नवीदिल्ली । वृत्तसेवा
भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीनने महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा जिंकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. यासह जागतिक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पाचवी भारतीय महिला आहे. तिने इस्तांबुलमध्ये झालेल्या सामन्यात थायलंडची जुतामास जितपाँगला 5-0 ने पराभूत केलं.
निखत झरीनने 52 किलो गटात महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचा अंतिम सामना जिंकत सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचवली आहे. आतापर्यंत सहा वेळा विजेती एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या महिला बॉक्सिगपटूंनी जागतिक विजेतेपदे पटकावली आहेत. यात आता निखत झरीनचा समावेश झाला आहे.
दरम्यान, उपांत्य सामन्यात निखतने आत्मविश्वासाने खेळ करीत ब्राझिलच्या कॅरोलिन डी अल्मेडाला 5-0 असे सहज नामोहरम केले होते. कनिष्ठ विश्वविजेत्या निखतने संयमी खेळाचे प्रदर्शन करीत कॅरोलिनवर निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. पण, मनीषाने टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या इटलीच्या इरमा टेस्टाकडून 0-5 अशी हार पत्करली, तर परवीनने युरोपियन कांस्यपदक विजेत्या आर्यलडच्या एमी ब्रॉडहस्र्टकडून 1-4 असा पराभव पत्करला होता.2019 मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणार्या मनीषाने दुसर्यांदा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळताना ताकदीने फटके खेळत तांत्रिक गुणाधिक्याच्या बळावर विजयासाठी प्रयत्नांची शर्थ केली. परंतु इरमापुढे तिचा निभाव लागला नाही.
=====
Leave a comment