गुन्हे शाखेच्या कारवाईत 16 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त
बीड । वार्ताहर
शहरालगतच्या कुर्ला रस्त्यावर गुटखा वाहतूक करणारी कार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतली. दि.16 जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. कारवाईत चालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत गुटखासह कार असा तब्बल 16 लाख 85 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोविंद नवनाथ खांडे (26, रा.पिंपळगाव मजरा ता.जि.बीड) असे ताब्यात घेतलेल्या कार चालकाचे नाव आहे. कुर्ला रोडवर एक इसम कारमध्ये क्रमांक (एम.एच.24 ए.एच.3482) गुटखा वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेगवेगळे पथके तयार करून कुर्ला रोडवर सापळा रचला. या ठिकाणी 16 जुलै रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास एक कार आलेली दिसली. पोलिसांनी ती कार थांबवून चालकास त्याचे नाव गाव विचारले असता गोविंद नवनाथ खांडे असे त्याने सांगितले. त्यानंतर गाडीत त्याचा साथीदारही होता. पोलिसांनी कारची पाहणी केली असता त्यात गुटखा व गुटख्यात मिसळण्याचा पदार्थाच्या गोण्या असा 5 लाख 74 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल आढळून आला. तसेच 5 लाख रूपयांची कार आणि दोन मोबाईल असा एकूण 16 लाख 85 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत आरोपीविरूध्द पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुद्देमालही पेठ बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार, डीवायएसपी संतोष वाळके, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचार्यांनी केली.
Leave a comment