम. एस सारख्या अभ्यासक्रमासाठी विविध मेडिकल कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत. सध्या मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे फक्त मेळघाट आणि गडचिरोली भागातील विद्यार्थ्यांची स्वतंत्र बॅच कार्यरत असून 55 विद्यार्थी मोफत क्लासचे प्रशिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांची मोफत निवास, भोजनाची व्यवस्था LFU च्या माध्यमातून करण्यात आल्याचे डॉ. अतुल ढाकणे यांनी बोलतांना सांगितले. पुण्यातील शाखेत महाराष्ट्रातील विविध भागातील विशेष म्हणजे बीड, मराठवाड्यातील विद्यार्थी या उपक्रमांचा लाभ घेत आहेत.  खरोखरच बीडच्या या भूमिपुत्राच्या निस्पृह  उपक्रमास विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींनी बळ देण्याची आवश्यकता आहे.

 
"विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे आम्ही काम करतो "

लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट (LFU) ची संकल्पना मुळात खूप स्तुत्य आहे.जे विद्यार्थी अर्थिकदृष्टया  कमकुवत आहेत, डॉक्टर होवू इच्छितात, पण व्यावसायिक झालेल्या कोचिंगची भरमसाठ फीस भरू शकत नाहीत अशा घटकातील विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही संस्था कार्य करते . गेल्या सात वर्षांपासून बी. जे कॉलेजच्या आजी - माजी विदयार्थ्यांनी सुरु केलेला हा उपक्रम मूर्तरूप घेत आहे. 14 डिसेंबर रोजी आमचा सातवा वर्धापण दिन साजरा करत आहोत.आमच्या टीम मध्ये डॉ. केतन देशमुख, डॉ. मयंक त्रिपाठी, डॉ. फारुकी फरास, डॉ. अजिंक्य 
वेडे, डॉ. सितांशू शेखर प्रधान, डॉ. अक्षता गोरे, डॉ. किरण तोगे, डॉ. तेजस अहिरे, डॉ. संतोष चाटे, डॉ सिद्धकेश तोडकर आणि शंभरहुन अधिक स्वयंसेवक आणि मी या उपक्रमात सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत. 'उलगुलान ' हा महत्वकांक्षी प्रकल्प आदिवासी पट्यातील विद्यार्थ्यांच्या पंखाना बळकटी देणारा आणि नवी दिशा  देणारा ठरला . मागील काही वर्षात LFU च्या माध्यमातून  शंभरहून अधिक प्रतिथयश डॉक्टर आम्ही घडवू शकलो याचा सार्थ अभिमान  वाटतो. बीड आणि मराठवाड्यातील जे विद्यार्थी डॉक्टर होवू इच्छितात पण कोचिंगची भरमसाठ फीस भरू शकत नाहीत अशा मुलांनी दहावीच्या निकाला नंतर आम्हांला 7720033007 या क्रमांकावर संपर्क साधावा.  निवडक विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग साठी निवडले जाईल.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.