बीड । वार्ताहर
कोरोनाच्या संकटानंतर प्रथमच येरमाळा येथे चैत्री यात्रा भरणार आहे. या यात्रेसाठी भाविकांना जाता यावे यासाठी बीड विभागातून 88 बसेसची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच 8 आगारातून बसेसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी लोकप्रश्नशी बोलताना दिली.
येरमाळा येथे दि. 15 ते 17 एप्रिल या कालावधीत यात्रोत्सव सुरु राहणार आहे. यात मुख्य दिवस षष्ठी (दि.16 एप्रिल,पौणिमा) व (दि.17 एप्रिल, चुना वेचणी) आहे. या दरम्यान बीड आगारातून 15, परळी आगारातून 8, धारुर-17, माजलगाव 8, गेवराई 7, पाटोदा-9 आष्टी 9 व अंबाजोगाई आगारातून 15 अशा एकूण 88 यात्रा बसेस सोडण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त प्रवाशांसाठी येरमाळा येथे आगाऊ आरक्षणासाठी बसेस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. भाविकांच्या मागणीनुसार आवश्यकतेप्रमाणे बसेस उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी प्रवाशांनी संबंधित आगारप्रमुखांशी संपर्क साधून खात्री करावी आणि राज्य परिवहन बसेसनेच प्रवास करावा,खासगी वाहनाने प्रवास करु नये असे आवाहन विभाग नियंत्रक मोरे यांनी केले आहे. सन 2019 मध्ये बीड विभागातील 81 बसेसव्दारे 30 हजार 744 प्रवाशांनी प्रवास केला होता.
दरम्यान चैत्री यात्रेसाठी गावातून 40 प्रवाशांचा समुह गावातून येरमाळा येथे जाणार असल्यास त्या गावातूनच थेट प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी बस उपलब्ध करण्यात येईल,यासाठी प्रवाशांनी संबंधित आगारप्रमुखांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------
Leave a comment