जायकवाडीचे पाणी गोदापात्रेत सोडणार
बीड । वार्ताहर
पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात 18 जुलै रोजी सायं.7 वाजेपर्यंत तब्बल 73.97 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान धरण पाणलोट क्षेत्रात अजूनही चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने साहजिकच धरणाची पाणीपातळीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्र.भा.जाधव यांनी गोदाकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जायकवाडी प्रकल्पामध्ये पाणीसाठा वेगाने वाढू लागल्याने पाटबंधारे विभागही सतर्क झाला आहे. या धरणाच्या जलाशय प्रचलन आराखड्यानुसार आवश्यक असणार्या पाणी पातळीचे नियमन केले जात आहे. दरम्यान पाण्याची आवक अशीच चालू राहिल्यास नजीकच्या काळात कधीही धरणाच्या गेटमधून अथवा सांडव्याद्वारे गोदावरी नदीमध्ये पूर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या दोन्हीही तिरावरील लोकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. नदीपात्रात कुणीही जावू नये. पाळीव प्राणी, जनावरे तसेच विद्युत पंप व इतर साहित्ये तात्काळ काढून घेण्याबाबत शिवाय कुठलीही जिवीत व वित्त हानी होणार नाही. याबाबतच्या सूचना सर्व गावांना संबंधीत यंत्रणेने द्याव्यात असेही जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव तहसिलदारांनाही याबाबतच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
Leave a comment