राज्याचे नेतृत्व करणार्याचे होमपिचवर ‘कर्तृत्व’ सिध्द
बीड । वार्ताहर
एकेकाळी भाजपात असणार्या सुरेश धस यांच्या गळ्यातील ताईत असणारे शेख महेबुब राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर राजकीय वर्तुळात आ.धस यांच्यापेक्षाही श्रेष्ठ पदावर जावून पोहचले. सुरेश धस यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीला झटका देत भाजपाचे कमळ हाती घेतले आणि त्याचवेळी शेख महेबुब यांनी धस यांची करगंळी सोडून राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांची पक्षात ‘व्हॅल्यु’ वाढली. मुस्लिम चेहरा म्हणून पवारांनी हे नेतृत्व पुढे आणण्यासाठी त्यांना पदावर बसवले, पण प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये शेख महेबुब यांना पवारांचेही स्वप्न पूर्ण करता आले नाही, आणि स्वत:चे कर्तृत्वही सिध्द करता आले नाही. राजकारणात पद मिळाले की आपण मोठे झालो अशा अर्विभावात थेट पंतप्रधानांपासून ते चंद्रकांत पाटील आणि चित्राताई वाघ यांच्यावर ट्विटरवरुन सारखी टिव-टिव केली. यामुळे माणूस मोठा होतो का? हे त्यांच्या लक्षात आले नाही. गल्लीत किंमत नाही आणि दिल्लीत राजकारण करायला निघाले, अशी त्यांची अवस्था झाली. आता नगरपंचायतच्या निवडणूकीत सफाया झाल्यानंतर विनाकारण शेखी मिरवणार्या महेबुब शेख यांची पदावरुन गच्छंती अटळ झाली असून त्यांच्या जागी आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची वर्णी लागणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कवठे महाकाळ नगरपंचायतमध्ये रोहित पाटलांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर प्रतिक्रिया देताना त्यांच्या पदावर जणू शिक्कामोर्तबच केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदावर बसल्यानंतर ही कारकीर्द शेख महेबुब यांनी काही चांगले करण्यासाठी घालवायला हवी होती, मात्र केवळ टिका करणे, आणि निष्ठा व्यक्त करणे यातच तीन वर्ष घातले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये युवकांसाठी काहीतरी भरीव कामगिरी होईल असे सर्वांनाच वाटले होते. युवकांसाठी हाताला काम देण्यासाठी काही योजना महेबुब हे सत्तेच्या माध्यमातून आणतील अशी अपेक्षाही व्यक्त केली गेली, मात्र आपली राजकीय उंची लक्षात न घेताच त्यांनी या पदावरुन काम केले. पक्षातही मोठ्या प्रमाणात गटबाजी आहेच. त्यातही त्यांनी खा.सुप्रियाताई यांच्या गटामध्ये सक्रीय राहून अजित पवारांची मिमिक्री करण्यातच धन्यता मानली. सत्तेच्या काळात गेल्या दोन वर्षामध्ये शेख महेबुब यांना राज्य सरकारचे मार्गदर्शक शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून बरेच काही करता आले असते. जिल्ह्याचे सोडा, निदान शिरुर तालुक्यासाठी तरी काही केले असते तर लोकांनी नाव घेतले असते. पंरतु ट्रेडिंग पॉलिटेक्स करत असताना स्वत:चे खिशे गरम करण्यातच धन्यता मानणार्या महेबुबांना आपल्या होमपिचवरच कर्तृत्व सिध्द करता आले नाही. वास्तविक पाहता,सुरुवातीच्या काळात त्यांची प्रतिमा लोकांनी विश्वास ठेवावा अशी होती, मात्र औरंगाबादच्या प्रकरणानंतर त्यांची प्रतिमाही डागाळली. निदान विकासाची कामे करण्याचे प्रयत्न करुन तरी त्यांनी एखाद्या राजकीय व्यक्तीची प्रतिमा तयार करायला हवी होती.परंतु ट्रेडिंग पॉलिटेक्समध्ये असे होत नाही. पदाचा गरिमा लक्षात न आल्याने राजकारणातही ते यशस्वी होवू शकले नाही. पक्षीय राजकारणात ते कदाचित यशस्वीही होतील, परंतु निवडणूकीच्या राजकारणात यशस्वी होण्यासाठी वय आणि कर्तृत्वाचे भान ठेवावे लागते,आणि नेमके हेच भान महेबुब यांना ठेवता आले नाही.आपल्यापेक्षा वयाने जेष्ठ आणि श्रेष्ठ असणार्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ.सुरेश धस यांच्यापासून पंकजा मुंडे तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात टिकाटिप्पणी करण्यातच त्यांनी आपल्या पदाचा उपयोग केला. रायुकाँच्या माध्यमातून मराठवाड्यात कुठेही मोठा मेळावा अथवा युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाही. आता त्यांचे पद जाण्याची चर्चा होवू लागली आहे. पक्ष काय निर्णय घ्यायचा तो निर्णय घेईल, मात्र त्यांच्या राजकारणाची सुरुवात पुन्हा त्यांना नव्याने करावी लागेल, कारण शिरुरसारख्या लहान तालुक्यातही त्यांना आपले राजकीय वजन निर्माण करता आले नाही. राज्यपातळीवर काम करताना गावगाडा पाहणेदेखील आवश्यक आहे. नगरपंचायतच्या निवडणूकीमध्ये केवळ चार उमेदवार निवडुन आले. बाकी भाजपानेच बाजी मारली. शिवसेनेच्या उमेदवारांमुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले,असेही शिरुरमध्ये बोलले गेले. शेख महेबुब यांनी भविष्यकाळात तरी आता भूतकाळाचे वर्तमान लक्षात घेवून राजकारण करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
केवळ टिका केली म्हणजे मोठे होता येते का?
शेख महेबुब यांचे ट्विटर अकाऊंट पाहिले तर सातत्याने त्यांनी मोठ-मोठ्या नेत्यांच्या विरोधात टिका केलेली दिसते. स्वत:चे नेतृत्व कसदार करायचे असेल तर त्याला अभ्यास आणि व्यासंगाची खोली तयार करावी लागते. उथळ पाण्याला खळखळाट फार ही म्हण महेबुब यांनी शालेय जीवनात शिकलीही असेल. परंतु त्यांनी तिचा अभ्यास केला नाही. पदावर बसले म्हणजे केवळ टिका करायलाच बसवले का? शरद पवारांनी देखील आपल्या 50 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीमध्ये भाषेचे संसदीय रुपच वापरले आहे. असंसदीय भाषा त्यांनी कधीही वापरलेली नाही, टिकाही कधी पातळी सोडून केलेली नाही. त्यांचा आदर्श जर महेबुब घेत असतील तर विनाकारण या-ना त्या नेत्यांवर टिका करण्यापेक्षा अभ्यास करुन आपले नेतृत्व सिध्द करावे. त्यातच त्यांच भले आहे.
Leave a comment