आष्टी । रघुनाथ कर्डीले
वेळ सकाळी साडेनऊच...आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी रेल्वे स्टेशनवर नागरिकांची तोबा गर्दी... सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली...प्रत्येकजण अहमदनगरच्या दिशेने नजर लावून बसलेला होता ...गेल्या अनेक वर्षापूर्वीच्या स्वप्न नगरच्या दिशेने आष्टी तालुक्यामध्ये आगमन करणार होते ते म्हणजेच बीड जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असणारी रेल्वे आष्टी पर्यंत येणार होती...बरोबर नऊ वाजून 30 मिनिटांनी नगरच्या दिशेने बारा डब्यांची रेल्वे गाडी आली आणि त्या रेल्वेने एकदाचा भोंगा वाजविण्यात सुरुवात केली ...भोंगा वाजला तसा रेल्वे स्थानकावर जमलेल्या नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला...आनंद गगनात मावेनासा झाला...झुक झुक आगीन गाडी भरधाव वेगात सोलापूर वाडी रेल्वे स्थानकात दाखल होताच एकच जल्लोष उडाला. अन अनेक वर्षापूर्वीचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद प्रत्येक नागरिकाच्या चेहर्यावर ओसंडून वाहत असताना दिसून आला.
अहमदनगर -बीड परळी रेल्वेमार्गावरील अहमदनगर-आष्टी दरम्यान हायस्पीड रेल्वे चाचणी आज यशस्वी पार पडली.अहमदनगर,नारायणडोह ,सोलापूरवाडी,कडा ते आष्टी या मार्गावर हायस्पीड रेल्वे धावली. अहमदनगर - बीड-परळी हा रेल्वेमार्ग व्हावा ही जिल्ह्यातील जनतेची अनेक वर्षाची मागणी मंजूर झाली तरी प्रत्यक्षात त्यासाठी प्रत्येक रेल्वे अर्थ संकल्पात अत्यल्प तरतूद होत असल्याने गती घेत नव्हता.दिवंगत खा.केशरकाकू क्षीरसागर,लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह तत्कालीन खा.रजनी पाटील, विद्यमान खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी यासाठी प्रयत्न केलेले होते मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आणि या कामाने गती घेतली.आता संपूर्ण मार्गाचे भूसंपादन पूर्ण झाले आहे.अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतरावर लोहमार्गाचे काम ही पूर्ण झालेले आहे.अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान 7 कि.मी.अंतरावर मार्च 2018 रोजी सात डब्याच्या रेल्वेची चाचणी झाली होती नंतर अहमदनगर-नारायणडोह-सोलापूरवाडी या 15 कि.मी. अंतरावर दि.25 फेब्रुवारी 2019 रोजी 7 डब्याची रेल्वे चाचणी झाली मात्र नंतर लॉकडाऊनमुळे पुढील काम मंदावले आणि आष्टीपर्यंत कधी रेल्वे चाचणी होणार हा प्रश्न ऐरणीवर आला होता.कोरोनच्या दुसर्या लाटे नंतर रखडलेले काम सुरू झाले आणि सोलापूरवाडी धानोरा दरम्यान असलेल्या मेहकरी नदीवरील सर्वात उंच पुलाचे काम पूर्ण झाले.दि.9 डिसेंबर रोजी अहमदनगर - कडा दरम्यान दोन डब्यांची रेल्वे गाडी आणून चाचणी झाल्यानंतर आता अहमदनगर ते आष्टी या 60 कि.मी. अंतरावर हायस्पीड रेल्वे ( ताशी144 कि.मी.वेग)चाचणी झाली आहे. यावेळी दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत सोलापूरवाडी ते आष्टी या 31 कि.मी.रेल्वेमार्गावर पहिल्यांदाच 12 डब्यांची रेल्वे गाडी धावली आहे.सोलापूरवाडी ते आष्टी या मार्गावर झालेल्या कामाचे उद्घाटन ही रेल्वे अधिकायांच्या हस्ते संपन्न झाले.रेल्वेचे हे सर्व वरिष्ठ अधिकारी मुंबईहुन अहमदनगर व त्यानंतर सोलापूरवाडी मार्गे आष्टीत दाखल झाले होते. पहिल्यांदाच 12 डब्यांची रेल्वे या मार्गावर धावणार असल्याने परिसरातील व जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा स्वप्नपूर्तीचा आनंद झाला होता.यावेळी सामाजिक कार्यकर्ते नामदेव राऊत म्हणाले, मी गेल्या पन्नास वर्षापासून रेल्वेचे स्वप्न पाहत होतो परंतु प्रत्येक निवडणूक आली की राजकारणी लोक रेल्वेचे गाजर दाखवत होते रेल्वेचा विषय बनवत होते मात्र आता प्रत्यक्षात रेल्वे आज दाखल झाल्याने आनंदाचा दिवस आहे यापुढे लवकरात लवकर दररोज या भागातून रेल्वेसेवा सुरू व्हावी अशी मागणी त्यांनी केले आहे.
