भाडे तत्वावर दिलेली वक्फ बोर्डाची जमीन नावावर केली





बीड । वार्ताहर

 
वक्फ बोर्डाने 51 वर्षांच्या करारावर भाडे तत्वावर दिलेली शहरातील सर्वे नं.20 इ मधील सय्यद सुलेमान साहब दर्गा बीड यांच्या संबंधित असलेली खिदमतमाश जमीन तत्कालीन स्वतःच्या नावावर करून घेणार्‍या शेख निजाम शेख जैनोद्दीन व शेख जैनोद्दीन शेख सुजाओद्दीन या पिता-पुत्रांवर 15 जानेवारी रोजी पहाटे पावणे तीन वाजता बीड शहर ठाण्यात फसवणूक आणि वक्फ अधिनियम 1954 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत जिल्हा वक्फ अधिकारी अमीनुज्जम खलीखुज्जम यांनी बीड शहर ठाण्यात रितसर फिर्याद नोंदवली. त्यानुसार सर्वे नं.20 मधील सय्यद सुलेमान साहब दर्गा बीड यांच्या संबंधित असलेली खिदमतमाश जमीन मराठवाडा वक्फ ऑफ बोर्ड पंचक्की यांनी 28 ऑक्टोबर 1993 साली ठराव घेवून हाजी शेख सुजाउद्दीन दादामियॉ, शेख जैनोद्दीन शेख सुजाउद्दीन व मिर्झा शफीक बेग मिर्झा उस्मान बेग (सर्व रा.सुभाष रोड, बीड) यांना 14 सप्टेंबर 1994 रोजी 51 वर्षांसाठी दरवर्षी 5 हजार रूपये किरायाने दिली होती.तसेच त्यावेळी 20 रूपये किंमतीच्या बॉण्डवर 38 हजार चौरस फुट जमीन भाडे तत्वावर दिली. तसेच त्यांच्याकडून देणगी म्हणून 50 हजार रूपयांची रक्कम भरून घेण्यात आली. दरम्यान नंतर हाजी शेख सुजाउद्दीन यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा शेख जैनोद्दीन व त्याचा मुलगा शेख निजाम यांनी संगनमत करून 30 जून 2001 रोजी खिदमतमाश जमीन मदतमाश म्हणून फेर क्रमांक 554 अन्वये बेकायदेशीररित्या स्वतःच्या मालकीची करून घेतली. 
 
दरम्यान फेर फार क्रमांक 554 संबंधाने मराठवाडा वक्फ बोर्डामार्फत जिल्हा वक्फ अधिकारी शेख मकसूद व सय्यद जाफर यांनी तत्कालीन उपजिल्हाधिकारी यांच्याकडे शेख पिता-पुत्राविरूध्द अपिल दाखल केले होते.तत्कालीन उपविभागीय अधिकारी प्रशांत शेळके यांनी सदरचा फेर क्रमांक 554 रद्द केलेला आहे.याशिवाय वक्फ बोर्डाचे सीईओ यांनी 30 जून 2001 चा उपजिल्हाधिकारी भूसुधार यांचा आदेश रद्द होण्यासाठी महसूल राज्यमंत्री यांच्याकडे अपिल दाखल केले होते. त्यानुसार महसूल राज्यमंत्र्यांनी 14 फेब्रुवारी 2006 रोजी 2001 चा आदेश रद्द करण्याबाबतही आदेश पारीत केलेले आहेत. शेख निजाम व शेख जैनोद्दीन यांनी सर्वे नं.20 इ जमीन त्यांना विश्वासाने भाडेतत्वावर दिलेली असतांना विश्वासघात करत उपजिल्हाधिकारी शेळके यांच्या नावाचा व सही शिक्क्याचा बनावट आदेश तयार करून वक्फ बोर्डाच्या मालकीची जमीन संगनमताने स्वतःच्या नावे करून तिथे बांधकाम केले म्हणून दोघांविरूध्द फसवणूक तसेच वक्फ अधिनियम 1954 चे कलम 52 (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक निरीक्षक घनशाम अंतरप हे करत आहेत.



उपजिल्हाधिकार्‍यांचा बनावट आदेश तयार केला



बीड शहरातील सर्वे नं.20 ही जमीन सय्यद सुलेमान साहब दर्गा बीड यांच्या संबंधित खिदमतमाश आहे. या जमिनीची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. सदरील जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर असतांना दोन्ही आरोपींनी तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांच्या नावाचा व शिक्क्याचा बनावट आदेश तयार करत त्या आदेशाद्वारे नगर भू-मापन क्रमांक 1918 अखिव पत्रिकामधील अध्यक्ष मराठवाडा वक्फ बोर्डाचे नाव असतांना फेर नंबर 5280 प्रमाणे स्वतःचे नाव समान हिस्सा नोंद केले. त्याआधारे पीआरकार्ड तयार करून मालकी ताबा दाखवला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.