आज पालखी सोहळ्याचे बीड जिल्ह्यात आगमन
गेवराई | वार्ताहर
आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून प्रस्थान करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे पायी वारीची तब्बल 313 वर्षाची परंपरा असलेला संत मुक्ताबाई पायीवारी पालखी सोहळा शहागडमार्गे आज दि.22 जून रोजी बीड जिल्ह्यात दाखल होत आहे. तत्पूर्वी आज सकाळी श्री संत मुक्ताई पादुकांचे शहागड येथे गोदावरीत स्नान करण्यात आले. याप्रसंगी मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे,पुजारी सुधाकर पाटील, सुधाकर तुकाराम पाटील, राम जुनारे,लखन महाराज, विश्वंभर महाराज, ज्ञानेश्वर हरणे यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखीचा पहिला मुक्काम गेवराई येथील केशवराज मंदिरात असणार आहे.
श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यामध्ये हजार वारकरी सहभागी असून त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था गेवराई ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे. गेवराई पालखी दुसऱ्या दिवशी सकाळी 23 जून रोजी वाजता सकाळी 6 वा. प्रस्थान होऊन नऊ वाजता जय भवानी सहकारी साखर कारखाना येथे सकाळी 9 सकाळचे जेवण यानंतर नामलगाव फाटा येथील जाहीर पाटील विद्यालय येथे मुक्काम करून 24 रोजी बीड शहरातील हनुमान मंदिर माळीवेस मुक्कामी रवाना होईल. दि.25 जून रोजी सकाळी 11 वाजता बालाजी मंदिर पेठ बीड येथे मुक्काम दि.26 जून रोजी पाली येथे मुक्काम, दि. 27 रोजी मोरगाव, 28 जून चौसाळा मुक्काम करून पारगाव, वाकड, भुम, शेंदरी, म्हाडा, आष्टी मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
या पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकमधील वारकरी सहभागी असून त्यांच्या सेवेसाठी संस्थांचे दोन वाहने जळगाव जिल्हा जि.प.चे आरोग्य पथक, सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांचे पाणीपुरवठा टँकर, तसेच या सोहळ्यासाठी विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत यांचेतर्फे सुरुवातीपासून पाणीपुरवठा टँकर सेवा देत आहे. दरम्यान संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब अँड. रवींद्र पाटील हे वेळोवेळी भेट देऊन वारकरी व सेवेकरी यांची विचारपूस करून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत आहेत.
पालखीमध्ये श्री संत मुक्ताबाईच्या प्रचार-प्रसारासाठी दररोज चार ते सहा काकडा, प्रवासात भजन,प्रवचन, कीर्तन व भारूड रात्री कीर्तन सेवेसाठी सोहळाप्रमुख हभप रविंद्र महाराज हरणे, विजय महाराज खवले, रतिराम महाराज, लखन महाराज नीना महाराज, परमेश्वर महाराज, करण महाराज, श्रीकांत महाराज आदी सेवा देत आहेत. पालखीचे रथाचे पुजारी म्हणून सुधाकर पाटील (मनुर) मुरलीधर सांभारे, सोशल मीडिया म्हणून ज्ञानेश्वर हरणे काम पाहत आहेत. पालखी सोहळा संस्थान अध्यक्ष अँड. रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून मॅनेजर विनायक हरणे यांचे सहकार्य लाभत आहे. पालखी सोहळा प्रमुख म्हणून रविंद्र महाराज हरणे हे उत्तम प्रकारे काम सांभाळत आहे. सदर वर्ष ही संत मुक्ताबाई अंतर्धान सोहळा सप्तशती शताब्दी महोत्सव वर्ष असल्याने पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. तरी भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानच्यावतीने अध्यक्ष अँड.
रवींद्र पाटील यांनी केले आहे.
Leave a comment