कोरोना काळात बीडमधील कारर्कीद ठरली होती वादग्रस्त
बीड (प्रतिनिधी)- कोरोना संकट काळात सर्वसामान्य शेतकर्यांचा भाजीपाला नाल्यात फेकून देणारे आणि नियमांच्या नावाखाली एका औषधी विक्रेत्यास दुकानात जावून काठीने मारहाण केल्याने चर्चेत आलेले आणि वादग्रस्त ठरलेले बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांची राज्य शासनाने बदली केली आहे. आता डॉ.गुट्टे हे परभणी महानगर पालिकेचे उपायुक्त म्हणून रूजू होत आहेत. दरम्यान गुट्टे यांच्या बदलीनंतर बीड नगर पालिकेचे नवे सीईओ म्हणून गेवराई नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांची नियुक्त झाली. त्यांनी पदभारही स्विकारला.
बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर डॉ.गुट्टे यांनी पालिका प्रशासन चालवितांना चांगले काम केले. मात्र कोरोना संकट काळात कोरोना संबंधीच्या नियमांची अंमलबजावणी करतांना गुट्टे यांच्या एकंदर वर्तनामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी तसेच औषधी विक्रेत्याला त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे त्यांच्या कारर्कीदीला अशी वादाची किनार लागली होती. यामुळे नागरिकात गुट्टे यांच्या कामकाजाविषयी त्यावेळी नाराजीचा सुर आळवला जात होता.दरम्यान राज्य शासनाने 27 मे रोजी मुख्याधिकारी गट अ संवर्गातील अधिकार्यांच्या बदल्या व पदस्थापना दिल्या असून यात डॉ.उत्कर्ष गुट्टे यांची परभणी महानगर पालिकेच्या उपायुक्तपदी पदस्थापना देण्यात आली आहे. गुट्टे यांना 27 मे रोजी बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे राज्य शासनाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुध्दे यांनी म्हटले आहे. दरम्यान आता बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी गेवराई येथील उमेश ढाकणे यांची नियुक्त झाली असून त्यांनी आज पदभारही स्विकारला आहे.
Leave a comment