रेल्वे पाहिल्याचे जेष्ठांनाही समाधान
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील अहमदनगर ते आष्टी या 61 किलोमीटर अंतरावर आज हायस्पीड चाचणी घेण्यात आली यावेळी सोलापूर वाडी धानोरा कडा आष्टी इत्यादी स्थानकावर नागरिकांनी या रेल्वेचे मोठ्या उत्साहात मध्ये स्वागत केले ठिकठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत या रेल्वेगाडीचे हार-तुरे घालत स्वागत केले यामध्ये लहान मुले, तरुण कार्यकर्ते व वृद्धांचा ही समावेश होता प्रत्येक जणाने आज कधीही न पाहिलेली रेल्वेगाडी आपल्या भागात आल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.
कड्यात हजारोंची गर्दी;रेल्वेचालकांचा सत्कार
कडा बसस्थानकामध्ये साधारणपणे सव्वा अकराच्या सुमारास हायस्पीड चाचणी घेणारी रेल्वे दाखल होताच गावातील जवळपास पाच हजारापेक्षा जास्त नागरिकांनी या रेल्वेचे स्वागत केले.कड्याचे प्रथम नागरिक सरपंच अनिल ढोबळे यांनी रेल्वेची विधिवत पूजा करत पुष्पहार अर्पण केला यावेळी तरुणाईने रेल्वे सोबत सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अहमदनगर ते आष्टी रेल्वेचालक म्हणून बी.मुजुमदार तर सहाय्यक चालक म्हणून कमलेश कुमार गौर यांनी सारथ्य केले. या दोघांचाही कडा येथे सरपंच अनिल ढोबळे ,शंकर देशमुख व नागरिकांनी यथोचित सत्कार केला.
गोपीनाथ मुंडे अमर रहे..घोषणांनी आष्टी दणाणली
दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रेल्वे गाडीचे आष्टी स्थानकात आगमन होताच मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी खा. प्रीतम ताई मुंडे व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली रेल्वेचे आगमन होताच गोपीनाथ मुंडे अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
हे ठरले पहिले प्रवाशी
रेल्वे मार्गावर बुधवारी चाचणी घेण्यात आली.त्यावेळी या रेल्वेतून सोलापूरवाडी ते आष्टी प्रवास करण्याचा मान सामाजिक कार्यकर्ते नामदेव राऊत ,पत्रकार गोविंद शेळके,पत्रकार संघाचे अध्यक्ष रघुनाथ कर्डिले ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, राजेश राऊत बाबासाहेब पवार नितीन कांबळे,पप्पू मोहरकर ,मुकेश दहीवाळ यांनी मिळविला.
येताना स्लो नंतर हायस्पीड!
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाची हायस्पीड चाचणीच्या वेळी आज सकाळी बरोबर आठ वाजता अहमदनगर रेल्वे स्थानकातून बारा डब्यांची रेल्वे आष्टीच्या दिशेने निघाली. येताना सोलापूरवाडीमध्ये विधीवत पूजा रेल्वे अधिकार्यांच्या हस्ते करण्यात आली.त्यानंतर कडा बसस्थानकामध्ये जवळपास तीन तास रेल्वे गाडी थांबली. त्यावेळी पाठीमागे ट्रॉलीवर रेल्वेच्या अधिकार्यांनी रुळाची चाचणी केली. या दोन तासाच्या अंतरानंतर दुपारनंतर कमी वेगात ही रेल्वे आष्टीच्या दिशेने गेली मात्र सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आष्टीहून नगरच्या दिशेने 130 च्या वेगाने रेल्वे नगर ला गेली साधारणपणे आष्टी ते कडा या सोळा किलोमीटर अंतरात नऊ मिनिटात पार पाडले त्यानंतर कड्यावरून अहमदनगर येथे 30 ते 32 मिनिटांमध्ये अंतर कापले.
जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान-खा.प्रितम मुंडे
बीड जिल्ह्याच्या अनेक लोकसभेच्या निवडणूका ह्या बीडच्या रेल्वे प्रश्नावर झाल्या असून मी ही याच मुद्द्यावर निवडणूक लढवली आहे.मी लहानपणापासून नगर-बीड-परळी रेल्वेबाबत ऐकत होते.जेव्हा बाबा खासदार झाले तेव्हा या रेल्वेमार्गासाठी पावणेतीनशे कोटी रूपायांचा निधी मिळवून दिला होता.आज रेल्वेची आष्टी पर्यंत हायस्पीड चाचणी झाली असून,याचा श्रेयवाद मला घेयचाही नाही आणि राजकरणही करायचे नसून,बाबांचे स्वप्न आज अर्धे पुर्ण झाले असून,लवकरच परळी पर्यंत रेल्वे काम पुर्ण करून जिल्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी केले.
