बीड | वार्ताहर
तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील बक्करवाडी येथे शितल गाडे या महिलेचा अवैध गर्भपातामुळे मृत्यू झाला होता. या प्रकरणात आज बुधवारी ५ आरोपीवर पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रविवारी (दि.५) रोजी बक्करवाडी (ता. बीड) येथील शितल गाडे ही 30 वर्षीय महिला दगावलेल्या अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा अवैध गर्भपात झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हयात खळबळ माजली होती. या प्रकरणात काल मंगळवारी मयत महिलेच्या पतीसह, सासरा, भाऊ आणि एजंट म्हणून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला ताब्यात घेतले होते.
दरम्यान आज बुधवारी पहाटे या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक महादेव ढाकणे यांच्या फिर्यादीवरुन मयताचा पती गणेश गाडे, सासरा सुंदरराव गाडे, भाऊ नारायण निंबाळकर, यासह मध्यस्थ महिला मनिषा सानप आणि सिमा सिस्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांसह पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यातील विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल झाला आहे.
Leave a comment