बीड स्थानिक गुन्हे शाखेचा 1600 किमी पाठलाग
आरोपींकडून 27 गुन्ह्यांची कबुली
बीड | वार्ताहर
शहरातील स्वराज्यनगर भागात रस्त्याने पायी जाणार शिक्षिकेच्या गळ्यातील 26 ग्रॅमचे गंठण धूमस्टाइल चोरट्यांनी हिसका मारुन पळवून नेल्याची घटना 23 मार्च रोजी भरदुपारी 12 वाजता घडली होती. या प्रकरणात शिवाजीनगर ठाण्यात अज्ञातांविरूध्द गुन्हाही दाखल झाला होता. नंतर स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास हाती घेत तब्बल 1600 कि. मी.चा पाठलाग करत चोरट्यांची टोळी पुणे शहरातून गजाआड केली. या टोळीने 27 गुन्ह्यांची कबूली दिली आहे. महाराष्ट्र राज्यासह गोव्यातही या टोळीने गुन्हे केले असल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी आज 28 मार्च रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गुन्हे शाखेच्या या मोठ्या कामगिरीबद्दल त्यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले याप्रसंगी गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सत्यवती अशोक मोराळे (रा. स्वराज्यनगर, बीड) या शहरातील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 23 मार्च रोजी त्या दुपारी 12 वाजता शाळेतून रिक्षाने बार्शी रोडवरील स्वराज्यनगरकडे जाणार्या वळणावर उतरल्या होत्या. तेथून त्या पायी घराकडे जात होत्या. घर अवघे दोनशे मीटरवर असताना समोरुन आलेल्या दुचाकीवरील दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 26 ग्रॅमचे 66 हजार रुपये किमतीचे गंठण ओरबाडून धूम ठोकली होती.सत्यवती मोराळे यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा आला होता.
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक माहिती आणि गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पद्धती या आधारे तपास केला. यात त्यांना यश आले अन 27 मार्च रोजी सोनसाखळी चोरी करणाऱ्या 4 आरोपींना पुणे शहरातून ताब्यात घेत अटक केली अशी माहिती प्रभारी अधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली. आरोपींची गुन्हे शाखेने कसून चौकशी केली. सुरुवातीला आडेवेडे घेणाऱ्या या टोळीला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी बीड जिल्ह्यासह पुणे, ठाणे, पणजी (गोवा), सोलापूर, मुंबई शहर,परभणी, उल्हासनगर, आदी ठिकाणी केलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. यातील दोन आरोपी मनमाड तर एक पुणे आणि एक उल्हासनगर येथील असून अनेक दिवसांपासून हे अशाच पद्धतीने गुन्हे करत. या टोळीने बीडला शिवाजीनगर ठाणे हद्दीत 4 तर अंबाजोगाई हद्दीत 1 असे 5 गुन्हे केले असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली असून या गुन्ह्यातील चोरीला गेलेले दागिने परत मिळवले जातील असे प्रभारी अधीक्षक सुनील लांजेवार यांनी सांगितले. सर्व आरोपींना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Leave a comment