नगर-आष्टी रेल्वेची आज बुधवार दि.29 रोजी रोजी हायस्पीड चाचणी घेण्यात आली.सकाळी साडेआठ वाजता सोलापूरवाडी येथे अहमदनगर हून सोलापूरवाडी येथे आगमन झाले.त्यानंतर दहाच्या दरम्यान सोलापूरवाडी हून कडा येथे येऊन दुपारी चार वाजेपर्यंत कडा येथील रेल्वेस्टेशनवर थांबून चारच्या दरम्यान कडा येथून आष्टी कडे या रेल्वेचे आगमन झाले.यावेळी आष्टी शहरातील मोठ्या संख्येने नागरीक रेल्वेस्थानकावर स्वागत करण्यासाठी गर्दी केली होती.यावेळी जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे बोलत होत्या.खा.मुंडे यांनी रेल्वेची पाहणी करत रेल्वे अधिका-यांशी चर्चा केली.याप्रसंगी आमदार सुरेश धस,माजी आमदार भिमराव धोंडे यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.रेल्वेचे आष्टी रेल्वेस्टेशनवर आगमन होताच स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमा उंचावून अमर रहे,अमर रहे..मुंडे साहेब अमर रहे च्या घोषणेने संपूर्ण रेल्वे परिसर दणाणून गेला.यावेळी आ.सुरेश धस म्हणाले,स्व.गोपीनाथ मुंडे खासदार झाल्यानंतर ख-या अर्थाने या रेल्वे मार्गाला मोठ्या प्रमाणावर निधी मिळण्यास सुरूवात झाली असुन,साहेबांच्या मत्यूनंतर बीड येथील लोकसभेच्या जाहिर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंडेसाहब का सपना पुरा करना है असा शब्द देत 2700 कोटी रूपायांचा निधी उपलब्ध करून दिला.त्यानंतर ख-या अर्थाने नगर-बीड-परळी या रेल्वे कामाला गती मिळाली.तसेच या रेल्वे मार्गासाठी संदर्भात भूसंपादन आढावा बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी आमदार धस यांनी केली.माजी आ.भिमराव धोंडे म्हणाले,अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाला स्व.गोपीनाथरावजी मुंडे असे नाव द्यावे ही रेल्वेची मागणी पन्नास वर्षाची होती.ती आज आष्टीत रेल्वेआल्याने पुर्वात्वास जात असल्याने आनंद होत असल्याचे त्यांनी सांगीतले.
बाबा..इतिहास बनाती इस रफ्तार में आप हो
बीड रेल्वेसाठी मुंडे साहेबांनी घेतलेले कष्ट पंकजाताई मुंडेंच्या ट्विट मधून अधोरेखित
बीड रेल्वेची आष्टीपर्यंत हायस्पीड चाचणी;कार्यकर्त्यांनी केला आनंदोत्सव
बाबा..! इतिहास बनाती इस रफ्तार में आप हो..हमारी हर आगाज में आप हो..अशा शब्दांत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचं गौरव करणारं लक्षवेधी ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. बीड रेल्वेच्या स्वप्नपूर्तीबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांचेही आभार मानले आहेत.
बीडच्या जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाची आष्टीपर्यंतची हायस्पीड चाचणी आज सायंकाळी यशस्वीरित्या झाली. खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी आनंदोत्सव साजरा केला. हा रेल्वेमार्ग आता पुर्णत्वाकडे चालला असून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी हे ट्विट केलं आहे. त्या म्हणाल्या,बाबा!! इतिहास बनाती इस रफ्तार में आप हो,
हमारे हर आगाज में आप हो,
जो देखो बीड वासियों की आंखो में आज, सच कहती हूं, खुशी से नम हर आंखो के अंदाज में आप हो..प्रसंग जो भी हो हर नारे की आवाज में आप हो !! अशा शब्दांत गौरव करून त्यांनी मुंडे साहेबांनी यासाठी घेतलेले कष्ट अधोरेखित केले.
पंतप्रधान मोदी, फडणवीस, मुनगंटीवार यांचेही मानले आभार*
एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये.. माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचे अभिनंदन ज्यांनी अनेक दशके लढाई दिली. खासदार डॉ.प्रितमताई मुंडे अजून एक रेकॉर्ड तुमच्या नावावर... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या शब्दाला पूर्ण करण्यात योगदान दिलं. आभारी आहोत..मोदीजी, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांचे..असं ट्विट त्यांनी रात्री केलं होतं.
Leave a comment