60 वर्षांवरील नागरिकांनाही मिळणार बुस्टर डोस
मुंबई । वार्ताहर
देशात आता 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी देखील कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यासाठी उद्यापासून खास मोहीम राबवली जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केली आहे. तर ६० वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी 'बूस्टर डोस'लाही मंजुरी देण्यात आली आहे.
१६ मार्चपासून लसीकरण सुरू होणार आहे. लहान मुलांना बायोलॉजिक ईएस कोर्बोवॅक्स कंपनीची लस दिली जाण्याची शक्यता आहे.
एनटीएजीआयने 12 ते 14 या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची शिफारस केली आहे. या वयोगटातील मुलांचे लसीकरण मंगळवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. 60 वर्षावरील व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात येणार आहे. याआधी 60 वर्षावरील व्यक्तींना बुस्टर डोस घेण्यासाठी असलेले नियम शिथील करण्यात आले आहेत.
१२ ते १४ वयोगटातील ७.११ कोटी मुले
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार देशात १२ ते १४ वयोगटातील सात कोटी ११ लाख मुले आहेत. त्यांचे लसीकरण करण्यासाठी बायॉलॅजिकल ई लिमिटेड कंपनीने पहिल्या टप्प्यात कोर्बेव्हॅक्स लशीच्या पाच कोटी मात्रा केंद्राला दिल्या असून, राज्यांना त्यांचे वितरण करण्यात आले आहे.
देशभरात तब्बल १८० कोटी लस
कोरोनाविरोधात देशव्यापी लसीकरण मोहीम सुरु आहे. कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या 24 तासात 4 लाख 61 हजार 318 कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण 180 कोटी 19 लाख 45 हजार 779 डोस देण्यात आले आहेत.
“मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे! असं आरोग्यमंत्री मांडविया यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. तसेच, ६० वर्षांवरील वृद्धांनाही खबरदारीचा डोस किंवा बूस्टर डोस दिला जाणार आहे. ‘मुलांच्या कुटुंबीयांना आणि ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करतो’, असे मांडवीय म्हणाले आहेत.
लहान मुलांना ‘कार्बेवॅक्स’ लस
12 ते 14 वयोगटातील मुलांना कार्बेवॅक्स ही लस देण्यात येणार आहे. बायोलॉजिकल ई कंपनीने ही लस तयार केली आहे. कार्बेवॅक्स ही रीकॉम्बीनंट प्रोटीन सब-युनिट लस आहे. ही लस एमआरएनए आणि इतर लसींप्रमाणेच स्पाइक प्रोटीनला लक्ष्य करत असते. परंतु याची पद्धत वेगळी असते. कार्बेवॅक्सचे दोन डोसही द्यावे लागतील. ते बनवण्यासाठी कमी खर्चाच्या पद्धती वापरण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही सर्वात स्वस्त लसींपैकी एक असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
अशी राबवली गेली लसीकरण मोहीम
- 16 जानेवारी 2021 – आरोग्य कर्मचाऱयांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा प्रारंभ.
- 2 फेब्रुवारी 2021 – फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण.
- 1 मार्च 2021 – 60 वर्षांवरील नागरिक तसेच सहव्याधीग्रस्त 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण.
- 1 एप्रिल 2021 – 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचे निर्देश.
- 1 मे 2021 -18 वर्षांवरील नागरिकांचाही लसीकरणात समावेश.
- 3 जानेवारी 2022 – 15 ते 18 वर्षांच्या मुलांचे लसीकरण सुरू.
Leave a comment