बीडकरांनो आत्ताच लक्ष द्या; पुन्हा 15 वर्ष बायपास होणार नाही



बीड । वार्ताहर



बीड बायपास टू बायपास असा शहरातून जाणार्‍या 12 कि.मी.रस्त्याचे डागडुजीचे काम सध्या सुरु आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या कामासाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. सदरील रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी महिनाभरापूर्वीच बीडकरांनी सातत्याने मागणी केली. जनतेच्या मागणीची दखल घेवून बीडचे आ.संदीप क्षीरसागर यांनी रस्ता कामाची पाहणीही केली, पण गुत्तेदाराने त्यांनाही वेड्यात काढले. मूळातच सदरील रस्त्याच्या कामात लातूर येथील कंत्राटदार अन्नाप्पा महारुद्रआप्पा गुड्डोडगी यांनी थुक्याला थुका लावण्याचा प्रकार केला असून  राजमार्ग प्राधीकरणने ज्याप्रमाणे अंदाजपत्रक तयार केले आहे, ते अंदाजपपत्रक गुत्तेदाराने कचरापेटीत फेकून दिले असून मनाला वाट्टेल तसे काम सुरु केले आहे. याकडे अधिकार्‍यांचेही दुर्लक्ष होत असून आ.संदीप क्षीरसागर यांनीदेखील बीडकरांच्या डोळ्यात धुळ फेकू नये. 19 कोटी केवळ संदीप क्षीरसागरांमुळेच आले, मात्र त्यातून चांगले काम व्हावे ही बीडकरांची अपेक्षा आहे. त्यामुळे बीडकरांनी या रस्त्यासाठी आंदोलन उभारणे आवश्यक आहे. आगामी पंधरा वर्षात या रस्त्याला पैसे येणार नाहीत,त्यामुळे आत्ताच जागे व्हा, खंडीभर युवक संघटना, सामाजिक संघटना, राजकीय पक्षांच्या संघटना यांनीही जागे होणे गरजेचे आहे. 



भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी या रस्त्याच्या कामासंदर्भात 3 जानेवारी 2022 रोजीच जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना पत्र पाठवले असून या रस्त्याचे काम कशा पध्दतीने होणार आहे, हे स्पष्ट केले आहे. त्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांच्या मागणीवरुन प्रकल्प संचालकांकडे रस्त्याच्या कामासंदर्भात विचारणा केली होती. प्रकल्प संचालक काळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना जे पत्र पाठवले आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, बीड शहरास राष्ट्रीय महामार्ग-52 येडशी ते औरंगाबाद कि.मी.100 ते 290 कि.मी. या चौपदरीकरणातंर्गत बायपास तयार करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील जुना रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित होणार आहे.त्यासाठी शहरातील अंतर्गत 10 कि.मी.रस्त्याचे ‘वन टाईम इम्प्रुमेंट’ अंतर्गत काम मंजुर करण्यात आले आहे. 

सदरील रस्त्याच्या कामावर लक्ष देण्यासाठी प्राधीकरणाने एसए इन्फास्ट्रक्चर कन्सलंन्ट आणि मे.अ‍ॅक्युलेट कन्सल्टन्सी सव्हिर्स यांची नियुक्ती केली आहे. सदरील काम सर्व निकष पाळून दर्जेदार होत असल्याचेही काळे यांनी म्हटले आहे आहे. एवढेच नव्हे तर या कामामध्ये कुठेही बदल करण्याचा अधिकार नाही असेही राजमार्ग प्राधीकरणने म्हटले आहे. 2 एजन्सी देखरेखीसाठी असताना त्यातील प्रत्यक्ष रस्ता कामावर कोणीही नसते. ज्या कंत्राटदाराला काम मिळाले आहे. त्याने थातूर-मातूर काम सुरु केले आहे. महालक्ष्मी चौक ते काकू-नाना हॉस्पीटलपर्यंत जे डांबरीकरण झाले आहे ते 15 दिवसांतच उखडू लागले आहे. डांबर वापरले की नाही याची शंका येत असून बार्शी नाक्यावर मिळणारे ऑईलही या डांबरामध्ये मिसळले असल्याची चर्चाही नागरिक करत आहेत.



बीडकरांनो लक्ष द्या; रस्ता असा व्हायला हवा



यामध्ये संभाजी चौक ते बाजीराव जगताप कॉम्लेक्स या साडेतीन कि.मी.रस्त्यामध्ये 50 मि.मी.डीबीएम आणि 40मि.मी.बीसीचे थर देण्यात येणार आहेत. यामध्ये डेन्स, बिट्युमेनस आणि मॅकडम अर्थात डीबीएम या पध्दतीने रस्ता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण या रस्त्यावरुन अवजड वाहतूकही होणार असल्याने डीबीएम आवश्यक आहे. बाजीराव जगताप कॉम्पलेक्स ते काकू-नाना हॉस्पीटल या जवळपास 3 कि.मी.अंतरामध्ये सिंमेट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. आणि काकू-नाना हॉस्पीटल ते महालक्ष्मी चौक या साडेतीन कि.मी.च्या अंतरामध्ये पुन्हा डीबीएम आणि बीसीचे थर असा रस्ता तयार केला जाणार आहे. व या रस्त्याच्या कामाच्या संदर्भाने इतर कामांचाही समावेश करण्यात आला असून त्यामध्ये साईड पंखे भरणे, नाल्या काढणे याचा समावेश आहे. 

 

 संदीप भैय्या श्रेय घ्या, पण चांगल्या कामाचे



सदरील कामासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला, यामध्ये कुणाचेही दुमत नाही. त्यांनी श्रेय अवश्य घ्यावे आणि जनतेनेही त्यांना श्रेय दिलेलेच आहे, मात्र त्यांनी चांगल्या कामाचे श्रेय घ्यावे अशी अपेक्षाही बीडकर व्यक्त करत आहेत. ज्या पध्दतीने काम सुरु आहे, त्यामुळे आगामी काही महिन्यातच हा रस्ता पुन्हा खराब होणार आहे. हा रस्ता आता सार्वजनिक बांधकामकडे वर्ग होणार आहे. त्यामुळे कमीतकमी 15 वर्ष आता या रस्त्याला निधी मिळणार नाही. आ.संदीप क्षीरसागर यांनी गुत्तेदारांच्या कोंड्याळ्यातून बाहेर निघून जरा बीडकरांसाठी या रस्त्याकडे लक्ष द्यावे. जनता त्यांना डोक्यावर घेवून नाचेल अशीही चर्चा होत आहे. सिंमेट रस्ता करायचाच तर सुभाष रोडवर जसा झाला, तसा करा, तसेच हे काम गुणवत्तेचे होईल असेही बोलले जात आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.