बीड । वार्ताहर
आ.संदिप क्षीरसागर यांच्या ताफ्यातील दारूगोळा आता काका जयदत्त क्षीरसागर यांच्या भात्यात जमा झाला आहे. आ.क्षीरसागरांचे पाच शिलेदार शिवसेनेत डेरेदाखल होताना प्रवेश सोहळ्यात सर्वांनीच आ.संदिप क्षीरसागर यांच्यावर आरोप करून राजकीय वस्त्रहरण केले. प्रवेश सोहळा श्नतीप्रदर्शनाने यशस्वी झाला. जयदत्त क्षीरसागरांची खेळी यानिमित्ताने पून्हा एकदा स्पष्ट झाली. काकांनी पुतण्यांच्या समर्थकांचा आपल्या गटात प्रवेश करून घेत पुतण्याचे वस्त्रहरण केले. आता या वस्त्रहरणानंतर पुतणे आ.संदिप क्षीरसागर काय भूमिका घेणार? या सर्व राजकारणाला ते कसे उत्तर देणार? याकडे पुन्हा आता बीडकरांचे लक्ष लागले आहे. राजकारणामध्ये टीट फॉर टॅट या समिकरणाला महत्व आहे. काही दिवसापूर्वीच जयदत्त क्षीरसागर यांच्या विश्वासू गटातील वैजिनाथ तांदळे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देवून काकांना ध्नका देण्याचा प्रयत्न पुतणे संदिप क्षीरसागर यांनी केला होता. मात्र काकांनी असे काही केले की संदिप क्षीरसागर यांच्या भात्यातील ताकदच काढून घेतली आहे.
नगरपालिका निवडणूका आणि विधानसभेच्या निवडणूकांमध्ये बीड शहरात अमर नाईकवाडे आणि फारूक पटेल या दोघांनी सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेत यशस्वीपणे मोट बांधली होती. त्याचा फायदाही झाला. मित्रत्वाचे नाते सांभाळत अमर नाईकवाडे यांनी संदिप क्षीरसागरांसाठी नको तेवढे कष्ट उपसले. मात्र अपेक्षाभंग झाल्यानंतर अमर नाईकवाडे यांनी नाराजांची फौज तयार केली आणि हि फौज शेवटी जशास तशी जयदत्त क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत दाखल झाली. सोमवारी प्रवेश सोहळ्याच्यावेळी पाच पांडव म्हणून ज्यांचा उल्लेख केला गेला त्यामध्ये अमर नाईकवाडे, फारूक पटेल, गंगाधर घुमरे, प्रेमचंद लोढा आणि नितीन लोढा यांनी संदिप क्षीरसागरांच्या कार्यपध्दतीवर टिका करत जयदत्त क्षीरसागरांचे नेतृत्व मान्य केले. या पाच पांडवाच्या माध्यमातून जयदत्त क्षीरसागर यांनी आ.संदिप क्षीरसागर यांचे पुरते राजकीय वस्त्रहरण केले आहे. या प्रवेश सोहळ्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरती घायाळ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात राजकारणाची दिशा काय असावी? यासाठी आ.संदिप क्षीरसागरांना मोठे आत्मपरिक्षण करावे लागणार आहे. त्यांच्या कार्यपध्दतीवरच थेट नाराजी व्य्नत करत हि मंडळी बाहेर पडली आहे. आता जे प्रमुख कार्यकर्ते संदिप क्षीरसागरांकडे आहेत त्यांच्याकडून नव्याने पून्हा नवी फळी तयार करण्याचे कौशल्य संदिप क्षीरसागरांना दाखवावे लागणार आहे. सत्तेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना बरोबर असतानाही जिल्ह्यात मात्र दोघांमध्ये विस्तवही जात नाही. अशी परिस्थिती आहे. आगामी निवडणूकांमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी स्ट्रॉंग टिम तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यात ते यशस्वी होवू लागले आहेत. संदिप क्षीरसागर आता नेमकी काय भूमिका घेतात? हे पाहणे औत्सु्नयाचे ठरणार आहे.
Leave a comment