फेसबुकवरील जाहिरातीला भुलू नका
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात विविध प्रलोभने दाखवून नागरिकांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार बीडमध्ये समोर आला.फेसबुकवर आलेली कार विक्रीची जाहिरात पाहून संबंधिताकडे एका तरुणाने संपर्क केला. नंतर त्यांनी तरुणाचा विश्वास संपादन करत एका बँक खात्यावर रक्कम पाठवण्यास भाग पाडले, मात्र इतके करुनही जाहिरातीत दाखवलेली कार दिलीच नाही.
अविनाश वसंत सोनवणे (32 रा.धानोरा रोड,बीड) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. ते एका खासगी फायन्सास कंपनीत काम करतात. 18 ते 19 मार्चच्या दरम्यान हा सर्व फसवणूकीचा प्रकार घडला. अविनाश यांनी एका नामांकीत कंपनीच्या कार विक्रीची जाहिरात पाहिली. नंतर संबंधितांनी दिलेल्या एक दोन नव्हे तर 6 क्रमांकावर संपर्क साधला. त्या क्रमांकावरुन बोलणार्या लोकांनी अविनाश यांना एक बँक खाते क्रमांक देवून त्यावर 1 लाख 69 हजार रुपयांची रक्कम जमा करण्यास सांगीतले. त्यानुसार रक्कमही जमा केली,मात्र नंतर त्या लोकांनी संपर्क केला नाही अन् कारही दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोनवणेंनी शिवाजीनगर ठाण्यात 21 मार्च रोजी फिर्याद दिली. त्यावरुन अनोळखी 6 मोबाइल क्रमांक धारकांविरुध्द फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला. पो.नि.केतन राठोड अधिक तपास करत आहेत. वाढत्या फसवणूकीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी समाज माध्यमावरुन अमिष दाखवणार्या जाहिरांतीपासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
Leave a comment